आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई पोलिसांनी मंगळवारी भल्या पहाटे एका पॉश क्लबवर छापा मारून फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन केल्याने 34 जणांना अटक केली. यात क्रिकेटपटू सुरेश रैना, अभिनेता हृतिक रोशनची माजी पत्नी सुझान खान, गायक गुरू रंधावासह अनेक सेलिब्रेटींचा समावेश आहे.
कोरोनामुळे नवीन प्रतिबंध आणि राज्यात सोमवारी रात्रीपासून लागू रात्रीच्या संचारबंदीनंतरही मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या ड्रॅगनफ्लाय एक्स्पीरियन्स क्लबमध्ये पार्टी सुरू होती. गोपनीय माहितीच्या आधारे पहाटे 3 वाजता नाइट क्लबवर छापा टाकला. यात 34 जणांवर कारवाई करण्यात आली. 27 सेलिब्रिटी आणि 7 स्टाफविरोधात भादवी कलम 188, 269 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. वृत्तानुसार, सेलिब्रिटींना अटक केल्यानंतर सोडण्यात आले होते. मात्र या कारवाईबाबत सुझान खानने आता सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले आहे. त्याचसोबत अटकेचे वृत्त साफ खोटे असल्याचे तिने म्हटले आहे.
सुझान म्हणाली - अटकेचे वृत्त खोटे आणि बेजबाबदार आहे
आपल्या सोशल मीडियावर यासंदर्भात स्पष्टीकरण देताना सुझानने लिहिले, ‘काल रात्री मी माझ्या एका जवळच्या मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त सहार इथल्या जेडब्ल्यू मेरिएटच्या ड्रॅगन फ्लाय क्लबमध्ये डिनरसाठी गेले होते. मध्यरात्री अडीच वाजता काही पोलिस अधिकारी क्लबमध्ये आले. क्लबचे व्यवस्थापक आणि पोलिस प्रशासनामध्ये चर्चा सुरू असताना उपस्थित असलेल्या सर्वांना तीन तासांसाठी थांबण्यास सांगण्यात आले. अखेर सकाळी सहा वाजता आम्हाला तिथून निघण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे अटकेचे वृत्त साफ खोटे आणि बेजबाबदार आहे. आम्हाला का थांबावे लागलं आणि क्लब व पोलिसांमध्ये काय वाद होता हे मला समजू शकले नाही. पण मुंबई पोलिस आणि त्यांच्या स्वार्थहीन कामाबद्दल मला खूप आदर आहे. त्यांच्या योग्य कामगिरी शिवाय आम्ही सुरक्षित राहू शकणार नाही’, असे सुझानने सोशल मीडियावर लिहिले.
प्रोटोकॉलची माहिती नव्हती : रैना
क्रिकेटपटू सुरैश रैनाच्या वतीने स्पष्टीकरणात देताना सांगितले गेले की, ‘रैना एका चित्रीकरणासाठी मुंबईत होता. चित्रीकरण रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्याने एका मित्राने त्याला जेवणासाठी बोलावले होते. तेथूनच तो दिल्लीला विमानाने जाणार होता. त्याला स्थानिक वेळा व प्रोटोकॉलबद्दल माहिती नव्हती. अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या प्रक्रियेचे त्याने तत्काळ पालन केले.’
‘ड्रॅगनफ्लाय एक्सपीरियन्स’ येथे झालेल्या पार्टीत 19 जण दिल्ली आणि पंजाबमधून आले होते. यातील काही सेलिब्रिटीही होते. क्रिकेटपटू रैना आणि गुरु रंधावा जामीन मिळवत दिल्लीला परतल्याचे समजतंय. पब ठरवून दिलेल्या मुदतीनंतरही सुरू होता, तसेच उपस्थित ग्राहक, पबच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचे भान राखले नव्हते, अशी माहिती सहआयुक्त (कायदा-सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.