आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट हिच्या विरोधात गीतकार जावेद अख्तर यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. याप्रकरणी झालेल्या आजच्या सुनावणीला कंगना मुंबईतील अंधेरी न्यायालयात हजर होती. कंगनापूर्वी जावेद अख्तर हेदेखील साक्ष देण्यासाठी न्यायालयात पोहोचले होते. दोघेही एकमेकांसमोर होते, पण ते एकमेकांशी काहीही बोलले नाहीत. न्यायालयात कंगनाने संपूर्ण वेळ चष्मा घातला होता. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी कंगनाला फक्त तिचे नाव विचारले. न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान कंगनाच्या वकिलांनी प्रतिवाद अर्जाचा मुद्दा न्यायालयासमोर ठेवला, त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 15 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे.
न्यायालयाने दिला होता कंगनाला इशारा
यापूर्वी 14 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होती. या सुनावणीला जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी शबाना आझमी न्यायालयात उपस्थित होते. परंतु कंगना या सुनावणीला पुन्हा एकदा गैरहजर होती. न्यायालयाने कठोर शब्दांत कंगनाला समज देत म्हटले होते की, पुढील सुनावणीवेळी जर ती न्यायालयात हजर राहिली नाही तर तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले जाईल. न्यायालयाने दिलेल्या इशा-यानंतर कंगना रनोट आज (20 सप्टेंबर) सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाली.
कोरोना चाचणी करता यावी यासाठी 14 सप्टेंबरच्या सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा देण्याची विनंती कंगनाच्या वतीने न्यायालयाला करण्यात आली होती. परंतु कंगनाच्या मागणीला जावेद अख्तर यांच्यातर्फे विरोध करण्यात आला होता. तसेच आतापर्यंत कंगना एकाही सुनावणीला हजर झालेली नाही. या उलट आपण प्रत्येक सुनावणीला हजर राहात आहोत. त्यामुळे सतत गैरहजर राहणाऱ्या कंगनाविरोधात अटक वॉरंट बजावण्याची मागणी अख्तर यांच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर पुढील सुनावणीला कंगना गैरहजर राहिल्यास तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात येईल, अशा इशारा न्यायालयाने दिला होता. न्यायालयाने सर्वप्रथम फेब्रुवारीमध्ये कंगनाविरोधात समन्स बजावले होते, तेव्हापासून ती सतत न्यायालयात सुनावणीला गैरहजर राहत होती.
कंगनाच्या वतीने दाखल करण्यात आले काऊंटर अॅप्लीकेशन
आजच्या कारवाईपूर्वी कंगनाच्या वकिलांनी तिच्या वतीने न्यायालयात काऊंटर अॅप्लीकेशन दाखल केले आहे. हा अर्ज स्वीकारून न्यायालयाने सुनावणी 15 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे. यासोबतच कंगनाने केस ट्रान्सफर याचिकाही दाखल केली आहे. कंगना रनोट म्हणाली, "न्यायालयाने साक्षीदारांची तपासणी न करता, सुनावणीशिवाय दोनदा वॉरंट जारी केला आहे. या न्यायालयावरुन विश्वास उडाला आहे.' अभिनेत्रीने दाखल केलेल्या अर्जात जावेद अख्तर यांच्याविरोधात खंडणीच्या आयपीसीच्या कलम 383, 384, 387, 503, 506, आर/डब्ल्यू 44, 33 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दाखल करण्यात आला होता गुन्हा
मुलाखतीत कंगना काय म्हणाली होती?
एका एंटरटेन्मेंट वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली होती की, जावेद अख्तर यांनी तिला घरी बोलावून धमकी दिली होती. कंगनाच्या म्हणण्यानुसार, अख्तर म्हणाले होते की राकेश रोशन आणि त्याचे कुटुंब मोठे लोक आहेत. जर तू (कंगना) माफी मागितली नाही तर ते तुला तुरूंगात टाकतील.
यापूर्वी कंगनाची बहीण रंगोली चंदेलनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दावा केला होता. तिने लिहिले होते, 'जावेद अख्तर यांनी कंगनाला घरी बोलावले आणि हृतिक रोशनची माफी मागण्याची धमकी दिली. महेश भट्ट यांनी कंगनावर चप्पल फेकली होती, कारण तिने भट्ट यांच्या चित्रपटात सुसाइड बॉम्बरची भूमिका निभावण्यास नकार दिला होता.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.