आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आई कुठे काय करते'च्या अनघाची आईसाठी खास पोस्ट:म्हणाली - वडील गेल्यानंतर आईने दीड वर्षांनंतर टिकली लावली

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून टिकलीवरुन वाद निर्माण झालाय. गेल्या आठवड्यात संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकाराला उद्देशून 'तू आधी टिकली किंवा कुंकू लावून ये त्यानंतर मी तुझ्याशी बोलेन,' असे म्हटले होते. त्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला होता. दरम्यान याच टिकलीवरुन अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने एक पोस्ट शेअर केली असून चाहते त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'आई कुठे काय करते' या मालिकेत अश्विनी अनघाची भूमिका साकारत असून तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अश्विनीने सोशल मीडियावर तिच्या आईसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अश्विनीने तिचा आईबरोबरचा टिकली लावलेला फोटो शेअर केला आहे.

मागील वर्षी अश्विनीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर तिच्या आईने टिकली लावणे सोडून दिले होते. दीड वर्षांनंतर आईने टिकली लावली आणि ती तयार होऊन घराबाहेर पडली, असे अश्विनीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. 'ठसठशीत टिकली लावणारी माझी मम्मी...' असे कॅप्शन अश्विनीने तिच्या या पोस्टला दिले आहे.

अश्विनी लिहिते, "काल साधारण नाना गेल्यानंतर दीड वर्षांनी ती घराबाहेर पडली. तिला कायम छान असे तयार व्हायला आवडायचे आणि काल मला सुद्धा वाटले की तिने आधीसारखे तयार व्हावे. कदाचित लोक काय बोलतील हा विचार जसा सगळ्यांच्याच मनात येतो तसा तिच्यासुद्धा मनात आला. पण माझ्याकडे पाहून तिने तो विचार पुरला. ती आधीसारखीच गोड दिसत होती.. पण काहीतरी कमी होते. काय? तिचे कपाळ. या आधी मी खूप वेळा तिला म्हणाले की तू लाव #टिकली. तुला आवडते न.. मग. पण ती ऐकायची फक्त.

'आई कुठे काय करते'मध्ये अनघा एकदा म्हणाली होती की, लग्नाच्या आधीसुद्धा टिकली लावतोच की मग पती गेल्यानंतर ते बंद का करायचे... मी हा विचार सहज बोलले पण परत विचार केला की तिला असे सारखे टिकली लाव बोलणे योग्य नाही. तिला वाटले तर लावेल ती.

आणि काल ती स्वतः म्हणाली, ताई.. टिकली लावू का गं?

आधी आणि आतासुद्धा आम्ही तिच्याकडून परवानगी घेतो आणि आज लोक काय बोलतील या विचारात तिने मला विचारावे? मी क्षणात म्हणाले लाव की. त्यावर सज्जूने टिकली आणून दिली आणि माझी मम्मी पुन्हा एकदा देखणी, रुबाबदार आणि अगदी नानांना जशी आवडायची तशी दिसली. रुचिका (भावा) ने तिचे, आमचे मनसोक्त फोटो काढले आणि दीड वर्षानंतर आम्ही देवदर्शनासाठी बाहेर पडलो.

काल आणखी एक अप्रतिम गोष्ट घडली. आम्ही आमच्या छकुलीचा वाढदिवस साजरा केला. काल दीड वर्षानंतर पहिल्यांदा मम्मीने कुंकू हातात घेतले, छकुलीला ओवाळले. ही आमची सगळ्यात मोठी जीत आहे असे मी मानते.

लोक काय बोलतील यापेक्षा आता तिने तिला सांभाळावे, ज्यात खंड पडला त्या गोष्टी अनाहूतपणे होत असतील तर कराव्या. तिने आनंदी राहावे. नाना देव होते आमच्या घराचे. ते कधी, कसे विसरता येईल.
तुमच्या आईला थोडा विश्वास देण्याची गरज आहे, एकदा मिठी मारण्याची गरज आहे आणि मुख्य म्हणजे आता आपण मोठे झालो आहोत तर कधीतरी त्यांचे लाड देखील करण्याची गरज आहे. फक्त प्रेम आणि आदर"

अश्विनीच्या या पोस्टवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. अप्रतिम विचार आहे ताई, अशी प्रतिक्रिया चाहते देत आहेत.

बातम्या आणखी आहेत...