आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकातील निवडणूक कलांमध्ये काँग्रेसच्या मोठ्या विजयावर माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झाला आहे, प्रेमाचे दुकान उघडले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आम्ही कर्नाटकच्या जनतेला 5 आश्वासने दिली होती, ही आश्वासने पहिल्याच मंत्रिमंडळात बैठकीत पूर्ण करू, असेही ते म्हणाले. दुपारी 2.30 पर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण 224 जागांपैकी काँग्रेस 137 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 62 जागांवर आघाडीवर आहे. जेडीएस 21 जागांवर पुढे आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला 113 जागांची गरज आहे.
काँग्रेसची 5 आश्वासने
1. गृहलक्ष्मी
घरातील महिला प्रमुखाला दर महिन्याला 2000 रुपये
2. युवानिधी
या योजनेत कर्नाटकातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. यानुसार दोन वर्षांसाठी कर्नाटकातील बेरोजगार पदवीधारकांना 3000 रुपये प्रति महिना आणि बेरोजगार डिप्लोमाधारकांना 1500 रुपये प्रति महिना जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, काँग्रेसने 2 लाख सरकारी नोकऱ्या आणि 10 लाख खासगी नोकऱ्या निर्माण करण्याचेही आश्वासन दिले आहे.
3. अन्न भाग्य
या योजनेनुसार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दर महिन्याला प्रति व्यक्ती 10 किलो तांदूळ दिले जाईल.
4. गृह ज्योती
कर्नाटकातील प्रत्येक कुटुंबाला 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येईल.
5. सखी योजना
कर्नाटकातील सर्व महिलांना मोफत बस प्रवासाचे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे.
दरम्यान, मल्लिकाजुन खर्गे म्हणाले की, हा खरोखर कर्नाटकातील जनतेचा विजय आहे. त्यांनी त्यांच्या प्रगतीशील भविष्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी मतदान केले आहे. आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आम्ही हात जोडून त्यांचे आभार मानतो. काँग्रेस पक्ष 5 आश्वासनांची अंमलबजावणी करणार आहे. जय कर्नाटक! जय हिंद!''
जनतेने स्वतः उभे राहून आम्हाला पाठिंबा दिल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खरगे यांनी केला. भाजपच्या ढिसाळ कारभाराविरोधात संताप व्यक्त करत त्यांनी मतदान केले. यावरून कर्नाटकातील मतदार जागा झाल्याचे दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपशासित राज्यांच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी प्रचार आणि मसल पॉवरचा वापर करूनही, लोकांनी एकजुटीने काँग्रेसला मतदान केले.
वाचा संबंधित वृत्त
कर्नाटकात कॉंग्रेसचा जाहीरनामा:बजरंग दल, PFI वर बंदी घालू; दरमहा 200 युनिट फ्री वीज, महिलांना 2 तर बेरोजगारांना 3 हजार देणार
भारतीय जनता पक्षाच्या पाठोपाठ आता काँग्रेसनेही कर्नाटक विधानसभेसाठी आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. काँग्रेस पक्षाने सरकार आल्यास बजरंग दल आणि पीएफआयवर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले. याशिवाय कुटुंबातील प्रत्येक महिला प्रमुखाला दरमहा दोन हजार रुपये देण्याची घोषणा केली. महिलांना राज्य सरकारी बसमध्ये मोफत प्रवास करण्याचे आश्वासनही दिले आहे. येथे वाचा सविस्तर बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.