आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Assembly Election Result 2021 News; Mamata Banerjee Sarbananda Sonowal | Who Will Be The Next CM In Tamil Nadu And Kerala?

कोणत्या राज्यात कोण होणार सीएम:पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्यांदा सत्तेत येणार ममता, आसामात भाजपचे पुनरागमन; तर केरळमध्ये पुन्हा विजयन यांच्या गळ्यात पडू शकते मुख्यमंत्री पदाची माळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी पुन्हा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. आसाममध्ये सर्बानंद सोनोवाल आणि केरळमध्ये पुन्हा पिनाराई विजयन मुख्यमंत्री होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. पुद्दुचेरीची परिस्थिती अद्याप स्पष्ट झाली नाही. तरीही एनडीएचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूत यंदा अन्नाद्रमुक आणि भाजप आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यंदा द्रमुकचा विजय निश्चित दिसत आहे. आता या 5 राज्यांच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे.

1. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार ममता बॅनर्जी
भारतीय जनता पक्षाने आपली पूर्ण ताकद आणि प्रतिष्ठा पणाला लावलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे निकाल भाजपसाठी धक्कादायक आहेत. तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्ता बनवणार हे जवळपास निश्चित आहे. मतमोजणीचे कल प्रत्यक्षात उतरल्यास 66 वर्षीय ममता बॅनर्जी पुन्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होणार आहेत. ममतांनी 20 मे 2011 रोजी पहिल्यांदा तर 27 मे 2016 रोजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

2. तामिळनाडूतही भाजप-अन्नाद्रमुकला झटका
अन्नाद्रमुकच्या जे. जयललिता आणि द्रमुकचे करुणानिधी यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच राज्यात विधानसभा निवडणूक झाली. या ठिकाणी सत्तेचा उलटफेर होताना दिसत आहे. जयललितांचा वारसा सांभाळणारे ई पलानीसामी यांची खुर्ची धोक्यात आहे. तर अन्नाद्रमुकचा पराभव झाल्यास राज्यात त्याचे दूरगामी परिणाम दिसून येतील. अन्नाद्रमुकने यावेळी भाजपला सोबत घेऊन निवडणूक लढवली. दोन्ही पक्षासाठी हे निकाल धक्कादायक ठरत आहेत.

जयललितांच्या जवळच्या राहिलेल्या शशिकला यांना पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी मुख्यमंत्री होऊ दिले नाही. त्याचा विरोध करत त्यांचे पुतणे टीटीव्ही दिनाकरन यांनी एएमएमके नावाचा वेगळा पक्ष काढला. तर उपमुख्यमंत्री राहिलेले ओ. पन्नीरसेल्वम सुद्धा मुख्यमंत्री बनू इच्छित होते. पराभव झाल्यास अन्नाद्रमुकमध्ये आणखी फूट पडू शकते. दुसरीकडे द्रमुक आणि काँग्रेसने सत्तेकडे कूच केली आहे. प्रथमच द्रमुककडून एमके स्टॅलिन यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले जाऊ शकते.

3. दुसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री होऊ शकतात सोनोवाल
59 वर्षीय सर्बानंद सोनोवाल यांचे नेतृत्व जनतेने पुन्हा मान्य केल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारी आणि कलनुसार सोनोवाल पुन्हा मुख्मयंत्री होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आसाममध्ये एका व्यक्तीने दोन वेळा मुख्यमंत्री होण्याची ही पहिलीच वेळ ठरेल. 1946 पासून आतापर्यंत असे कुणीच करू शकले नाही. सोनोवाल यांनी पहिल्यांदा 24 मे 2016 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

4. केरळमध्ये विजयन यांना दुसऱ्यांदा मिळू शकते मुख्यमंत्रिपद
डाव्या पक्षांचा किल्ला केरळमध्ये अजुनही मजबूत आहे. त्यामुळेच लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट (LDF) साठी सत्ता वाचवणे एक आव्हान होते. माकपने या ठिकाणी इतर 12 पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवली होती. आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार या ठिकाणी पिनाराई विजयन सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊ शकतात. विजयन यांचे वय (77) जास्त असल्याने दुसऱ्या नेत्याला मुख्यमंत्री पद दिले जाऊ शकते अशी देखील चर्चा आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या नेतृत्वातील डेमोक्रेटिक फ्रंटचे सत्ता स्थापनेचे स्वप्न धुसर झाले आहे. तर भाजपने सुद्धा 5 पक्षांना एकत्रित आणून निवडणूक लढवली होती. पण, भाजपच्या हाती काही खास लागलेले नाही.

5. पुद्दुचेरीत भाजप युतीची सत्ता?
केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीत पहिल्यांदा भाजप आपल्या मित्र पक्षांसोबत सरकार स्थापित करू शकते. या ठिकाणी ऑल इंडिया NR काँग्रेस अर्थात AINRC च्या नेतृत्वात BJP आणि AIDMK सुरुवातीच्या कलांमध्ये पुढे दिसत आहे. त्यांची सत्ता आल्यास मुख्यमंत्री पदाची माळ AINRC चे अध्यक्ष एन रंगास्वामी यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. याच वर्षी या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये काँग्रेस सरकार अल्पमतात सापडले होते. सत्ता पडली, राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. येथे 2016 मध्ये बहुमत मिळवून सत्ता स्थापित करणारा काँग्रेस हा पहिलाच पक्ष होता.