आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे बुधवारी (12 एप्रिल) निधन झाले आहे. त्या 79 वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. अभिनयाबरोबरच त्यांनी अभिनयाचे धडेही दिले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्यांनी अनेक वर्षे अध्यापनाचे काम केले होते.
1986 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण
उत्तरा बावकर यांनी 1986 मध्ये आलेल्या 'यात्रा' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 1987 मध्ये आलेल्या 'तमस' या मालिकेने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली होती. मालिकांसह अनेक गाजलेल्या हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. ‘एक दिन अचानक’, ‘रुक्मावती की हवेली’, ‘द बर्निंग सीजन’, ‘सरदारी बेगम’ या चित्रपटांमधून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
उत्तरा बावकर यांनी सुमित्रा भावे यांच्या अनेक चित्रपटात काम केले होते. 1995 मध्ये ‘दोघी’ या मराठी चित्रपटात त्या झळकल्या होत्या. ‘वास्तूपुरुष’ (2002), ‘उत्तरायण’ (2003), ‘शेवरी’ (2006), ‘रेस्टोरेंट’ (2006) यांसारख्या मराठी चित्रपटातही त्या झळकल्या होत्या. अलीकडच्या काळात आलेल्या 'दिठी' या चित्रपटातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.
कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली
उत्तरा बावकर यांच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेता मनोज बाजपेयीने उत्तरा बावकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने ट्वीट केले, 'त्यांची प्रतिभा अनेकवेळा रंगमंचावर पाहण्याचे सौभाग्य लाभले! तुमची कायम आठवण येईल उत्तरा जी! तुमच्या आत्म्याला शांती लाभो!'
यासोबतच गायिका इला अरुण यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, "मी उत्तराजींना पहिल्यांदा NSD मध्ये भेटले होते. तिथे मी शॉर्ट टर्म कोर्स करत होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आणि आवाजाने मी प्रभावित झाले. नंतर गोविंद निहलानींच्या 'तमस' आणि 'रुक्मावती की हवेली'मध्ये त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली, यात त्यांनी रुक्मावतीची मुख्य भूमिका साकारली होती. तर मी त्यांच्या थोरल्या मुलीच्या भूमिकेत होते. त्यांच्या निधनाने न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आम्ही सर्व त्यांना ओळखत होतो. त्यांची कायम आठवण येईल," अशा शब्दांत इला अरुण यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेते मनोज जोशी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'उत्तरा बावकर यांच्या निधनाने भारतीय मनोरंजनसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे,' असे ते म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.