आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना रनोट यांच्यात सुरु असलेल्या चार वर्षे जुन्या प्रकरणाचा तपास आता मुंबई गुन्हे शाखा करणार आहे. पुर्वी हे प्रकरण सायबर सेलकडे होते. मात्र आता हा तपास गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभाग अर्थात सीआययूकडे वर्ग करण्यात आला आहे. या वृत्तास मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला.
2016 मध्ये हृतिकच्या नावाचा वापर करून बनावट ईमेल खाते तयार करून त्याद्वारे अभिनेत्री कंगना रनोटशी संवाद साधण्यात आल्याची तक्रार हृतिकने दाखल केली होती. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून सायबर पोलिसांनी तपास सुरू केला होता. अलीकडेच हृतिकचे वकील महेश जेठमलानी यांनी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास पुढे न्यावा, अशी विनंती केली होती.
हे होते संपूर्ण प्रकरण
हृतिक रोशन याला 2013 ते 2014 दरम्यान जवळपास 100 ईमेल मिळाले होते. यावेळी त्याने स्पष्ट केले होते की, ते सर्व ईमेल कंगनाच्या मेल आयडीवरून पाठवण्यात आले होते. याच प्रकरणात हृतिकने 2016 साली मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आणि त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, हे ईमेल बोगस आयडीवरून पाठवल्याचा कंगनाने दावा केला होता. कंगनाने तिचा ईमेल हॅक झाला असून तिने हृतिकला कधीही ईमेल पाठवले नसल्याचे सांगितले होते.
पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात काय लिहिले आहे
तपासाकरिता ह्रतिकने मोबाइल, लॅपटॉप तसेच इतर साहित्य पोलिसांना दिले होते. चार वर्षांनंतरही या गुन्ह्याचा तपास पुढे गेला नाही. न्यायालयाने मोबाइल, लॅपटॉप तक्रारदाराला देण्याचे आदेश दिले होते मात्र तपास सुरु असल्याने ह्रतिकने ते घेतले नाही. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या गुन्ह्यांच्या तपासामध्ये लक्ष देऊन तो लवकरात लवकर संपवावा, अशी मागणी महेश जेठमलानी यांनी पत्राद्वारे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे केली. हे पत्र मिळताच आयुक्तांनी याप्रकरणाचा पुढील तपास सीआययूकडे सोपवला आहे.
बॉलिवूडचे सर्वात गाजलेले भांडण
2016 पासून सुरू असलेल्या या प्रकरणात हृतिक आणि कंगना यांनी एकमेकांविरोधात बऱ्याच तक्रारी दाखल केल्या. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप घडले. एका मुलाखतीत कंगनाने हृतिकचा उल्लेख सिल्ली एक्स म्हणून केला होता, त्यानंतर हृतिकने कंगनाला नोटीस पाठवली होती. यानंतर हृतिक आणि कंगना रिलेशनशिपमध्ये होते, असे समोर आले होते. या दोघांनी दोन चित्रपटांत एकत्र काम केले होते. 2010 मध्ये आलेल्या 'काइट्स' आणि 2013 च्या 'क्रिश 3'मध्ये हृतिक आणि कंगना एकत्र झळकले होते.
जावेद अख्तर यांनी माफी मागण्यासाठी दबाव आणला होता?
जावेद अख्तर यांनी आपल्याला घरी बोलावून हृतिक रोशनची माफी मागण्याची धमकी दिली होती, असा दावा कंगनाने केला होता. याशिवाय कंगनाची बहीण आणि मॅनेजर रंगोली चंदेल हिनेदेखील जावेद अख्तर यांनी कंगनाला धमकावल्याचा आरोप केला होता. तिने लिहिले होते, "जावेद अख्तर यांनी कंगनाला घरी बोलावले आणि हृतिक रोशनची माफी मागण्याची धमकी दिली. महेश भट्टच्या चित्रपटात सुसाइड बॉम्बरची भूमिका साकारण्यास नकार दिल्याने महेश भट्ट यांनी कंगनावर चप्पल फेकली होती. ते पंतप्रधानांना फॅसिस्ट म्हणतात .... चाचाजी तुम्ही दोघे काय आहात?", अशा आशयाची पोस्ट करुन रंगोलीने जावेद अख्तर आणि महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.