आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी टोळीकडे सापडला ऐश्वर्या रायचा बनावट पासपोर्ट:3 जण अटकेत, औषध कंपनीच्या नावावर करत होते लोकांची फसवणूक

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा पोलिस आणि सायबर सेलने नायजेरियन टोळीच्या तीन सदस्यांना अटक केली आहे. तपासादरम्यान, पोलिसांनी या टोळीच्या सदस्यांकडून 13 लाखांचे नकली अमेरिकन डॉलर्स आणि 10 हजार 500 पौंड जप्त केले आहेत. याशिवाय बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा बनावट पासपोर्टही गुन्हेगारांकडून जप्त करण्यात आला आहे. ऐश्वर्या रायच्या बनावट पासपोर्टचा वापर त्यांनी कशासाठी केला, याबाबत पोलिस गुन्हेगारांकडे चौकशी करत आहेत.

औषधांच्या नावाखाली या टोळीने केली लाखोंची फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळीचे सदस्य कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून चढ्या भावात औषधी वनस्पतींची विक्री करत होते. ही नायजेरियन टोळी बऱ्याच दिवसांपासून मॅट्रिमोनिअल साइट्स आणि डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून लोकांना टार्गेट करत होती. याशिवाय गुन्हेगारांनी लष्करातील निवृत्त कर्नलची 1 कोटी 81 लाख रुपयांची फसवणूक केल्याचेही समोर आले आहे. कर्नलने पोलिसांत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, त्यानंतरच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि या टोळीचा पर्दाफाश केला.

ग्रेटर नोएडा येथे आरोपींना अटक
पोलिस अधिकारी अभिषेक वर्मा यांनी माध्यमांना सांगितल्यानुसार, नायजेरियन गुन्हेगारांनी स्वतःची ओळख ईक उफेरेमुकेवे, एडविन कॉलिन्स आणि ओकोलोई डेमियन अशी सांगितली आहे. तिघांनाही ग्रेटर नोएडा येथून अटक करण्यात आली आहे. ही टोळी अॅबॉट फार्मास्युटिकल्स कंपनीसह इतर कंपन्यांचे मालक असल्याचे भासवून लाखो रुपयांची लूट करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

डेटिंग अ‍ॅप आणि मॅट्रिमोनिअल साइटद्वारे करत होते लक्ष्य
पोलिसांनी पुढे सांगितल्यानुसार, अटक करण्यात आलेल्या तीन गुन्हेगारांकडे व्हिसा आणि पासपोर्टही नव्हते. या तिघांकडून ऐश्वर्या रायचा बनावट पासपोर्ट, सहा फोन, अकरा सिम आणि लॅपटॉप पेनड्राइव्ह आणि तीन कार जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र, अभिनेत्रीच्या पासपोर्टवरून या तिघांनी कोणते गुन्हे केले आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...