आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी म्हणजे 7 एप्रिल रोजी अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना एक मोठे सरप्राइज मिळाले आणि ते म्हणजे त्याच्या बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला. टिझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चाहते अल्लू अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेनेदेखील अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी 'पुष्पा 2'चा टिझर शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. श्रेयसनेच अल्लू अर्जुनच्या पात्रासाठी डबिंग केले आहे. श्रेयसने आपल्या पोस्टमध्ये डबिंगचा अनुभव देखील शेअर केला आहे.
'पुष्पा 2' चा टिझर शेअर करत श्रेयसने लिहिले, "अब रुल पुष्पा का… और पुष्पा कभी झुकेगा नही साला… अल्लू अर्जुन, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा हा दिवस आणि येणारी सगळी वर्ष या टिझरसारखीच जबरदस्त जावो."
पुढे डबिंगचा अनुभव शेअर करताना श्रेयसने लिहिले, "एक दिवस मी ती शेवटची ओळ डब करण्यासाठी गेलो आणि पुन्हा सर्व आठवणी माझ्या मनात जाग्या झाल्या. काय सुरेख अनुभव होता तो!" असे श्रेयस म्हणाला आहे.
यूट्यूबवर ट्रेंड करतोय टिझर
'पुष्पा 2' चा टिझर 7 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजता रिलीज करण्यात आला. हा टिझर यूट्यूबवर ट्रेडिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. 19 तासांत त्याला 21 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. प्रेक्षकांनी व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने तब्बल 125 कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे.
या चित्रपटाचा पहिला भाग 'पुष्पा द राइज' हा चित्रपट 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता अल्लू अर्जुनचे चाहते 'पुष्पा 2' म्हणजेच 'पुष्पा द रुल' या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. विशेष म्हणजे 'पुष्पा 2' मध्ये काही बॉलिवूडमधील कलाकार देखील काम करणार आहेत, अशी चर्चा आहे. या चित्रपटात सलमान खान आणि अजय देवगण हे महत्वाची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.