आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

निराशा:सोनू सूदला वांद्रे टर्मिनलला जाण्यापासून पोलिसांनी रोखले; सोनू म्हणाला - परवानगी दिली नसल्याचा मला फरक पडत नाही

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनू सूदला बाहेरुनच स्थलांतरित मजुरांना निरोप द्यावा लागला.

अभिनेता सोनू सूदने आतापर्यंत हजारो स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवले आहे. यासाठी त्याने खास बस, ट्रेन,विमानाची सोय केली. स्थलांतरितांसाठी बस किंवा ट्रेनची व्यवस्था केल्यानंतर सोनू स्वत: जाऊन त्यांची भेट घेतो आणि त्यांना निरोप देतो. सोमवारीदेखील सोनू मजुरांना निरोप देण्यासाठी वांद्रे टर्मिनलला पोहोचला होता. पण येथे यावेळी काही वेगळेच चित्र बघायला मिळाले.

झाले असे की, सोमवारी सोनू सूदने उत्तर प्रदेशच्या आजमगड येथे जाण्यासाठी मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ट्रेनची व्यवस्था केली होती. वांद्रे टर्मिनलहून हे मजूर त्यांच्या गावी निघणार होते. सोनू त्यांना भेटण्यासाठी येथे पोहोचला होता. पण जेव्हा सोनू मजुरांना निरोप देण्यासाठी वांद्रे टर्मिनसला पोहोचला तेव्हा मात्र त्याला रेल्वे पोलिसांनी प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे सोनूला बाहेरुनच त्यांना निरोप द्यावा लागला.  

याबाबत एबीपी न्यूजशी बोलताना सोनू सूद म्हणाला, “परवानगी दिली नसल्याचा मला फरक पडत नाही. मला प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी मिळाली की नाही हे महत्त्वाचे नसून माझे काम मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवणे आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी येथे आलो होतो”.

सोनूच्या मदतीवरुन पेटले आहे राजकारण 

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून सोनू परप्रांतिय मजुरांना त्यांच्या गावी पाठवतोय. यासाठी तो स्वःखर्चाने बस, ट्रेन आणि विमानाची सोय करतोय. पण आता सोनू सूद करत असलेल्या मदतीवरून सध्या चांगलंच राजकारण पेटले आहे. भाजपा-शिवसेना हे दोन्ही पक्ष सोनू सूदच्या मदतीवरून एकमेकांसमोर आले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तील लेखात सोनूवर टीका केल्यानंतर रविवारी सोनू सूदने ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेटसुद्धा घेतली होती.

काय म्हणाले होते संजय राऊत?  

आतापर्यंत सोनूने कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, ओडीशा, देहारादून अशा विविध भागातील कामगारांना मदत केली. सोशल मीडियावर सोनूच्या कामगिरीचं कौतुकही होत गेलं. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या ‘सामना’मधील लेखातून सोनूच्या या बचावकार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.

सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असे संजय राऊत यांनी आपल्या सामनातील लेखात म्हटले. “महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचे नाव घेतले जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरले, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले. त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले,” अशी खोचक टीका त्यांनी आपल्या लेखातून केली.

सोनू सूद पडद्यावर आणि रस्त्यावर उत्तम अभिनय करतो. कारण पडद्यामागचे राजकीय दिग्दर्शक तितकेच कसलेले होते. सोनू सूद यांचा पुढील राजकीय चित्रपट कोणता ? त्याचा खुलासा लवकरच होईल, असे म्हणत राऊत यांनी सोनू सूदच्या माध्यमातून राजकारण करणाऱ्यांना खडे बोल सुनावले.

संजय राऊत यांनी सोनू सूद आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरही केले होते ट्विट

सोनू सूदने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यांच्या भेटीची छायाचित्रे आदित्य ठाकरे यांनी ट्विटर हँडलवर शेअर केली होती.  या भेटीनंतर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सोनूवर टीकास्त्र सोडत एक ट्विट केले होते. अखेर सोनू सूद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला. मातोश्रीवर पोहोचले, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते.

सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्थलांतरित मजुरांसाठी केलेल्या कामाबद्दल सोनू सूदचे कौतुक केले होते आणि त्याच्या कार्यावर महाराष्ट्र सरकारच्या टीकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

0