आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सत्ताधारी आणि विरोधकांचा सूर:सरकार पाडणार नाही : भाजप; सरकार पडू देणार नाही : आघाडी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकार पाच वर्षे टिकेल; ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांकडून सरकार स्थिरतेचा निर्वाळा

राज्यात आघाडी सरकार पाडणार की तरणार अशी जोरदार चर्चा आहे. त्याबाबत राज्यातील चारही प्रमुख पक्षांत हालचाली सुरू असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांनी व्यक्त केलेल्या या प्रतिक्रिया...

गिरीश व्यास : आम्हाला पैजा लावून सरकार पाडण्याची गरज नाही

सरकार त्याच्या पापानेच कोसळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. संजय राऊत नारद आहेत. इतरांचे चांगले त्यांना पाहवत नाही म्हणून ते अकारण आगपाखड करीत असतात. आम्ही पैजा लावून राजकारण केले नाही. प्रामाणिक विकास हेच भाजपचे लक्ष्य आहे. म्हणून पैजा लावून सरकार पाडणार नाही, असे व्यास म्हणाले. यापूर्वी युतीत नुकसान करून सरकार टिकवले. हे सरकार व्हेंटिलेटरवर आहे. आघाडीतील नेते त्याला प्राणवायू पुरवून टिकण्याची आशा जागवत राहतात.

अरविंद सावंत : राज्यपालांचा वापर करून विविध कारणांनी भाजपची खेळी

राज्यपालांचा आधार घेऊन सरकार अस्थिर करण्याची खेळी भाजपने महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेआधीपासून सुरू केली आहे. आत्ताही तोच खेळ सुरू आहे. कधी कोविडच्या निमित्ताने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून, तर कधी राज्यपालांच्या माध्यमातून राजकारण सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात मध्य प्रदेशात विस्तार होऊ शकतो, मग महाराष्ट्रात सदस्यांची नियुक्ती का होऊ शकत नाही? यांच्यासोबत युतीत होतो तेव्हाही कुरबुरी होत्या, म्हणून सरकार पडले नाही.

संजय राऊत : ही संकटातील संधी नाही याचे भान विरोधकांनी ठेवायला हवे

ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडून दाखवायचे अशा पैजा भाजपमध्ये लागल्या आहेत. त्यांना खुशाल पैजा लावू द्या, सरकार व्यवस्थित चालेल, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले. सरकार अस्थिर आहे, असे वाटत असेल तर विरोधी पक्षाने त्यांचे प्रयत्न करावेत. पण, ते करताना सध्या कोरोनाचे संकट आहे याचे भान राखले पाहिजे. संकट ही संधी असते. पण, हे संकट म्हणजे त्यांनी संधी समजू नये. संकटात विरोधी पक्षाने सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे एवढे भान ठेवावे.

सरकार पाच वर्षे टिकेल; ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांकडून सरकार स्थिरतेचा निर्वाळा

यापूर्वी राज्यात असलेल्या भाजप-सेनेच्या सरकारातही शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत होतेच. आमचे तर तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे मतभेद व थोड्याफार कुरबुरी होणारच. त्याने सरकारला काही धोका नाही, असा निर्वाळा विदर्भातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने दिला. आघाडी सरकारच्या पाठिंब्यात १८२ लाेक आहे. एक संपूर्ण पक्ष फुटला तरच इतरांचे सरकार बनू शकते. पण, तसे होण्याची शक्यता नाही. सत्तेत ज्याच्याजवळ मुंडकी असते तो राजा असतो. त्यामुळे मतभेद आणि कुरबुरी होऊनही सरकार चालत राहील, असे या नेत्याने सांगितले.

निव्वळ गाॅसिप : नवाब मलिक

महाआघाडीचे सरकार कोसळणार या चर्चा सरकार स्थापन झाल्यापासून सुरू आहेत. आम्हा तिन्ही पक्षांकडे १७० आमदारांचे बळ आहे. सरकारला काेणताही धोका नाही, सरकार आॅक्टोबरमध्ये पडण्याच्या चर्चा अफवा आहेत, असा दावा राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केला.

0