आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इनसाइड स्टोरी:2015 मध्ये घडलेल्या 'या' सत्य घटनेवर आधारित आहे अजय देवगणचा 'मेडे' चित्रपट, मोठ्या पडद्यावर दिसणार दोहा-कोची घटनेचा थरार

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय होती दोहा-कोची घटना?

अभिनेता अजय देवगण दिग्दर्शक म्हणून आपला चौथा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येण्यास उत्सुक आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाचे नाव मेडे असून यात अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत सिंह महत्त्वाच्या भूमिकेत आहे. विशेष म्हणजे अजय दिग्दर्शनाची धुरा सांभाळण्यासोबतच चित्रपटात एक महत्त्वाची भूमिकासुद्धा वठवत आहे. आता या चित्रपटासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. 2015 मध्ये घडलेल्या दोहा-कोची घटनेवर चित्रपटाचे कथानक बेतले असल्याचे सांगितले जात आहे.

काय होती दोहा-कोची घटना?
18 ऑगस्ट 2015 रोजी ही घटना घडली होती. दोहा विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या विमानाला कोची विमानतळावर उतरताना काही अडचणींचा सामना करावा लागला होता. या विमानात 141 प्रवासी तर 8 विमान कर्मचारी होते. मात्र खराब हवामानामुळे वैमानिकाला धावपट्टी दिसणे कठीण झाले त्यामुळे विमानाचे लँडिंग रद्द करण्यात आले. त्यानंतर विमान त्रिवेंद्रम विमानतळावर पोहचले. मात्र येथेही धुके आणि खराब वातावरण असल्याने लँडिंग करणे वैमानिकाला शक्य झाले नाही. अखेर तीन प्रयत्नांनंतर चौथ्यांदा विमान धावपट्टीवर उतरवण्यास वैमानिकाला यश आले. मात्र दरम्यानच्या काळात विमानात अत्यंत कमी म्हणजेच केवळ 350 किलो इंधन शिल्लक होते. नियमानुसार बोइंग 737 विमानात कमीत कमी 1500 किलो इंधन असणे गरजेचे असतं. एकीकडे कमी इंधन साठा आणि दुसरीकडे स्पष्ट न दिसणारी धावपट्टी यात प्रवाशांचा जीव वाचवणे ,असा मोठा प्रश्न वैमानिकासमोर उभा ठाकला होता. डीजीसीएने ही घटना गंभीर असल्याचे सांगत वैमानिकाला निलंबित केले होते. हा संपूर्ण थरार या चित्रपटात अनुभवता येणार आहे.

सध्या शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे
या चित्रपटात अजय देवगण वैमानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 2020 मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. ब-याच भागाचे चित्रीकरण पूर्ण देखील झाले आहे. पण आता कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी बाळगत अजय डिसेंबर 2020 पासून चित्रपटाचे शूटिंग करत होता. चित्रपटाच्या फायनल शेड्युलसाठी चित्रपटाची टीम एप्रिलच्या शेवटी दोहा येथे जाणार होती, परंतु सध्या शूटिंग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.

अजय देवगण 'गंगूबाई काठियावाडी'मध्येही दिसणार आहे
अजयच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचे म्हणजे तो अखेरचा 'तानाजी' या चित्रपटात दिसला होता. त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये 'भुज- द प्राइड ऑफ इंडिया', 'मैदान', 'गंगूबाई काठियावाडी' आणि 'मेडे' या चित्रपटांचा समावेश आहे. तर अमिताभ बच्चन सध्या रश्मिका मंदानासोबत 'गुडबाय' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

बातम्या आणखी आहेत...