आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:अभिनेता साईप्रसाद गुंडेवार अनंतात विलीन, निधनाच्या आठवड्याभरानंतर अमेरिकेत दहा नातेवाईकांच्या उपस्थितीत झाले अंत्यसंस्कार 

लॉस एंजिलिसएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • साई गुंडेवारने वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

'पीके', 'रॉक ऑन' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेला प्रसिद्ध अभिनेता साई गुंडेवार अनंतात विलीन झाला आहे. 10 रोजी सकाळी 7:30 वाजता  अमेरिकेतील लॉस एंजिलिस येथील इस्पितळात 'ग्लायोब्लास्टोमा' या कर्क रोगाने त्याचे निधन झाले होते. 

अमेरिकेतील वाढत्या कोरोना संसर्गामुळे साई यांच्यावरील अंत्यसंस्कार एका आठवड्यानंतर करण्याची अमेरिका प्रशासनाने दिली होती. त्यानुसार 16 रोजी लॉस एंजिलिस येथील 'ग्लेनडेल फ्युनरल होम'मध्ये त्यांच्यावर हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाने दहा नातेवाईकांना यावेळी उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. साई गुंडेवारचे वडील राजीव गुंडेवार यांनी अंत्य विधी पूर्ण केले व त्यांच्या पत्नी सपना अमीन यांनी साई यांच्या आठवणी जागवल्या. त्याच्या जगभरातील चाहत्यांनी त्याला ऑनलाईन माध्यमातून श्रद्धांजली वाहून दुःख व्यक्त केले.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटर हँडलवरुन साईच्या निधनाची बातमी दिलीहोती. 'पीके'सारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते साईप्रसाद गुंडेवार यांची कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी ठरली. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपट सृष्टीने हरहुन्नरी अभिनेता गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!, असे ट्विट त्यांनी केले होते.

एमटीव्हीच्या स्प्लिट्स व्हिला पर्व चार, स्टार प्लसवरील सर्व्हायवर तसेच अमेरिकेतील लोकप्रिय एस.डब्ल्यू.ए.टी. , कॅग्नी अँड लॅसी, द ऑरव्हिले, मार्स कॉस्पिरसी,  द कार्ड मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका त्याने केल्या आहेत. यासह 'रॉक ऑन', 'पप्पू कान्ट डान्स साला', 'लव्ह ब्रेकअप जिंदगी', 'डेव्हिड', 'आय मी और मैं', 'पीके','बाजार' या  हिंदी चित्रपटांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली. सोबतच काही हॉलिवूडच्या चित्रपट व लघुपटांमध्ये आणि विविध जाहिरातपटांमध्ये त्याने भूमिका केल्या आहेत. तसेच डॉ. मीना नेरुरकर यांच्या 'ए डॉट कॉम मॉम' या मराठी चित्रपटात त्याची प्रमुख भूमिका होती. त्याच्या पश्चात पत्नी फॅशन डिझायनर सपना अमीन, आई शुभांगी व राजश्री, वडील राजीव गुंडेवार असा परिवार आहे.  

बातम्या आणखी आहेत...