आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचे शनिवारी सकाळी निधन झाले. संगीतकार आदित्यवर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र किडनी निकामी झाल्यामुळे त्याची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी आदित्यने या जगाचा कायमचा निरोप घेतला. यंग टॅलेंट गमावल्याने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
संगीतकार आदित्य पौडवालसोबत शंकर महादेवन यांनी बरीच गाणी केली आहेत. मृत्यूच्या काही दिवस आधी आदित्यने शंकर यांच्यासाठी एक गाण्याचा प्रोग्राम केला होता. आदित्यच्या मृत्यूची बातमी ऐकून शंकर यांनी दु: ख व्यक्त केले आणि लिहिले, 'प्रिय आदित्य पौडवाल आता आपल्यात नाही, ही बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. माझा अद्याप या बातमीवर विश्वास बसत नाहीये. तो एक उत्कृष्ट संगीतकार आणि एक चांगला माणूस होता. आदित्यने तयार केलेले गाणे दोन दिवसांपूर्वीच मी गायले होते. तुझी उणीव कायम भासेल'.
आदित्यच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर अरमान मलिकने लिहिले, 'मला खरोखर धक्का बसला आहे. अत्यंत प्रतिभावान आत्मा आज आपल्यातून निघून गेला आहे. मला आठवतंय की, 2014 मध्ये मी माझा पहिला अल्बम प्ले करण्यासाठी तुमच्या स्टुडिओमध्ये आलो होतो. तुमच्या आत्म्याला शांती मिळो. तुमची कायम आठवण येईल. माझ्याजवळ शब्द नाहीत'.
आदित्य पौडवालच्या निधनाची बातमी ऐकून ज्येष्ठ गायक पंकज उदास यांनाही धक्का बसला आहे. आदित्यचे छायाचित्र शेअर करुन त्यांनी एका भावूक नोट लिहिले आहे. 'अचानक आदित्यच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. त्याचा चमकणारा आणि दमदार चेहरा मी कधीही विसरणार नाही. देव त्याला शांती देवो त्याच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो', असे पंकज उदास म्हणाले आहेत.
गायिका हर्षदीप कौर हिनेदेखील शोक व्यक्त करताना लिहिले, 'अत्यंत वाईट बातमी. तो खरोखर एक हुशार आणि गोड व्यक्ती होता. त्याच्या आत्म्याला शांती लाभो.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.