आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Work From Home Has Led To An Increase In Health Problems; Many Suffer From Back Pain, Neck Pain, Low Back Pain, Depression: Survey Findings

दिव्य मराठी विशेष:‘वर्क फ्राॅम हाेम’मुळे आराेग्याच्या समस्यांत झाली वाढ; अनेकांना पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, नैराश्याने ग्रासले : सर्व्हेतील निष्कर्ष

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑफिसमध्ये शिस्तीत कामकाज, मात्र घरात मिळेल तेथे बैठक मारून काम

आयटीसह विविध क्षेत्रांतील कंपन्यांनी काेराेनामुळे ३ महिन्यांपेक्षा अधिक काळ कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्राॅम हाेम’ची सुविधा दिली आहे. परंतु दीर्घकाळ घरी बसून काम केले जात असल्याने कर्मचाऱ्यांत आराेग्याविषयक समस्येत वाढ हाेत आहे. पुण्यातील संचेती रुग्णालयाच्या मणकाविकार विभागातर्फे करण्यात आलेल्या अहवालात हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. विभागप्रमुख डाॅ. शैलेश हाडगावकर म्हणाले, १८ ते ५५ वयाेगटातील सुमारे ३५० पेक्षा अधिक वर्क फ्राॅम हाेम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले. यामध्ये कामादरम्यान काेणत्याही प्रकारची विश्रांती न घेता सलग काम करत असलेल्या लाेकांचे प्रमाण ७६ टक्क्यापर्यंत दिसून आले.

ऑफिसमध्ये शिस्तीत कामकाज, मात्र घरात मिळेल तेथे बैठक मारून काम

ऑफिसमध्ये कामाची आणि ब्रेकची वेळ निश्चित असते. त्याचप्रमाणे बसण्याची जागा व काम करण्याची शिस्त असते. परंतु घरी खुर्ची, साेफा अ‌थवा मिळेल तेथे बैठक मारून दीर्घकाळ लॅपटाॅप, माेबाइल, संगणकावर काम केले जाते. ब्रेकची वेळ निश्चित नसल्याने स्नायूवर ताण पडून पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखीचे आजार वाढत असल्याचा निष्कर्ष समाेर आला.

तज्ज्ञांचा सल्ला : अर्धा तास व्यायामासह या गोष्टी करा

नियमितपणे किमान ३० मिनिटे व्यायाम करणे. ऑफिसप्रमाणे कामाच्या जागी टेबल, खुर्ची मांडणी. ठरावीक वेळेनंतर कामातून विश्रांती. स्नायूंना त्रास हाेणार नाही अशाप्रकारे बसण्याची व्यवस्था. सकाळी उन्हात १०-१५ मिनिटे थांबणे, ‘व्हिटॅमिन-डी’ची तपासणी. लॅपटाॅप, संगणकाची स्क्रीन डाेळ्यांना समांतर ठेवणे. सकस आहाराचे सेवन करणे.

७६% लोक विश्रांतीविना कामकाज करत आहेत

> ७६% लोक काेणत्याही प्रकारची विश्रांती न घेता सलग काम करत असल्याचे आढळले.

> १३५ जणांना नव्याने पाठदुखी- मानदुखीचा त्रास सुरू झाला. १८३ जणांचे आजार पुन्हा बळवल्याने उपचार करावे लागले.

> ६०% लाेकांनी डाॅक्टरांचा व्हिडिआे काॅलद्वारे सल्ला घेतला, ३०% लाेकांना प्रत्यक्ष डाॅक्टरांचे उपचार सुरू करावे लागले.

> ८% लाेकांना तर थेट रुग्णालयात दाखल हाेऊन उपचार घ्यावे लागले असल्याचे सर्व्हेत म्हटले आहे.

> कर्मचारी कपात, पगार कपात, घरात बसून आलेली उदासीनता यामुळे ३७% जणांना नैराश्य आले आहे. सातत्याने लॅपटाॅक, संगणक, टीव्ही समाेर बसल्याने डाेळ्यांच्या आजाराबाबतही तक्रारी येणे सुरू झालेले आहे. खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही बदल झाला आहे.