आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगना रनोटला झटका:जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांकडून कंगनाला समन्स, चौकशीसाठी उद्याच राहावे लागणार हजर

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या काय आहे हे संपूर्ण प्रकरण...

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटला हिला मुंबई पोलिसांनी समन्स बजावला आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाविरुद्ध मानहानीचा दावा केला आहे. त्यानंतर या प्रकरणी जुहू पोलिसांकडून कंगनाला समन्स बजावण्यात आला आहे. एका मुलाखतीत कंगनाने जावेद अख्तर यांच्याविषयी भाष्य केले होते. कंगनाने आपल्या प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न केल्याचे म्हणत जावेद अख्तर यांनी तिच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. डिसेंबर 2020 मध्ये अंधेरी कोर्टात हा दावा दाखल झाला होता. समन्स बजावल्यानंतर 22 जानेवारीला म्हणजे उद्याच जुहू पोलिस ठाण्यात कंगनाला चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे.

कोर्टाकडून पोलिसांना अहवाल सादर करण्यासाठी मिळाली होती मुदत वाढ
मुंबईच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने जावेद अख्तर यांनी कंगना रनोट हिच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यासंदर्भात चौकशीचे आदेश पोलिसांना दिले होते. 16 जानेवारी रोडी झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने पोलिसांना त्यांचा अहवाल सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत वाढवून दिली. सुनावणीत जुहू पोलिसांनी चौकशीसाठी आणि अहवाल सादर करण्यासाठी कोर्टाकडे मुदत वाढवण्याची विनंती केली होती. यावर कोर्टाने पोलिसांना 15 दिवसांचा कालावधी दिला असून आता या याचिकेवर येत्या 1 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

जुहू पोलिसांना 16 जानेवारी रोजी अहवाल सादर करायचा होता
यापूर्वी 19 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान जावेद अख्तर यांच्या वकिलांनी कोर्टात आपली बाजू मांडून त्याची दखल घेण्याची विनंती केली होती. सुनावणीनंतर कोर्टाने जुहू पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आणि 16 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाचा हा आदेश क्रिमिनल प्रोसिजर कोड सेक्शन 202 अंतर्गत आला होता.

जावेद अख्तर यांनी कंगनावर लावले हे आरोप

  • जावेद अख्तर यांनी त्यांचे वकील निरंजन मुंदर्गी यांच्यामार्फत 2 नोव्हेंबर रोजी तक्रार दिली. अख्तर यांनी अंधेरी येथील महानगर दंडाधिकाऱ्यांसमक्ष ही फौजदारी तक्रार केली असून कंगनाविरुद्ध भारतीय दंड विधानातील मानहानी संबंधी कलमांखाली कारवाई करण्यात यावी, अशी विनंती कोर्टाकडे केली.
  • कंगना रनोटने माझ्याबद्दल निराधार वक्तव्ये केली असून यामुळे माझ्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे, असे अख्तर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
  • अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित वादात कंगनाने माझे नाव नाहक ओढले, असा आरोपही अख्तर यांनी केला आहे.
  • हृतिक रोशन प्रकरणात माफी मागण्यासाठी घरी बोलावून दमदाटी केल्याचा धादांत खोटा आरोपही तिने माझ्यावर केला असून या सर्वाची गंभीर दखल घेत कंगनावर फौजदारी खटला चालवावा, अशी विनंती अख्तर यांना कोर्टाकडे केली.
  • 3 डिसेंबर रोजी दंडाधिकारी न्यायालयाने जावेद अख्तर यांचा जबाब नोंदवला होता.

कंगनाने मुलाखतीत काय म्हटले होते?
कंगनाने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूडवर गंभीर आरोप केले होते. घराणेशाहीमुळे बॉलिवूडची वाट लागली आहे. बॉलिवूडमध्ये माफियाराज पसरले आहे, असा आरोप कंगनाने केला होता. त्यात दिग्दर्शक महेश भट आणि जावेद अख्तर यांच्यावरही तिने गंभीर आरोप केले होते. हृतिक रोशन आणि कंगना रनोट यांच्यात मोठा वाद भडकला होता. या प्रकरणात बोलू नये म्हणून अख्तर यांनी माझ्यावर दबाव टाकला. मला हृतिक आणि त्याच्या कुटुंबीयांची माफी मागायला सांगितले. तसे केले नाही तर तुला ते जेलमध्ये टाकतील, अशी दमदाटी अख्तर यांनी केल्याचे कंगनाने मुलाखतीत जाहीरपणे सांगितले होते.

कंगनाची बहीण रंगोली हिनेसुद्धा सोशल मीडियावर असेच आरोप केले होते. त्यामुळेच अख्तर यांनी कायदेशीर पाऊल उचलले आहे. रंगोलीने सोशल मीडियावर दावा केला होता की, "जावेद अख्तर यांनी कंगनाला घरी बोलावले आणि हृतिक रोशनची माफी मागण्याची धमकी दिली. महेश भट्टच्या चित्रपटात सुसाइड बॉम्बरची भूमिका साकारण्यास नकार दिल्याने महेश भट्ट यांनी कंगनावर चप्पल फेकली होती. ते पंतप्रधानांना फॅसिस्ट म्हणतात .... चाचाजी तुम्ही दोघे काय आहात?", अशा आशयाचे ट्विट करुन रंगोलीने जावेद अख्तर आणि महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधला होता.

बातम्या आणखी आहेत...