आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार:22 वर्षांनंतर एका महिलेला मिळतोय हा बहुमान, पुरस्कार प्राप्त करणा-या ठरल्या 7 व्या महिला

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याची घोषणा केली. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो.

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 79 वर्षीय आशा पारेख यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. 2019 मध्ये साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

तब्बल 22 वर्षांनंतर एका महिलेला मिळतोय दादासाहेब फाळके पुरस्कार

खाद्या महिलेला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्याची ही 22 वर्षांतील पहिलीच वेळ आहे. गायिका आशा भोसले यांना शेवटचा हा पुरस्कार 2000 साली देण्यात आला होता, त्यानंतर आशा पारेख या पहिल्या महिला आहेत.

आशा पारेख यांच्या आधी आशा भोसले, लता मंगेशकर, दुर्गा खोटे, कानन देवी, रुबी मेयर्स, देविका राणी यांना हा पुरस्कार मिळाला होता. 1969 मध्ये देविका राणी हा पुरस्कार मिळवणारी पहिली अभिनेत्री होती.

आशा पारेख यांचे फिल्मी करिअर...

गतकाळातील 'ज्युबली गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री आशा पारेख यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1942 रोजी गुजरात येथील महुआ येथे एका मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात झाला. त्यांचे वडील हिंदू तर आई मुस्लिम होत्या.

वयाच्या दहाव्या वर्षी अभिनयाला सुरुवात

1959 मध्ये 'दिल देके देखो' या चित्रपटात नायिका म्हणून झळकलेल्या आशा पारेख यांची बालपणी डॉक्टर होण्याची इच्छा होती. मात्र बालकलाकाराच्या रुपात संधी मिळाल्यानंतर आशा पारेख यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. 'आसमान' (1952) या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणा-या आशा पारेख यांना या चित्रपटानंतर 'बेबी आशा पारेख' या नावाने ओळखले जाऊ लागले. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी अभिनयात पदार्पण केले होते. त्यानंतर एका स्टेज प्रोग्राममध्ये त्यांच्या नृत्याने प्रभावित होऊन दिग्दर्शक बिलम रॉय यांनी त्यांना वयाच्या बाराव्या वर्षी 'बाप बेटी' या सिनेमात घेतले.

राजेश खन्नासोबत जमली ऑनस्क्रिन जोडी...

आशा पारेख यांनी आपल्या फिल्मी प्रवासात अनेक अभिनेत्यांबरोबर काम केल. मात्र त्यांची जोडी पसंत केली गेली ती अभिनेते राजेश खन्ना यांच्याबरोबर. 'कटी पतंग' या चित्रपटात राजेश खन्ना यांच्या बरोबरची आशा पारेख यांची केमिस्ट्री लाजवाब होती. आशा पारेख यांनी शम्मी कपूर, शशी कपूर, देवानंद, अशोक कुमार, सुनील दत्त, राजेश खन्ना या नावाजलेल्या अभिनेत्यांबरोबर काम केल. शास्त्रीय नृत्यात त्या निपूण आहेत.

विजय भट्ट यांनी टॅलेंटवर उपस्थित केली शंका

'गुंज उठी शहनाई' या सिनेमाचे दिग्दर्शक विजय भट्ट यांनी आशा पारेख यांच्या टॅलेंटवर शंका उपस्थित केली होती. त्यांच्यात स्टार अपील नसल्याचे सांगून त्यांनी त्यांना आपल्या चित्रपटात कास्ट करण्यासाठी नकार दिला होता.

आशा पारेख यांचे प्रमुख चित्रपट

जब प्यार किसी से होता है (1961), घराना (1961), छाया (1961), फिर वही दिल लाया हूं (1963), जिद्‍दी (1964), मेरे सनम (1965), तीसरी मंजिल (1966), लव इन टोक्यो (1966), आये दिन बहार के (1966), उपकार (1967), महल (1969), कन्यादान (1969), आया सावन झूम के (1969), नया रास्ता (1970), कटी पतंग (1970), आन मिलो सजना (1970), मेरा गांव मेरा देश (1971), राखी और आंदोलन (1995).

अविवाहित राहिल्या

अनेक अभिनेत्यांबरोबर पडद्यावर रोमान्स करणा-या आशा पारेख यांना त्यांच्या खासगी आयुष्यात मात्र प्रेम प्राप्त होऊ शकले नाही. त्यांनी लग्न केले नाही. दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्याबरोबर आशा पारेख यांच्या प्रेमाची चर्चा इंडस्ट्रीत खूप रंगली होती. स्वतः आशा यांनी ही गोष्ट स्वीकारली होती. नासिर हुसैन अभिनेता आमिर खानचे काका होते.

अनेक पुरस्कारांच्या ठरल्या मानकरी

आशा पारेख यांना करिअरमध्ये अनेक पुरस्कार मिळाले. 'कटी पतंग' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार (1970) , पद्मश्री सन्मान (1992), जीवनगौरव पुरस्कार (2002), भारतीय सिनेमांतील उत्कृष्ट कामासाठी आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमी सन्मान (2006), भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळ महासंघ (फिक्की)च्या वतीने लिविंग लेजेंड सन्मान मिळाला.

दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल

फिल्म इंडस्ट्रीत प्रमुख अभिनेत्रीची भूमिका मिळणे बंद झाल्यानंतर त्यांनी अभिनयापासून संन्यास घेतला. त्यानंतर 1990 मध्ये 'ज्योती' या गुजराती मालिकेच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. 'आकृती' या नावाने स्वतःची प्रोडक्शन कंपनी स्थापन केली. 'कोरा कागज', 'पलाश के फूल', 'बाजे पायल' या मालिकांची त्यांनी निर्मिती केली.

मुंबईतील रुग्णालयाला आशा पारेख यांचे नाव

आशा पारेख यांच्या नावाने मुंबईतील सांताक्रूज येथे एक रुग्णालयसुद्धा असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. त्यांच्या कल्याणकारी सामाजिक कार्यांच्या आधारावर या रुग्णालयाला त्यांचे नाव देण्यात आले. याशिवाय 'कला भवन' या नावाने त्यांनी स्वतःची डान्स अकॅडमीसुद्धा आहे.

दादासाहेब फाळके पुरस्काराविषयी...

​​दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे.1969 मध्ये दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून हा पुरस्कार दिला जातोय. हा पुरस्कार माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत खात्यातर्फे दिला जातो. प्राप्तकर्त्याचा त्यांच्या "भारतीय चित्रपटांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी केलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी" सन्मान केला जातो. या पुरस्कारामध्ये सुवर्ण कमळ पदक, एक शाल आणि रोख 10,00,000 रुपये यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...