आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Yeola Paithani Ready For Festivities After Unlock, Authenticity Of Paithani Will Be Based On "mark Of Real Paithani"

दिव्य मराठी विशेष:अनलॉकनंतर सणासुदीसाठी येवल्याची पैठणी सज्ज, "मार्क ऑफ रिअल पैठणी'वरून ठरणार पैठणीची अस्सलता

नाशिकएका वर्षापूर्वीलेखक: दिप्ती राऊत
  • कॉपी लिंक
  • येवल्याच्या पैठणी क्लस्टरमध्ये प्रथमच "पैठणी मार्क'चे टँगींग

राजवस्त्र म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या आणि प्रत्येक महिलेचे स्वप्नवस्त्र असलेल्या पैठणीची अस्सलता हा पैठणी व्यवसायातील महत्त्वाचा मानक. मात्र, सध्या "ड्युप्लीकेट पैठणी'च्या रुपाने ग्राहकांची फसवणूक करण्याचे गैरप्रकार फोफावले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी वस्त्रोद्योग तज्ज्ञ सुरेश कपाडीया यांनी "पैठणी मार्क'चा पर्याय शोधला आहे. येवल्याच्या पैठणी क्लस्टरचे बोधचिन्ह असलेल्या मोरासह "मार्क ऑफ रिअल' पैठणीचा हा टॅग तयार करण्यात आला आहे. यामुळे "अस्सल पैठणी' ओळखण्याचा ग्राहकांचा मार्ग सुकर झाला आहे.

दोन हजार वर्षांची परंपरा असलेल्या पैठणीचे गारूड दिवसागणित वाढत चालले आहे. या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन बनावट पैठणींची बजबजपुरी फोफावली आहे. परिणामी अस्सल पैठणी असल्याचे सांगून बनावट साड्या विकल्या जात असल्याने ग्राहकांना फसवणुकीस तोंड द्यावे लागत आहे आणि विणकरांसह उत्पादकांपुढेही मोठे संकट ओढावले आहे. यावर उपाय म्हणून "पैठणी मार्क'चा पर्याय शोधला गेला आहे. येवल्यातील पैठणी क्लस्टरशी जोडलेल्या पाचशेहून अधिक विणकरांना या मार्कचे वाटप करण्यात आले आहे. रेशमाच्या धाग्यांचे रंगकाम आणि मोल्यवान धातुंच्या धाग्यांसह गुंफण हे येवल्याच्या पैठणीचे वैशिष्ट्य. यात धाग्याची शुद्धता जोपासली जाते तशीच हातमागावरील नजाकतही. मात्र, त्याच्या प्रतिकृती बनवून ग्राहकांनी फसवणाऱ्या ड्युप्लीकेट पैठणीच्या बजबजपुरीस यामुळे लगाम बसणार आहे.

अशी ओळखा पैठणीची अस्सलता

  • येवल्यातील पैठणीची शुद्धता रेशमी धाग्यांना रंगवण्यापासून सुरू होते
  • पारंपरिक पद्धतीने रंगवलेल्या या धाग्यांपासून येथील विणकर हातमागावर पैठणी विणतात
  • त्याचवेळी साडीच्या आतल्या पदराला फॉलच्या बाजूस हा मार्क विणला जाणार आहे
  • त्यावर पैठणी क्लस्टरचे बोधचिन्ह असलेला मोर आणि "मार्क ऑफ रिअल पैठणी' हा टॅग आहे.
  • अस्सल पैठणी खरेदी करणारे ग्राहक या टॅगची पडताळणी करून फसवणुक टाळू शकतात.

हा टॅग ग्राहकांच्या हिताचा - लिना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,

पैठणीसारखी दिसणारी प्रत्येक साडी पैठणी नसते. त्यामुळे ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी हा टॅग महत्त्वाचा आहे. येवल्याच्या पैठणीस भौगोलिक मान्यताही मिळाली आहे. त्याची खात्रीही या पैठणी मार्कमुळे ग्राहकांना करता येणे शक्य आहे.

विणकरांनाही फायदाच होईल - संजय विधाते, संचालक, येवला पैठणी क्लस्टर

क्लस्टरच्या माध्यमातून पंचक्रोशीतील पाचशे विणकर जोडलेले आहेत. अस्सल पैठणी विणण्यासाठी ते खूप मेहनत घेतात. मात्र, बनावट पैठण्यांमुळे त्यांच्या कष्टाचेही चीज होत नाही. या टॅगचा ग्राहकांसोबतच त्यांनाही निश्चित फायदा होईल.

सोन्याची अस्सलता ठरविणारे हॉल मार्क आहे, लोकरीची खात्री वुलमार्कद्वारे करता येते, मात्र पैठणीची अस्सलता ओळखण्यासाठी कोणतीही सोय नव्हती. याचा गैरफायदा घेत बाजारात आलेल्या ड्युप्लीकेट पैठण्यांमुळे ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणूकीस आणि लुबाडणूकीस यामुळे निश्चित आळा बसेल. - सुरेश कपाडीया, वस्त्रोद्योग तज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...