आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाकरी महागली:ज्वारीला आले सुगीचे दिवस, भाकरी महागली

भोकरदन11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील अनेक वर्षांपासून ज्वारीचे पीक भोकरदन तालुक्यातूनच नव्हे तर जिल्ह्यातूनही हद्दपार झाल्याने भल्याभल्यांच्या जीभेला पाणी सुटणाऱ्या हुरड्यालाही अनेकांना मुकावे लागत आहे. चांगल्या ज्वारीचे दर ३० ते ३५ रुपयांच्यावर गेल्याने गव्हापेक्षा ज्वारीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.पूर्वी केवळ गरिबांच्याच ताटात दिसणारी ज्वारीची भाकर आता श्रीमंताच्या ताटात जाऊन हॉटेलमधील मेनू कार्डवरही झळकली आहे.

गेल्या काही वर्षांत स्वस्त धान्य दुकानात गहू कमी किंमतीत मुबलक प्रमाणात मिळू लागल्याने गव्हाच्या पोळीवर शेतकरी नव्हेच तर शेतमजूरही आपली भूक भागवू लागले. आता सोयाबीन पीक निघाल्यावर रब्बीत हरभरा व गव्हांचा पेरा वाढू लागला. त्यामुळेच ज्वारीचे पीक भोकरदन तालुक्यातून हद्दपार झाले. तसे पाहिले तर ज्वारीला जास्त पाण्याची गरज नसते.

पण वन्यप्राण्यांचा त्रास होत असल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी पिकांच्या पेरणीकडे पाठ फिरविली. त्यामुळे ज्वारी पिकांच्या पेरणी क्षेत्रात कमालीची घट झाली. दरम्यान, ज्वारीच्या कमतरतेमुळे एकीकडे ताटातील भाकर हरविली तर दुसरीकडे पाळीव जनावरांचा वैरण म्हणून वापरात येणारा कडबा देखील नामशेष झाला आहे. आता बाजारपेठेत ज्वारीचे भाव ३० ते ३५ रुपये प्रती किलोंच्या वर गेले आहे. त्यामुळे गव्हाच्या पोळीपेक्षा ज्वारीची भाकर महाग झाली आहे.

ज्वारीचा हुरडाही मिळेना
ज्वारीची कणसे भरायच्या वेळी चिमण्या, पाखरे डौलदार असलेल्या ज्वारीच्या कणसावर बसत असायच्या. त्याला हाकलण्यासाठी पहाटेपासून शेतकऱ्यांची मुले गोफण घेऊन माळ्यावर चढायची व पाखरे हाकलायची. पहाटेच्या सुमारास हरभरा किंवा ज्वारीचा हुरडा खावून पाखरे हाकलण्याची न्याहारीच पद्धत होती. शेतामध्ये हुरडा पार्टी आयोजित करून अनेकजण एन्जॉय करीत होते. ती संस्कृती आता नामशेष होत आहे. ज्वारीच्या पिकांसोबत कडबासुद्धा नामशेष होत असल्याने ज्वारीची भाकर मिळणे कठीण होणार आहे. अप्पासाहेब जाधव, शेतकरी

बातम्या आणखी आहेत...