आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअजय देवगणचा बहुप्रतिक्षीत ‘भोला’ हा चित्रपट 30 मार्च रोजी प्रदर्शित झाला. ‘दृश्यम 2‘च्या यशानंतर पुन्हा एकदा अजयच्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. 'भोला'ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कमाई केली. इतकेच नाही तर 2023 चा ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा चित्रपट ठरला. दुसऱ्या दिवशी मात्र चित्रपटाच्या कमाईत घसरण बघायला मिळाली. पण आता तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी कमाईत तेजी बघायला मिळाली आहे. या चित्रपटाची शनिवार आणि रविवारचे कमाईचे आकडे समोर आले आहेत.
पहिल्या दिवशी ‘भोला’ने 11.20 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी हा चित्रपट कमाईत थोडा मागे पडला, दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 7.40 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी कमाईचे आकडे नक्कीच वाढलेले दिसून आले.
अजय देवगणच्या ‘भोला’ने तिसऱ्या दिवशी तब्बल 12.10 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर रविवारी चित्रपटाने 13.48 कोटींचा गल्ला जमवला. चित्रपट समीक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आकडे समोर आणले आहेत. एकुणच पहिल्या विकेंडला चित्रपटाने 44.28 कोटींचा व्यवसाय केला आहे.
खरं तर रमजान आणि आयपीएलमुळे चित्रपटाच्या कमाईवर परिणाम दिसून येतोय. पण महावीर जयंती आणि गुडफ्रायडेच्या सुटीचा फायदा चित्रपटाला होईल अशी आशा सिनेविश्लेषक व्यक्त करत आहेत.
अजयने दिग्दर्शित केलेला तिसरा चित्रपट आहे 'भोला'
विशेष म्हणजे हा चित्रपट स्वतः अजय देवगणने दिग्दर्शित केला आहे. यापूर्वी त्याने यू मी और हम आणि शिवाय या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. गेल्या काही वर्षांत अजय देवगणचे चित्रपट सिल्व्हर स्क्रीनवर चांगली कामगिरी करत आहेत. मग तो 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' असो किंवा 'दृष्यम 2'... या दोन्ही चित्रपटांनी भारतीय बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तसेच 1200 कोटी कमावणाऱ्या 'RRR' चित्रपटातही अजय देवगणची महत्त्वाची भूमिका होती.
अजय देवगण हा बॉलिवूडमधील अशा काही निवड अभिनेत्यांपैकी एक आहे जो डोळ्यांनी अभिनयासाठी ओळखला जातो. आता त्याच्या चाहत्यांना त्याच्या 'भोला' या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
'भोला' हा ड्रग सिंडिकेटवर आधारित 'कैथी' या चित्रपटाचा रिमेक
100 कोटींमध्ये बनलेला हा चित्रपट लोकेश कनगराजचा 2019 चा सुपरहिट चित्रपट 'कैथी'चा हिंदी रिमेक आहे. 'कैथी' हा चित्रपट ड्रग सिंडिकेटवर आधारित होता. कमल हसनचा 'विक्रम' देखील याच फ्रँचायझीचा एक भाग होता. ‘भोला’मध्ये अजय देवगण, तबू, दीपक डोबरियाल, गजराज राव, संजय मिश्रा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.