आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विनयभंग प्रकरण:अभिनेता विजय राजने मांडली आपली बाजू, म्हणाला - 'खूप कष्टाने माझे घर उभे केले, तपासाआधीच लोकांनी मला दोषी ठरवले'

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2 नोव्हेंबर रोजी विजय राजला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

अभिनेत्री विद्या बालनच्या आगामी 'शेरनी' या चित्रपटाच्या शूटिंग सेटवरुन काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली होती. या चित्रपटातील एका महिला सहका-याने अभिनेता विजय राजवर विनयभंगाचा आरोप लावला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटकदेखील केली होती. आता पंधरा दिवसांनी विजय राजने त्याच्यावर असलेल्या आरोपांवरुन मौन सोडले आहे.

2 नोव्हेंबर रोजी विजय राजला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुस-या दिवशी जामिनावर त्याची सुटका झाली होती. अलीकडेच विजयने बॉम्बे टाइम्सला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने घडलेला प्रकार सांगितला आहे.

विजय राज म्हणाला, ‘मी खूप मेहनत घेऊन माझे करिअर घडवले आहे. खूप कष्टाने माझे घर उभे केले. कोणीही येऊन कोणाचे करिअर कसे उद्ध्वस्त करू शकतो? कोणी काही तरी बोलले आणि तुम्ही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवलात? समोरच्या व्यक्तीकडून काय झाले हे जाणून घेण्याआधीच तुम्ही मला दोषी ठरवले’, अशी खंत त्याने व्यक्त केली आहे.

तो पुढे म्हणाला, 'महिला सुरक्षा ही खरंच चितेंची बाब आहे. मी फिल्म इंडस्ट्रीत मागील 23 वर्षांपासून काम करतोय. माझी स्वतःची 21 वर्षांची मुलगी आहे. मला या प्रकरणातील गांभीर्य समजतंय. मी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे. मात्र चौकशीआधीच मला चित्रपटातून काढून टाकणे हे हैराण करणारे आहे', असे विजय राजने म्हटले.

काय आहे संपूर्ण प्रकरण
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मध्य प्रदेशातील बालाघाट येथे शेरनी या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. शूटिंगसाठी विजय राजसह संपूर्ण टीम गाेंदियात आली होती. हॉटेल गेटवेमध्ये ही टीम थांबली होती. सेटवर चित्रीकरण सुरू असताना विजय राजने आपला विनयभंग केल्याचा आरोप 30 वर्षीय महिला कलाकाराने केला. याप्रकरणी 2 नोव्हेंबर रोजी त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. गोंदियाचे पोलिस उपाधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितल्यानुसार, विजय राजविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 2 नोव्हेंबरच्या रात्री त्याला अटक करण्यात आली. तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर 3 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने त्याला जामीन दिला.

ड्रग्ज प्रकरणात दुबईत झाली होती अटक
यापूर्वी विजय राजला 2005 मध्ये दुबईमध्ये ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. नंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली होती.

'कौवा बिर्याणी' दृश्यासाठी प्रसिद्ध

विजय राजने 1999 मध्ये 'भोपाल एक्स्प्रेस' या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 5 जून 1963 रोजी अलाहाबाद येथे जन्मलेल्या विजय राजने दिल्लीतून आपले शिक्षण पूर्ण केले होते. त्याच्या 'रघू रोमियो' या चित्रपटाला 2003 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

'रन' या चित्रपटामधील 'कौवा बिर्याणी' सीनसाठी विजय राज खूप लोकप्रिय झाला होता. धमाल, वेलकम, दीवाने हुए पागल, रघु रोमियो, मुंबई एक्स्प्रेस, बॉम्बे टू गोवा आणि मान्सून वेडिंग हे त्याचे गाजलेले चित्रपट आहेत.

बातम्या आणखी आहेत...