आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. नुकतेच रामनवमीच्या मुहूर्तावर चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले होते. आता आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने निर्मात्यांनी चित्रपटाचे आणखी एक पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमधून चित्रपटातील हनुमानाचा लूक समोर आला आहे.
मराठमोळा अभिनेता हनुमानाच्या भूमिकेत
ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’मध्ये प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हनुमानाची भूमिका साकारताना दिसणार आहे. दिग्दर्शक ओम राऊत, अभिनेता प्रभाससह देवदत्त नागेने आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे पोस्टर रिलीज केले आहे. "श्रीरामाचा भक्त आणि रामकथेचा प्राण… जय पवनपुत्र श्री हनुमान!" असे कॅप्शन या पोस्टरसह देण्यात आले आहे. देवदत्त नागेने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या आहेत.
देवदत्त नागेने याआधी अनेक मराठी मालिक आणि चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘जय मल्हार’ या मालिकेतून देवदत्त घराघरात पोहोचला. देवदत्तने यापूर्वी ओम राऊत यांच्यासोबत 'तान्हाजी' चित्रपटात काम केले होते. याशिवाय तो 'बाजीराव मस्तानी', 'सत्यमेव जयते' आणि 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' या हिंदी चित्रपटांमध्येही झळकला आहे.
रामनवमीला प्रदर्शित झाले होते नवीन पोस्टर
मागील आठवड्यात रामनवमीच्या दिवशी अभिनेता प्रभासने चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करत चाहत्यांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याने इंग्रजी, हिंदी आणि तेलगूमध्ये लिहिले - मंत्रो से बढकर तेरा नाम, जय श्रीराम. प्रभासशिवाय दिग्दर्शक ओम राऊत आणि क्रिती सेनन यांनीही त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हे पोस्टर शेअर केले होते.
'आदिपुरुष'वरुन झाले बरेच वाद
‘आदिपुरुष’ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास श्रीराम तर बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. 'आदिपुरुष' हा चित्रपट याआधी जानेवारी 2023 मध्ये रिलीज होणार होता, पण टिझरवरुन झालेला वाद बघता निर्मात्यांनी त्याची रिलीज डेट लांबणीवर टाकली. टिझर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटातील रावण, सीता आणि हनुमानाच्या लूकवरून बराच वाद झाला होता. इतकंच नाही तर चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली होती, त्यामुळे निर्मात्यांनी यात बरेच बदल केले. व्हीएफएक्सच्या गुणवत्तेमुळे या चित्रपटाला खूप टीकेला सामोरे जावे लागले आहे. 'आदिपुरुष' हा चित्रपट आता 16 जून रोजी वर्ल्डवाइड रिलीज करण्यात येणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.