आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनी लाँड्रिंग प्रकरणी नोराची चौथ्यांदा चौकशी:आता दिल्ली पोलिसांनी 6 तासांत 50 प्रश्न विचारले; म्हणाली - जॅकलिनशी माझा संबंध नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्ली पोलिसांनी केली सलग 6 तास चौकशी
  • जॅकलिनने केला होता पक्षपाताचा आरोप

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) शुक्रवारी तिहार तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेहीची चौकशी केली आहे. शुक्रवारी चौथ्यांदा नोराची चौकशी झाली. पोलिसांनी तब्बल सहा तास नोराची चौकशी करत तिला 50 प्रश्न विचारले. यात सुकेशकडून भेटवस्तू कधी घेतल्या? तू त्याला कुठे भेटली? असे काही प्रश्न होते. नोराने संपूर्ण चौकशीत सहकार्य केले.

या प्रकरणात नोरा साक्षीदार आहे. सुकेश चंद्रशेखरकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप तिच्यावर आहे. दुसरीकडे याच प्रकरणात ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला आरोपी बनवले आहे. ईडीने तिला 26 तारखेला चौकशीसाठी बोलावले आहे. हे संपूर्ण प्रकरण 200 कोटींच्या फसवणुकीशी संबंधित आहे.

नोराने पोलिसांना उत्तर दिले की, 'मी सुकेशच्या पत्नीला एका नेल आर्ट फंक्शनमध्ये भेटले होते. इथेच त्यांनी मला बीएमडब्ल्यू कार भेट दिली. दोघांचा गुन्हेगारी इतिहास मला माहीत नव्हता.' यासोबतच नोरा म्हणाली की, 'माझा जॅकलिनशी कोणताही संबंध नाही.' दिल्ली पोलिसांनी जॅकलिनला समन्स बजावले असून तिला 12 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे.

नोराने कार गिफ्ट मिळाल्याची कबुली दिली होती
200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या चौकशीत समोर आले आहे की, आरोपी सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांना आलिशान कारसह अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. 14 ऑक्टोबर 2021 रोजी नोरा आणि सुकेश यांची समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली होती. यादरम्यान खुद्द नोराने 1 कोटींहून अधिक किमतीची आलिशान कार भेट म्हणून घेतल्याची कबुली दिली होती. यापूर्वी या प्रकरणी नोराची तीन वेळा चौकशी करण्यात आली आहे.

मनी लाँड्रिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल
सुकेशची पत्नी लीना पॉलने चेन्नईतील एका कार्यक्रमात सहभागी झाल्याच्या बदल्यात नोरा फतेहीला एक बीएमडब्ल्यू कार आणि आयफोन भेट म्हणून दिला होता. मनी लाँड्रिंग कायदा 2002 च्या कलम 50(2) आणि 50(3) अंतर्गत या प्रकरणात नोराचा जबाब नोंदवण्यात आला. यामध्ये तिने स्वत:वरील आरोप फेटाळून लावले होते.

नोराचे नाव घेत जॅकलिनने केला होता पक्षपाताचा आरोप
ईडीने 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात सुकेश चंद्रशेखरविरुद्ध दिल्ली न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे आरोपी म्हणून नाव दिले आहे. याप्रकरणावर काही दिवसांपूर्वी जॅकलिनने मौन सोडले होते. ‘सुकेश चंद्रशेखरकडून भेटवस्तू स्वीकारणाऱ्या सेलिब्रिटींना साक्षीदार बनवले आहे. तर मला आरोपी केले आहे’, असे जॅकलिनने म्हटले होते. अपील प्राधिकरणासमोरील याचिकेत जॅकलिनने हे सांगितले होते. मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरकडून भेटवस्तू घेतलेली नोरा फतेही आणि इतर सेलिब्रिटी आरोपी असताना साक्षीदार बनवल्याचे जॅकलिनने म्हटले होते.

जॅकलिनवर सुकेशकडून 5.71 कोटी घेतल्याचा आरोप
17 ऑगस्ट रोजी पटियाला कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलिनवर सुकेशकडून 5.71 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. सुकेशच्या कामाची माहिती असतानाही जॅकलिन सुकेशकडून भेटवस्तू घेण्याच्या प्रकरणात स्वत:ला पीडित म्हणून दाखवत आहे, असेही ईडीने म्हटले आहे. याप्रकरणी ईडीने जॅकलिनलाही सहआरोपी केले आहे.

काय आहे 200 कोटींची फसवणूक प्रकरण?
सुकेश चंद्रशेखरशी संबंधित प्रकरणात प्रथम दिल्ली पोलिसांत एफआयआर नोंदवण्यात आला होता. दिल्ली ईओडब्ल्यूने ऑगस्टमध्ये त्या एफआयआरची चौकशी सुरू केली. या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचीही चौकशी सुरू केली होती. रॅनबॅक्सीचे माजी प्रमोटर शिविंदर सिंग आणि मालविंदर सिंग यांना तुरुंगातून बाहेर काढण्याच्या बहाण्याने त्यांच्या पत्नींकडून 200 कोटींहून अधिकची फसवणूक केल्याचा सुकेशवर आरोप आहे.

सुकेश कधी स्वतःला पंतप्रधान कार्यालयाशी तर कधी गृहमंत्रालयाशी संबंधित अधिकारी म्हणवून घेत असे. या फसवणुकीत तिहार तुरुंगातील अनेक अधिकारीही सहभागी होते. सुकेश या सर्वांना मोठी रक्कम द्यायचा. ईडीने तपासादरम्यान सुकेशचा चेन्नईतील सी-फेसिंग बंगला जप्त केला होता. बंगल्यातून 82.5 लाख रुपये, 2 किलो सोने आणि 12 पेक्षा जास्त आलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत.

कोण आहे कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर?
सुकेश चंद्रशेखर हा बंगळुरू येथील रहिवासी आहेत. लॅव्हिश लाइफस्टाइल जगण्यासाठी त्याने वयाच्या 17 व्या वर्षापासून लोकांची फसवणूक सुरू केल्याचे सांगितले जाते. बंगळुरूमध्ये फसवणूक केल्यानंतर त्याने चेन्नई आणि इतर शहरातील लोकांनाही टार्गेट केले. सुकेश हा उच्चभ्रू लोकांना फोन करायचा आणि स्वतः मोठा सरकारी अधिकारी असल्याचे सांगायचा. 2007 मध्ये त्याने बंगळुरू डेव्हलपमेंट अथॉरिटीमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात 100 हून अधिक लोकांची फसवणूक त्याने केली होती, यावेळी त्याने स्वत:ला बडा सरकारी अधिकारी असल्याचे सांगितले होते. याप्रकरणी सुकेशला अटकही करण्यात आली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर सुकेशने पुन्हा लोकांना फसवण्याचे काम सुरू ठेवले. सुकेशवर 30 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

बातम्या आणखी आहेत...