आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जोहरा जबी'चे खडतर आयुष्य:पतीच्या निधनानंतर एकाकी पडल्या होत्या अचला सचदेव, मुलांनी फिरवली होती पाठ, हलाखीच्या परिस्थितीत काढले होते अखेरचे दिवस

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अचला अखेरच्या काळात एकट्या पडल्या होत्या.

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' (1995 ) या चित्रपटातील सिमरन अर्थात काजोलच्या आजीची भूमिका साकारणा-या अभिनेत्री अचला सचदेव यांची अलीकडेच बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी होती. त्यांचा जन्म 3 मे 1920 रोजी पेशावर, पाकिस्तानात झाला होता. 30 एप्रिल 2012 रोजी पुण्यातील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या अभिनयाने एक काळ गाजवणा-या या अभिनेत्रीच्या अंतिम समयी मात्र जवळ कुणीही नव्हते. यूएसमध्ये राहणारा त्यांचा मुलगा ज्योतिन किंवा मुंबईत राहणा-या त्यांच्या मुलीने त्यांची साधी विचारपूसदेखील केली नव्हती.

पतीच्या निधनानंतर एकट्या पडल्या होत्या अचला
अचला सचदेव यांना 'वक्त' (1965) या चित्रपटासाठी ओळखले जाते. या चित्रपटात त्यांनी बलराज साहनींच्या पत्नीची भूमिका साकारली होती. अचला आणि बलराज यांच्यावर चित्रीत झालेले 'ए मेरी जोहरा जबीं' हे गाणे अतिशय लोकप्रिय झाले होते. हे गाणे आजही सिनेरसिकांच्या ओठी रेंगाळत असते. 2002 साली अचला यांचे पती क्लिफर्ड डगलस पीटर्स यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाच्या 12 वर्षांपर्यंत त्या पुण्यानजीकच्या कोणार्क इस्टेट अपार्टमेंटच्या दोन बेडरुमच्या फ्लॅटमध्ये एकट्या राहात होत्या. त्याकाळात फक्त एक अटेंडर रात्रीच्या वेळी त्यांची देखभाल करत होता.

सप्टेंबर 2011 मध्ये किचनमध्ये पडल्या आणि रुग्णालयात दाखल झाल्या
8 सप्टेंबर 2011 रोजी अचला सचदेव या किचनमध्ये पाणी घेण्यासाठी गेल्या असताना अचानक खाली कोसळल्या. पडल्याने त्यांच्या पायाचे हाड मोडले. त्यांना पुण्यातील पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. काही दिवसांतच त्यांना डिस्चार्जही मिळाला. पण अचानक अचला यांच्या मेंदुत रक्त गोठायला लागले. त्यांना क्वाड्रिप्लेजिया (पॅरालाइजचा प्रकार) झाला होता. 21 ऑक्टोबर 2011 रोजी अचला यांना उपचारांसाठी पुन्हा त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयाच्या एका बेडवर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 30 एप्रिल 2012 रोजी वयाच्या 91 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली होती. रिपोर्ट्सनुसार, अचला यांचे अखेरचे दिवस अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेले होते.

यश चोप्रा यांनी घालून दिली होती अचला आणि पीटर्स यांची भेट
रिपोर्ट्सनुसार, अचला आणि क्लिफर्ड डगलस पीटर्स यांची पहिली भेट पुण्यात झाली होती. यश चोप्रा यांनीच अचला आणि पीटर्स यांची भेट घालून दिली होती. त्याकाळात पीटर्स यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते, तर अचला या घटस्फोटित होत्या. पहिल्या भेटीनंतर काही दिवसांनी दोघांनी लग्न केले होते. पीटर्स हे मॅकेनिकल इंजिनिअर होते आणि भोसरीमध्ये त्यांची फॅक्ट्री होती. पुण्यातील हडपसर या भागात शिफ्ट होण्यापूर्वी त्यांचा भोसरी येथे बंगला होता. ज्योतिन हा अचला आणि त्यांच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे. अचला यांच्या निधनापुर्वी ज्योतिन फार क्वचितच त्यांना भेटायला येत असे. 2006 मध्ये अचला त्यांच्या नातीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी यूएसला गेल्या होत्या.

अचला यांचे गाजलेले चित्रपट
आरजू (1965), वक्त (1965), मेरा नाम जोकर (1970), हरे रामा हरे कृष्णा (1971), चांदनी (1989), दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (1995), कभी खुशी गम (2001), कल हो न हो (2003)

बातम्या आणखी आहेत...