आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

55 वर्षांचा झाला खिलाडी कुमार:एका विद्यार्थ्याने दिली होती अक्षयला मॉडेलिंगची ऑफर, 'या' अभिनेत्रींसोबत जुळले होते नाव

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. अक्षयचा जन्म 7 सप्टेंबर 1967 रोजी झाला. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या अक्षयला त्याच्या पहिल्या मॉडेलिंग असाइनमेंटसाठी 3,500 रुपये मिळाले होते. अक्षयने खिलाडी नावाने सलग 8 चित्रपट दिले, आणि त्याचे नावच खिलाडी कुमार पडले. चला तर मग आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.

अक्षय फिल्म इंडस्ट्रीत एक मल्टी टॅलेंटेड अभिनेत्याच्या रुपात ओळखला जातो. त्याचा जन्म एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात अमृतसह येथे झाला. त्याच्या बालपणीच त्याचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. मार्शल आर्ट्सची आवड असलेला अक्षय ट्रेनिंग घेण्यासाठी बँकॉक येथे गेला. मार्शल आर्टच्या ट्रेनिंगसह अक्षयने येथील एका हॉटेलमध्ये शेफची नोकरी केली. मुंबईत परतल्यानंतर त्याने मुलांना मार्शल आर्ट्सचे ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली.

याचदरम्यान अक्षयला त्याच्या एका विद्यार्थ्याने मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्याचा सल्ला दिला. तो विद्यार्थी स्वतः एक फोटोग्राफर होता. त्यानेच अक्षयला पहिली मॉडेलिंग असाइनमेंट दिली होती. मॉडेलिंगसाठी त्याने दोन दिवस शूटिंग केले आणि त्याला एवढे पैसे मिळाले, जे त्याला मार्शल आर्ट शिकवल्यानंतर महिनाभरासाठी मिळत होते, मग काय अक्षयने मॉडेलिंग आणि सिनेसृष्टीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला.

अक्षय मॉडेलिंगसोबतच सिनेनिर्मात्यांच्या ऑफिसला चकरा मारु लागला. एकदा एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी त्याला बंगळूरुला जायचे होते, पण त्याची फ्लाइट मिस झाली. तेव्हा तो एका निर्माताच्या ऑफिसमध्ये काम मागण्यासाठी गेला. त्याच दिवशी संध्याकाळी प्रमोद चक्रवर्ती यांनी त्याला दीदार या चित्रपटात हीरोचा रोल दिला. अक्षय कुमारने महेश भट्ट यांच्या आज (1987) या चित्रपटात मार्शल आर्ट्स इंस्ट्रक्टरची एक छोटीशी भूमिका केली होती. ही भूमिका केवळ सात सेकंदांची होती.

राजेश खन्ना 'जय शिव शंकर' नावाचा एक चित्रपट बनवत असून ते एका नवोदित चेह-याच्या शोधात आहेत, हे अक्षयला कळल्यांनतर तो त्यांच्या ऑफिसमध्ये गेला. दोन तीन तास वाट पाहिल्यानंतरसुद्धा त्याची राजेश खन्नांसोबत भेट होऊ शकली नाही. आणि तो तेथून निघून गेला. अक्षय कुमार म्हणतो, त्यादिवशी मी स्वप्नातही विचार केला नव्हता की, एकेदिवशी मी त्यांचा जावई होईल. मुख्य अभिनेता म्हणून रिलीज झालेला सौगंध (1991) हा अक्षय कुमारचा पहिला चित्रपट होता.

'सौगंध'द्वारे फिल्मी करिअरला सुरुवात
1991 मध्ये रिलीज झालेल्या 'सौगंध' या सिनेमाद्वारे अक्षयने आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली होती. मात्र त्याचा हा पहिलाच सिनेमा फ्लॉप ठरला होता. हीरोच्या रुपात अक्षयला खरी ओळख प्राप्त झाली ती 1992 मध्ये रिलीज झालेल्या 'खिलाडी' या चित्रपटाद्वारे. मात्र 1993 हे वर्ष त्याच्यासाठी अयशस्वी ठरले. यावर्षी त्याचे जवळपास पाच चित्रपट रिलीज झाले. मात्र कोणताच चित्रपट आपली छाप सोडू शकला नाही. 1994 मध्ये अक्षयने ‘ये दिल्लगी’, ’मोहरा’ आणि ’मैं खिलाडी तू अनाडी’ हे एकामागून एक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आणि त्याचे करिअर रुळावर आले.

असा ठरला खिलाडी कुमार
अक्षयने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात खिलाडी शीर्षक असलेले अनेक चित्रपट केले. त्यामुळे त्याला बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून ओळखले जाऊ लागले. खिलाडी (1992), मैं खिलाडी तू अनाडी (1994), सबसे बडा खिलाडी (1995), खिलाडियों का खिलाडी (1996), मिस्टर एंड मिसेज खिलाडी (1997), इंटरनेशनल खिलाडी (1999), खिलाडी 420 (2000), खिलाडी 786 (2012) हे अक्षयचे खिलाडी शीर्षक असलेले प्रमुख सिनेमे आहेत.

अफेअर्समुळे राहिला चर्चेत
करिअरच्या सुरुवातीच्या काळात अक्षयचे अनेक अभिनेत्रींसह अफेअर राहिले. यामध्ये रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टी या अभिनेत्रींच्या नावाचा प्रामुख्याने समावेश आहे. सर्वप्रथम पूजा बत्रा अक्षयच्या आयुष्यात आली. मात्र तिच्यासह ब्रेकअप झाल्यानंतर रवीना टंडनसह त्याचे सूत जुळले. बातम्यांनुसार, अक्षय आणि रवीनाचा साखरपुडासुद्धा झाला होता. मात्र रवीनासह रिलेशनशिपमध्ये असूनदेखील शिल्पा शेट्टीसह त्याची जवळीक वाढली. याची कुणकुण रवीनाला लागल्यानंतर तिने अक्षयसोबतचे आपले नाते संपुष्टात आणले. शिल्पासह तो सीरिअस रिलेशनशिपमध्ये होता. मात्र त्याचकाळात अक्षय आणि ट्विंकलच्या अफेअरची माहिती शिल्पाला मिळाली आणि तिनेही त्याच्या आयुष्यातून काढता पाय घेतला.

ट्विंकल आयुष्यात येताच दोघांच्या नात्यात आला दुरावा
असे म्हटले जाते की, शिल्पा आणि अक्षयने मुंबईतील एका मंदिरात साखरपुडा केला होता. मात्र अक्षयच्या आयुष्यात ट्विंकल खन्नाची एंट्री होताच अक्षयने शिल्पाकडेही पाठ फिरवली. अक्षय आणि ट्विंकल यांनी फिल्मफेअर मॅगझिनसाठी एकत्र शूट केले होते, त्याचकाळात अक्षय आणि ट्विंकल यांच्यात जवळीक निर्माण झाली. अखेर 2000 मध्ये शिल्पा आणि अक्षय यांच्यात खटके उडून ही लवस्टोरी संपुष्टात आली. शिल्पाशी ब्रेकअप झाल्यानंतर अक्षयने 2001 मध्ये ट्विंकल खन्नाबरोबर लग्न केले.

अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी या दोघांमध्ये प्रेम होते. परंतु त्याच सोबत अक्षयचे रवीना टंडनसोबतही प्रेमप्रकरण सुरू होते. या दोघींनंतर अक्षयच्या आयुष्यामध्ये ट्विंकल खन्ना आली. या तिघी अभिनेत्री कोणे ऐकेकाळी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. शिल्पा शेट्टीने तिच्या एका मुलाखतीमध्ये अक्षय कुमावर थेट आरोपच केले होते.

अक्षयने मला धोका दिला - शिल्पा
अक्षय माझ्याबरोबर डेट करत होता त्याचवेळी तो ट्विंकलाही डेट करत होता, असा खुलासा शिल्पाने केला होता. शिल्पा शेट्टीने ब्रेकअप झाल्यानंतर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, 'अक्षय कुमारने मला धोका दिला आहे. अक्षय कुमारसोबत भविष्यात मी कधीच काम करणार नाही.' खरे तर त्याच वर्षी अक्षय आणि शिल्पाचा 'धडकन' हा चित्रपट रिलीज झाला होता. जेव्हा शिल्पाला विचारले की तुझी मैत्रीण ट्विंकलवरही तू नाराज आहेस का? त्यावर शिल्पाने उत्तर दिले की 'तिच्याबद्दल मला कोणतीच तक्रार नाही. अक्षयच्या चुकांसाठी ट्विंकलला दोष देणे योग्य नाही.'

अक्षयने माझा वापर केला
या मुलाखतीमध्ये शिल्पाने सांगितले होते, 'अक्षयने माझा वापर केला आणि त्याच्या आयुष्यात आणखी कोणी आल्यानंतर त्याने अगदी सहजपणे मला सोडून दिले. तो एकमेव व्यक्ती आहे त्याच्यावर मी खूप नाराज आहे, कारण त्याने मला धोका दिा आहे. मला विश्वास आहे की येणा-या काळात याचा हिशोब नक्कीच होईल. अक्षयने जे काही केले आहे तेच त्याच्यासोबत घडेल.'

याच मुलाखतीमध्ये शिल्पाने म्हटले होते, 'अक्षयला विसरणे सोपे नव्हते. परंतु या ब्रेकअपच्या धक्क्यातून मी सावरले आहे. अक्षय कुमार हा माझा भूतकाळ आहे. तो माझ्या आयुष्यातील एक प्रकरण असून आता ते मी विसरून गेले आहे. मी यापुढे त्याच्यासोबत कधीच काम करणार नाही. त्याच्यासोबत प्रोफेशनली काम करणे कधीच शक्य होणार नाही.'

ट्विंकलनेही दोनदा मोडला होता अक्षयसोबत साखरपुडा
असे म्हटले जाते, की ट्विंकलचा 'मेला' हा चित्रपट जेव्हा रिलीज होणार होता, त्याकाळात अक्षयने ट्विंकलला लग्नाची मागणी घातली होती. त्यावेळी ट्विंकलने अक्षयकडे लग्नासाठी एक अट घातली होती. ती म्हणजे 'मेला' हा चित्रपट फ्लॉप झाला, तरच ती त्याच्यासोबत लग्न करेल. चित्रपट फ्लॉप ठरला आणि दोघांचे लग्न झाले. पण या दोघांचाही एकदा नाही तर दोन वेळा साखरपुडा मोडला होता.

एका फोटोशूटदरम्यान अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाची पहिल्यांदा भेट झाली. या फोटोशूटदरम्यान ट्विंकलला पाहता क्षणीच अक्षय तिच्या प्रेमात पडला होता. यानंतर या दोघांचा ‘इंटरनॅशनल खिलाडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर या दोघांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली. याचदरम्यान अक्षय ट्विंकलचा साखरपुडाही झाला. पण दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यांचा हा साखरपुडा मोडला. त्यानंतर पुन्हा एकदा कुटुंबियांच्या सहमतीने दोघांनी साखरपुडा केला. पण त्यांचा हा साखरपुडा देखील मोडला.

दोन वेळा साखरपुडा मोडल्यानंतर ट्विंकल नैराश्येमध्ये गेली होती. कॉफी विथ करण या शोमध्ये याबाबत ट्विंकलने स्वतः खुलासा केला होता. ट्विंकलने सांगितले होते की, माझ्या एका मित्राने माझ्या आईला अक्की समलिंगी असल्याचे सांगितले होते. यामुळे आमच्या नात्यामध्ये बऱ्याच समस्या निर्माण झाल्या. माझ्या आईने तर या लग्नासाठी नकार दिला होता. पण एक वर्षाने अक्षयबाबत ट्विंकलच्या आईला सत्य समजल्यानंतर त्यांनी या लग्नास होकार दिला.

या अभिनेत्रींसोबत जुळले होते अक्षयचे नाव
आयशा जुल्का​​​​​​​

अक्षय आणि आयशा जुल्काची जोडी ऑनस्क्रीन चांगली पसंत केली गेली होती, त्याचबरोबर त्यांच्या अफेअरची देखील चर्चा रंगली होती. असे म्हटले जाते की आयशा अक्षयसोबतच्या नात्यात गंभीर होती. मात्र अक्षयने तिच्यासोबत लग्नासाठी नकार दिला होता.

रेखा

अक्षय कुमार आणि रेखा यांचे अफेअर देखील बॉलिवूडच्या सर्वात चर्चित अफेअरपैकी एक आहे. 'खिलाडियों का खिलाडी' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा रंगली होती. रेखा वयाने अक्षयपेक्षा खूप मोठी होती, त्यामुळे हे नाते चर्चेत आले होते. मात्र अक्षयने ट्विंकल त्याच्या आयुष्यात येताच रेखापासून स्वतःला दूर केले होते.

पूजा बत्रा​​​​​​​​​​​​​​

मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये अक्षय कुमारने पूजा बत्राला डेट केले होते. पूजा बत्राला विरासत आणि नायक या चित्रपटांसाठी ओळखले जाते. त्याकाळात पूजा इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती, तर अक्षय इंडस्ट्रीमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडत होता.

बातम्या आणखी आहेत...