आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या ट्रेनचा सीन, थोडक्यात वाचला होता आमिर खान:मुलीच्या नकारामुळे केले होते टक्कल, 'गुलाम'साठी 12 दिवस अंघोळीविना

इफत कुरेशी8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान आज 58 वर्षांचा झाला आहे. त्याच्या चित्रपट कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. वयाच्या आठव्या वर्षी 'यादों की बारात' या चित्रपटातून आमिरची अभिनय कारकीर्द सुरू झाली आणि आजतागायत ती सुरू आहे. आमिरने चित्रपटात काम करु नये, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. मात्र काका नासिर हुसेन यांनी आमिरमधील अभिनय कौशल्य ओळखले आणि आपल्या चित्रपटातून त्याला ब्रेक दिला.

'कयामत से कयामत तक'पासून ते 'लाल सिंग चढ्ढा'पर्यंत आमिरने 50 चित्रपट केले आहेत. त्याचे खासगी आयुष्यदेखील रंजक आहे. पहिल्या चित्रपटाच्या ऑडिशनवेळी एका मुलीने नकार दिल्याने आमिरने चक्क टक्कल केले होते. तर गुलाम चित्रपटाच्या क्लायमॅक्ससाठी त्याने तब्बल 12 दिवस अंघोळ केली नव्हती.

आज, आमिरच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वाचा त्याचा आजवरचा प्रवास...

आमिर खानचा जन्म 14 मार्च 1965 रोजी निर्माते ताहिर हुसैन आणि झीनत हुसैन यांच्या घरी झाला. आमिरचे पूर्ण नाव मोहम्मद आमिर हुसैन खान आहे. चार बहीणभावंडांमध्ये थोरले असलेले आमिरचे काका नासिर हुसैन हे देखील त्यांच्या काळातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. आमिरच्या वडिलांचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते, त्यामुळे त्याच्या कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता.

ताहिर हुसैन दिवाळखोर झाले होते आणि एक वेळ अशी आली की, वयाच्या 40 व्या वर्षी ते नोकरी शोधावी लागली होती. कर्जदारांचे रोज त्यांच्या घरी पैसे मागणारे फोन यायचे. फी न भरल्यामुळे शाळेतून काढून टाकले जाऊ शकते या भीतीत आमिरचे बालपण गेले.

आमिर खान शालेय जीवनात टेनिस खेळायचा. तो ज्या क्लबमध्ये खेळत असे तेथील एका मुलीवर त्याचे एकतर्फी प्रेम होते. एके दिवशी अचानक आमिरला समजले की, मुलगी त्याला न सांगता तिच्या कुटुंबासह परदेशात निघून गेली आहे. हे समजल्यावर आमिर खूप खचला होता.

हा त्याचा पहिला प्रेमभंग होता. आमिरने खचला होता, पण त्याचा फायदा असा झाला की, तो चांगला टेनिस खेळू लागला. लाल सिंग चड्ढा चित्रपटातील गाणे लाँच करताना आमिरने स्वतः हा किस्सा सांगितला होता.

पहिल्याच चित्रपटात दिसला होता परफेक्शनचा नमुना

'यादों की बारात' या चित्रपटातील एका दृश्यासाठी 8 वर्षांच्या आमिरला इमेजिन करत स्वतः गिटार वाजवायची होती. आमिरला गिटार कसे वाजवायचे हे माहित नव्हते. आमिर गिटार वाजवण्याचा सराव करत असल्याचे लक्षात येताच नासिर यांनी संपूर्ण शूट थांबवले. गिटार शिकेपर्यंत संपूर्ण युनिट आमिरची वाट पाहत होते.

हिंदी चित्रपटसृष्टीत कामासाठी खूप कष्ट घ्यावे लागते, त्यामुळे आपल्या मुलाने या व्यवसायात येऊ नये, असे ताहिर यांना वाटत नव्हते. आमिरने इंजिनियर किंवा डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती.

किशोरवयात आमिरने FTII (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) मध्ये प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली. आमिरने अभ्यासात लक्ष घालावे अशी त्यांची इच्छा असल्याने त्याच्या वडिलांनी परवानगी दिली नाही.

ताहिर हुसैन यांच्या म्हणण्यानुसार, आमिर त्यांच्याशी वाद घालू लागला आणि म्हणाला- "ज्यांना डॉक्टर व्हायचे असते, ते मेडिकल कॉलेजमध्ये जातात. मला डायरेक्टर व्हायचे आहे, त्यामुळे मला एफटीआयआयमध्ये जाण्याची परवानगी द्या." पण तरीही वडिलांनी परवानगी दिली नाही.

वयाच्या 16 व्या वर्षी आमिर त्याचा मित्र आदित्य भट्टाचार्यच्या 'पैरानिया' या मूक चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक बनला. वडिलांच्या भीतीमुळे तो गुपचूप शूटिंगला जात असे. या चित्रपटासाठी श्रीराम लागू यांनी त्यांना काही हजार रुपये दिले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिरने हिरो बनण्याचा निर्णय घेतला.

एक वर्ष थिएटरमध्ये अभिनय शिकल्यानंतर आमिरने त्याचे काका नासिर हुसेन यांना असिस्ट करायला सुरुवात केली. आमिर 'मंझिल मंझिल'मध्ये सहाय्यक दिग्दर्शक होता.

असिस्टंट डायरेक्टर असताना अमरीश पुरी यांनी सेटवर फटकारले होते

अमरीश पुरी यांनी 1985 मध्ये नासिर हुसैन दिग्दर्शित 'जबरदस्त' या चित्रपटात काम केले होते. दिग्दर्शक नासिर हुसैन यांचा पुतण्या आमिर या चित्रपटात त्यांना असिस्ट करत होता. आमिर त्यावेळी सेटवर सातत्य पाहत असे. एके दिवशी अमरीश पुरी अॅक्शन सीन शूट करत असताना वारंवार जागा बदलत होते आणि आमिर त्यांना वारंवार अडवत होता.

आमिर दिग्दर्शक नसीरचा यांचा पुतण्या आहे हे अमरीश पुरी यांना माहीत नव्हते. आमिरकडे लक्ष गेल्याने अमरीश यांना तोच सीन पुन्हा-पुन्हा शूट करावा लागला तेव्हा ते संतापले आणि त्यांनी आमिरला फटकारले. सेटवर शांतता पसरली होती.

काही वेळाने नासिर अमरीश यांच्याकडे आले आणि म्हणाले, ही आमिरची चूक नाही, तो फक्त तुमची चूक सुधारतोय. अमरीश यांना नंतर पश्चाताप झाला आणि त्यांनी आमिरची माफी मागितली.

1983 च्या सुमारास आमिर खानने मुंडण केले होते. आमिरने चित्रपटासाठीच टक्कल केल्याचे लोकांना वाटले होते. पण प्रेमभंग झाल्याने आमिरने टक्कल केले होते. खरं तर आमिरचे एका मुलीवर प्रेम होते, पण एके दिवशी ती मुलगी आमिरला मी तुझ्यावर प्रेम करत नाही असे सांगून निघून गेली. यामुळे आमिरचा प्रेमभंग झाला आणि रागात त्याने मुंडण केले होते. ही गोष्ट आमिरने स्वतः सिमी गरेवालच्या चॅट शोमध्ये सांगितली होती.

पहिला चित्रपट कसा मिळाला?

काका नासिर यांना असिस्ट करत असताना आमिरने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या अनेक माहितीपटात काम केले होते. अशाच एका माहितीपटात आमिरचा अभिनय पाहून दिग्दर्शक केतन मेहता इतके प्रभावित झाले की, त्यांनी त्यांच्या कमी बजेटच्या 'होली' चित्रपटात आमिरला कास्ट केले. आमिर या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी पोहोचला तेव्हा त्याच्या डोक्यावर केस नव्हते, कारण त्याच काळात त्याने प्रेमभंग झाल्याने टक्कल केले होते.

हा चित्रपट प्रेक्षकांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला. मात्र एका रागीट महाविद्यालयीन विद्यार्थ्याची भूमिका साकारणारा आमिरचा अभिनय प्रेक्षकांना आवडला, पण सोबतच दुबळ्या शरीरामुळे त्याला लोकांकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाला.

आमिरने त्याची बालपणीची मैत्रिण रीना दत्ता हिच्याशी 18 एप्रिल 1986 रोजी लग्न केले. 'कयामत से कयामत तक' या चित्रपटातून आमिरने पदार्पण केले होते. पण लग्नामुळे इमेज खराब होईल या भीतीपोटी त्याने लग्न अनेक वर्षे लपवून ठेवले होते. विशेष म्हणजे सुरुवातीला आमिरच्या कुटुंबीयांनाही या लग्नाची माहिती नव्हती. 'कयामत से कयामत तक' या चित्रपटात रीनाने छोटी भूमिका साकारली होती. याशिवाय ती 'लगान' या चित्रपटाची निर्मातीही आहे.

'होली' हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आमिरच्या काकांनी त्याला 1988 मध्ये आलेल्या 'कयामत से कयामत तक' या चित्रपटात कास्ट केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत जुही चावला मुख्य भूमिकेत होती. चित्रपटाचे बजेट इतके कमी होते की प्रमोशनसाठी आमिर स्वतः रस्त्यावर फिरायचा आणि पोस्टर चिकटवायचा. ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत आमिरने सांगितले की, या चित्रपटासाठी त्याला महिन्याला 1000 रुपये मिळत होते.

जुहीने किसिंग सीन देण्यास नकार दिला होता
'कयामत से कयामत तक' या पहिल्या चित्रपटातच आमिर खानने किसिंग सीन दिला होता. शूटिंगदरम्यान जुहीने आमिरसोबत किसींग सीन देण्यास नकार दिला, त्यामुळे शूटिंग थांबवावे लागले. याचे आमिरलाही खूप वाईट वाटले. नंतर दिग्दर्शक मन्सूर खान यांच्या सांगण्यावरून जुहीने होकार दिला.

रिलीजपूर्वी आमिर खानने स्वत: रस्त्यावर फिरून ठिकठिकाणी चित्रपटाचे पोस्टर चिकटवले होते. निर्मात्यांनी जाहीर केले की, जो कोणी चित्रपटासाठी 8 पेक्षा जास्त तिकिटे खरेदी करेल त्याला आमिर-जुहीचे पोस्टर भेट म्हणून मिळेल.

आमिर आणि जुही दोघांनाही स्टारडम मिळवून देणारा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने 7 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले. या चित्रपटासाठी आमिरला बेस्ट मेल डेब्यूचा पुरस्कार मिळाला. क्राइम थ्रिलर 'राख' या चित्रपटासाठी आमिरला 1989 मध्ये पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

80 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत रिमेक आणि अॅडल्ट चित्रपटांचा ट्रेंड होता, त्यामुळे बहुतेक चित्रपट फ्लॉप होत होते. दरम्यान, आमिरच्या 'कयामत से कयामत तक' या तरुण कपलच्या रोमान्समुळे हिंदी चित्रपटसृष्टीत रोमँटिक म्युझिकल ड्रामा चित्रपटांचा ट्रेंड सुरू झाला. त्यानंतर 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सारखे हिट चित्रपट आले.

1990 मध्ये आमिर खान 'अव्वल नंबर', 'तुम मेरे हो', 'दीवाना मुझसा नहीं', 'जवानी जिंदाबाद' आणि 'दिल' या पाच चित्रपटांमध्ये दिसला. 'दिल' हा 1990 चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता तर इतर 4 चित्रपट सपशेल आपटले होते.

सलग फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर, 'जो जीता वही सिकंदर', 'हम हैं राही प्यार के', 'रंगीला', 'राजा हिंदुस्तानी', 'इश्क', 'सरफरोश' यांसारखे अनेक हिट चित्रपट देत आमिरने मागे वळून पाहिले नाही.

आमिरच्या करिअरमधला 'अंदाज अपना अपना'सारखा चित्रपटही आहे, जो रिलीज झाल्यानंतर तोट्यात गेला, पण नंतर त्याला कल्ट क्लासिकचा दर्जा मिळाला.

'गुलाम' या चित्रपटात आमिरला खलनायकाने मारहाण केल्याच्या दृश्यात व्यथित अवस्थेत दिसायचे होते. हा सीन परफेक्ट करण्यासाठी आमिरने 12 दिवस अंघोळच केली नव्हती. अंघोळ न केल्यामुळे आमिर काही दिवसातच अस्वस्थ झाला होता. या चित्रपटातील ट्रेनसमोर रेसिंगच्या सीनच्या शूटिंगदरम्यान आमिर थोडक्यात बचावला होता.

आमिरला झेंडा घेऊन रुळावर येणाऱ्या ट्रेनकडे धाव घ्यायची होती. ट्रेन जवळ येताच निर्मात्यांनी आमिरला रुळावरून उतरण्यास सांगितले, मात्र आमिर धावतच राहिला. ट्रेन इतकी जवळ आली होती की, सेटवरील लोक घाबरले होते.

आमिर खानने 'राजा हिंदुस्तानी'मध्ये करिश्मा कपूरसोबत 1 मिनिटाचा किसिंग सीन दिला होता. हा त्यावेळचा सर्वात लांब किसिंग सीन होता. एका कौटुंबिक चित्रपटात इतका लांब किसिंग सीन पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, त्यामुळे निर्मात्यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले.

उटीच्या गोठवणाऱ्या पावसात चित्रित झालेला हा एक सीन शूट करण्यासाठी 4 दिवस मेहनत घ्यावी लागली. हा सीन परफेक्ट करण्यासाठी 47 टेक घेण्यात आले. करिश्माने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, शूटिंगदरम्यान ती आणि आमिर खूप अनकम्फर्टेबल होते आणि लवकरच हा सीन फायनल व्हावा यासाठी प्रार्थना करत होते, पण दुःखाची गोष्ट म्हणजे तसे होऊ शकले नाही.

'लगान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिरची भेट चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शिका किरण रावशी झाली होती. शूटिंगदरम्यान किरण आणि आमिरची जवळीक वाढली आणि पुढच्याच वर्षी आमिरने त्याची पहिली पत्नी रीनाला घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर आयरा आणि जुनैद या दोन्ही मुलांचा ताबा रीनाला मिळाला.

तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आमिरने 2005 मध्ये किरणशी लग्न केले. या लग्नापासून दोघांना एक मुलगा असून त्याचे नाव आझाद आहे, ज्याचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे. लग्नाच्या 15 वर्षांनंतर आमिरने 2021 मध्ये किरणपासून घटस्फोट घेतला.

2001 च्या 'दिल चाहता है' नंतर आमिर खानने चित्रपटांमधून 4 वर्षांचा ब्रेक घेतला. 4 वर्षांनंतर आमिरने 'मंगल पांडे: द राइझिंग' या चित्रपटाद्वारे चित्रपटांमध्ये पुनरागमन केले. त्यानंतर त्याने 'रंग दे बसंती', 'फना'सारखे सुपरहिट चित्रपट दिले. आमिरने 2007 च्या 'तारे जमीन पर' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले, यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 'लगान'नंतर आमिरची ही दुसरी निर्मिती होती.

बॉक्स ऑफिसचा बादशाह आहे आमिर
2012 मध्ये रिलीज झालेल्या आमिरच्या 'धूम 3' ने अवघ्या 3 दिवसात जगभरात 200 कोटींचे कलेक्शन केले. 10 दिवसांत या चित्रपटाने 400 कोटींची कमाई केली होती, तर त्याचे वर्ल्डवाइड कलेक्शन 552 कोटी होते. 11 वर्षांनंतरही हा चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 10 व्या क्रमांकावर आहे.

'सिक्रेट सुपरस्टार' हा भारतातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे, तर 'पीके' पाचव्या क्रमांकावर आहे. 'धूम 3' हा भारतातील दहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.

'पीके'साठी रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांकडून घेतले कपडे

'पीके' चित्रपटातील भूमिकेसाठी आमिर खानचे कपडे रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांकडून घेण्यात आले होते. चित्रपटाची डिझायनिंग टीम रोज रस्त्यावर फिरत असे आणि जो कोणी रंगीबेरंगी कपड्यात दिसायचा, त्याला ते पैसे देऊन त्याच्याकडून कपडे घेत असत. तेच कपडे आमिरने चित्रपटात परिधान केले होते. शूटिंगसाठी आमिरला दिवसातून 100 पान खावे लागले, तर ऑफ कॅमेरा तो कधीही पान खात नाही.

'दंगल'साठी वाढवले होते 27 किलो वजन

'दंगल'मध्ये महावीर सिंग फोगटची भूमिका साकारण्यासाठी आमिरने 27 किलो वजन वाढवले होते. त्याचे वजन 97 किलो झाले होते.

'तलाश' या चित्रपटासाठी पोहणे शिकला
आमिर खानने 2012 मध्ये आलेल्या 'तलाश' चित्रपटातील पाण्याखालील दृश्य शूट करण्यासाठी पोहणे शिकला होता. यासाठी त्याने तीन महिने प्रशिक्षण घेतले होते.

'लाल सिंग चढ्ढा'साठी वाढवली होती दाढी
आमिर खानने 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटातील भूमिकेसाठी दाढी वाढवली होती. यासोबतच त्याने 20 किलो वजनही वाढवले ​​होते.

पीके - 'पीके' या चित्रपटासाठी आमिरने सिनेमा हॉलमध्ये बोलके स्टँडी ठेवले होते. चित्रपट पाहण्यासाठी आलेले लोक आमिर सारख्या दिसणाऱ्या टॉकिंग स्टँडीशी बोलू शकत होते आणि त्यांना आमिरच्याच आवाजात उत्तरे मिळायची.

गजनी - चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेलेल्या आमिरने लोकांना आकर्षित करण्यासाठी तिथे उपस्थित लोकांचे केस कापण्यास सुरुवात केली. आमिरने डझनभर लोकांचे केस कापले होते.

ठग्स ऑफ हिंदोस्तान - चित्रपट रिलीज होण्यापूर्वी आमिर खानने प्रमोशनसाठी गुगल मॅपवर लोकांना रस्ता दाखवायला सुरुवात केली. प्रमोशनसाठी त्याने गुगल मॅपची मदत घेतली होती. कार किंवा बाईकच्या लोगोऐवजी नकाशात दिशा पाहणाऱ्या लोकांना आमिर खानच्या चित्रपटातील मल्लाचे पात्र दिसले, जो गाढवावर बसून दिशा दाखवत होता.

लगान - या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिर खान चित्रपटाच्या पात्रातच प्रमोशनल इव्हेंटसाठी मॉलमध्ये पोहोचायचा. केवळ आमिरच नाही तर त्याची संपूर्ण टीम ही रणनीती अवलंबत होती.

थ्री इडियट्स - थ्री इडियट्स या चित्रपटासाठी आमिर खानने वेश बदलला आणि मॉलमध्ये पोहोचला. आमिरचे विचित्र रूप पाहून मॉलच्या सुरक्षा रक्षकाने त्याला एंट्री देण्यास नकार दिला होता.

बातम्या आणखी आहेत...