आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारामनवमीच्या मुहुर्तावर दिग्दर्शक ओम राऊत यांनी त्यांच्या आगामी 'आदिपुरुष' या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित केले होते. पण आता याच पोस्टरमुळे ओम राऊतसह चित्रपटातील कलाकार अडचणीत सापडले आहेत. याच पोस्टरमुळे दिग्दर्शक ओम राऊत, अभिनेता प्रभास, क्रिती सेनन तसेच चित्रपटातील कलाकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये हिंदू पौराणिक कथांचे पात्र चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याने लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे म्हटले आहे.
सनातन धर्माचे संत संजय दीनानाथ तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत मुंबईतील साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ओम राऊत आणि सर्व कलाकारांविरुद्ध आयपीसीच्या कलम 295 (अ), 298, 500, 34 अन्वये मुंबईतील साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदारांचे काय आहे म्हणणे?
तक्रारदार संजय दीनानाथ यांच्या म्हणण्यानुसार, 'रामचरित्रमानस' या पवित्र ग्रंथातील मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या चरित्रावर 'आदिपुरुष' चित्रपट बनवण्यात आला आहे. त्यांनी आरोप केला की 'आदिपुरुष'च्या नवीन पोस्टरमध्ये भगवान राम यांना हिंदू धर्मग्रंथ रामचरित्र मानसमध्ये जसे दाखवले आहे त्याच्या परस्पर विरुद्ध चित्रपटात दाखवण्यात आले आहे. तसेच चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रामायणातील सर्व कलाकारांना जानवं न घालता दाखवण्यात आले आहे आणि ते चुकीचे आहे, असेही तक्रारकर्त्याने म्हटले आहे.
शिवाय रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये क्रिती सेननच्या भांगात कुंकू नाही. बॉलिवूड चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी हे जाणूनबुजून केले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी आदिपुरुषच्या निर्मात्यांनी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर नवीन पोस्टर रिलीज केले होते. पोस्टरमध्ये प्रभास आणि सनी धनुष्यबाणांसह चिलखत आणि धोतर परिधान केलेले दिसत आहेत. तर क्रितीने साधी केशरी रंगाची साडी नेसली असूनन डोक्यावरून पदर घेतला आहे. तर देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत असून तिघांच्याही सेवेत नतमस्तक होताना दिसतात.
16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे चित्रपट
हा चित्रपट सर्वप्रथम 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. पण काही तांत्रिक कारणास्तव आणि लोकांचा विरोध पाहता याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट 16 जून 2023 रोजी चित्रपटगृहात थ्रीडी मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. हिंदीबरोबरच तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.