आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववीत असताना सुरु केली होती मॉडेलिंग:मिस वर्ल्ड होण्यापूर्वी 4 चित्रपट नाकारले, 'हम दिल दे चुके सनम' योगायोगाने मिळाला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील चौथी सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 49 वर्षे पू्र्ण केली आहेत. नेदरलँड्समधील ट्यूलिप फुलांच्या एका प्रकाराला ऐश्वर्याचे नाव देण्यात आले आहे. 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर ऐश्वर्याने 1997 मध्ये आलेल्या 'इरुवर' या तामिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ऐश्वर्या आजवर तामिळ, तेलुगू, बंगाली, इंग्रजी आणि हिंदी भाषेतील सुमारे 50 चित्रपटांमध्ये झळकली आहे. मिस इंडिया स्पर्धेत होण्यासाठी तिने आमिर खानसारख्या स्टारचा राजा हिंदुस्तानी चित्रपट नाकारला होता. तिने तिच्या आयुष्यात घेतलेले बहुतेक निर्णय योग्य ठरले.

ऐश्वर्याला स्टारपद बहाल करणारा चित्रपट 1999मध्ये आलेला 'हम दिल दे चुके सनम' हा होता, हा चित्रपट ऐश्वर्या सिनेसृष्टीत आल्यानंतर दोन वर्षांनी आला होता, परंतु तिला हा चित्रपट ऑडिशनमुळे नव्हे तर योगायोगाने मिळाला होता. आज ऐश्वर्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्यावियीच्या काही रंजक गोष्टी...

  • नववीत असताना कसा मिळाला होता पहिला मॉडेलिंग प्रोजेक्ट?

वाइल्ड फिल्म्स इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितले होते की, काळे डोळे आणि ब्राऊन केसांमुळे ती लहानपणापासूनच आकर्षणाचा केंद्रबिंदू होती. तिचीइंग्रजीची प्राध्यापिका एका मासिकात फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करत होती. त्यांना एका प्रोजेक्टसाठी मॉडेलची गरज होती, प्रोजेक्टची डेडलाइन जवळ आल्याने प्रोफेसरने ऐश्वर्याला मॉडेलिंग करण्याची विनंती केली. ऐश्वर्याने सहमती दर्शवली आणि अशा प्रकारे नववीत असताना ऐश्वर्याला पहिला मॉडेलिंग प्रोजेक्ट मिळाला होता.

ही कॅमलिन पेन्सिलची जाहिरात होती. ऐश्वर्या अशीच मॉडेलिंग करत गेली आणि तिला जाहिरातींसाठी मोठ्या कंपन्यांकडून ऑफर मिळू लागल्या. 1993 मध्ये, ऐश्वर्या आमिर खान आणि महिमा चौधरीसोबत पेप्सीच्या जाहिरातीत दिसली होती, ज्यामध्ये तिला खूप पसंती मिळाली होती. फुजी आणि कोक कंपनीच्या जाहिरातीतही तिने काम केले. ऐश्वर्या ही भारतातील एकमेव अभिनेत्री आहे जिने पेप्सी आणि कोक या दोन्ही कंपनीच्या जाहिराती केल्या आहेत.

  • ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड बनणारी दुसरी भारतीय महिला ठरली

1993 मध्ये झालेल्या मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत सुष्मिता विजेती ठरली आणि ऐश्वर्या रायने दुसरा क्रमांक पटकावला. ऐश्वर्या राय 1994 मध्ये मिस वर्ल्ड बनली होती. 1966 मध्ये रीटा फारियानंतर 28 वर्षांनी मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ती दुसरी भारतीय होती.

  • मिस वर्ल्डसाठी 'राजा हिंदुस्तानी' चित्रपटाची ऑफर नाकारली होती

वोग मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या रायने सांगितले होते की, मिस इंडियामध्ये सहभागी होण्यापूर्वीच तिच्याकडे 4 चित्रपटांच्या ऑफर होत्या, परंतु तिने सौंदर्य स्पर्धेचा भाग होण्यासाठी या सर्व ऑफर नाकारल्या. ज्या चित्रपटांना तिने नकार दिला होता, त्यात ब्लॉकबस्टर हिट 'राजा हिंदुस्तानी' (1996)चा समावेश होता.

  • तामिळ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण

ऐश्वर्याने मणिरत्नम यांच्या 'इरुवर' (1997) मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर ऐश्वर्या 'और प्यार हो गया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आली. हा चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर 1998 मध्ये ऐश्वर्या 'जीन्स' या तामिळ चित्रपटात दिसली, पण तोही फ्लॉप झाला. 1999 मध्ये, ऐश्वर्याचा आणखी एक फ्लॉप चित्रपट 'आ अब लौट चलें' रिलीज झाला आणि त्याच वर्षी तिचा पहिला ब्लॉकबस्टर हिट चित्रपट 'हम दिल दे चुके सनम' रिलीज झाला. या चित्रपटातून ऐश्वर्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत आली, पण योगायोगाने तिला हा चित्रपट मिळाला होता.

  • ऐश्वर्या ही संजय लीला भन्साळी यांची पहिली पसंती नव्हती

संजय लीला भन्साळी यांना ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात करीना कपूरला कास्ट करायचे होते, पण करीना इतर चित्रपटांमध्ये व्यस्त होती. जेव्हा करीनाने चित्रपट नाकारला, तेव्हा भन्साळींनी मनीषा कोईरालाला ऑफर दिली. ती त्यांच्या 'खामोशी' या गाजलेल्या चित्रपटाची नायिका होती. मनीषानेही हा चित्रपट करण्यास नकार दिला होता.

  • आमिरच्या सांगण्यावरून ऐश्वर्या 'राजा हिंदुस्तानी'च्या प्रीमियरला पोहोचली

'राजा हिंदुस्तानी'च्या प्रीमियरमध्ये सहभागी होण्यासाठी आमिर खानने ऐश्वर्याला फोन केला होता. आमिरला राग येऊ नये, असा विचार करून ऐश्वर्याने सहमती दर्शवली, कारण तिने 'राजा हिंदुस्तानी' हा चित्रपट आधीच नाकारला होता. प्रीमियरच्या वेळी ऐश्वर्या राय संजय लीला भन्साळी यांच्याकडे गेली आणि ती म्हणाली, 'हाय, माझे नाव ऐश्वर्या आहे, मला तुमचा चित्रपट खामोशी आवडतो'. भन्साळींना ऐश्वर्याचा आवाज आणि डोळे इतके आवडले की त्यांनी तिला लगेचच त्यांच्या 'हम दिल दे चुके सनम'मध्ये कास्ट करण्याचे ठरवले.

याविषयी संजय लीला भन्साळी यांनी फिल्मफेअर मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, मला तिचे डोळे खूप आवडले. ही माझी नंदिनी आहे असे मी स्वतःला सांगितले. 'हम दिल दे चुके सनम' हा ऐश्वर्याच्या कारकिर्दीतील एक टर्निंग पॉइंट ठरला, ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. 51 कोटींची कमाई करणारा हा चित्रपट 1999 साली सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.

  • सलमानसोबतचे नाते आणि दुरावा

'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात काम करत असताना सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सलमान ऐश्वर्यासाठी खूप पजेसिव्ह होता. अनेकवेळा सलमानने ऐश्वर्याच्या चित्रपटांच्या सेटवरही गोंधळ घातला होता. इमेज खराब होण्याच्या भीतीने ऐश्वर्याने सलमानपासून अंतर ठेवायला सुरुवात केली. काही काळानंतर जेव्हा ऐश्वर्याचे नाव विवेक ओबेरॉयसोबत जोडले गेले तेव्हा सलमानने विवेकला फोन केला आणि त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. खुद्द विवेक ओबेरॉयने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती.

  • शाहरुखने वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ केली आणि अनेक चित्रपटांमधून काढून टाकले

ऐश्वर्या राय आणि शाहरुख खान 'जोश', 'मोहब्बतें' आणि 'देवदास' सारख्या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटांमध्ये एकत्र दिसले. एकत्र काम करताना दोघांची चांगली मैत्री झाली होती, पण नंतर दोघांनीही एकमेकांसोबत काम करणे सोडून दिले. खरंतर शाहरुख खान ऐश्वर्या रायच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करत होता, जे ऐश्वर्याला आवडत नव्हते. दोघांमध्ये असा वाद झाला की शाहरुखने नाराज होऊन तिला अनेक चित्रपटातून काढून टाकले. यामध्ये विशेषतः ऐश्वर्या रायसाठी लिहिलेल्या वीर-जारा या चित्रपटाचा समावेश होता.

सिमी ग्रेवालच्या शोमध्ये शाहरुख खानने सांगितले होते की, ऐश्वर्या त्याच्या आवडत्या सहकलाकारांपैकी एक होती, परंतु त्यांची मैत्री तुटली. जेव्हा ऐश्वर्या सिमी ग्रेवालच्या शोमध्ये सहभागी झाली होती, तेव्हा तिला विचारण्यात आले होते की, शाहरुखने चित्रपटातून बाहेर काढल्याचे समजल्यावर तिची प्रतिक्रिया काय होती. यावर ऐश्वर्या म्हणाली की, तिच्याकडे याचे उत्तर नाही. शाहरुखच्या या वागण्याने ती खूप दुखावली गेली होती. ऐश्वर्या म्हणाली होती, तू असे का केले, असा प्रश्न विचारण्याचा माझा स्वभाव नाही. अनेक वर्षांनंतर दोघे 2016 मध्ये आलेल्या 'ए दिल है मुश्किल' चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटात शाहरुख छोट्या भूमिकेत झळकला होता.

  • स्वतःच्या मृत्यूची बातमी वाचून ऐश्वर्या रायला बसला होता धक्का

स्वतःच्या मृत्यूची बातमी वाचणे हा ऐश्वर्या रायसाठी सर्वात त्रासदायक अनुभव होता. तिच्या निधनाच्या वृत्ताने अनेक वेबसाईट क्रॅश झाल्या होत्या. तिच्या मृत्यूच्या वृत्ताची पुष्टी करण्यासाठी अनेक लोक सातत्याने फोन करत होते, या घटनेने ऐश्वर्याला खूप दुःख झाले होते.

ऐश्वर्या रायने 2018 मध्ये 'फन्ने खां'मध्ये झळकली होती. 3 वर्षानंतर तिने मणिरत्नम यांच्या 'पोन्नियन सेल्वन' पार्ट 1 या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. ऐश्वर्याने मणिरत्नम यांच्यासोबत तिचा पहिला चित्रपट 'इरुवर' केला होता. 'पोन्नियन सेल्वन' हा तामिळ भाषेतील चित्रपट असून तो अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता ऐश्वर्या 2023 मध्ये येणाऱ्या या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...