आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता अक्षय कुमार आणि रवीना टंडन आज आपापल्या आयुष्यात स्थिरस्थावर झाले आहेत. अक्षयने ट्विंकल खन्नासोबत लग्न केले असून त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर दुसरीकडे रवीनानेही चित्रपट वितरक अनिल थडानींशी लग्न केले. हे कपलदेखील दोन मुलांचे पालक आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा अक्षय आणि रवीना रिलेशनशिपमध्ये होते. दोघे लग्नगाठही बांधणार होते. त्यांचा साखरपुडादेखील झाल्याची चर्चा होती. पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यांचे मार्ग वेगळे होऊन आता 22 वर्षांहून अधिकचा कालावधी लोटला आहे. एवढ्या वर्षांत दोघे कधीही समोरासमोर आलेले दिसले नाहीत. पण ब्रेकअपच्या एवढ्या वर्षांनी नुकेतच दोघे चक्क एका मंचावर आले. रवीना आणि अक्षय यांना एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली.
निमित्त होते अवॉर्ड सोहळ्याचे...
मुंबईत नुकताच एक अवॉर्ड सोहळा रंगला. या सोहळ्याला बॉलिवूडकरांनी हजेरी लावली होती. याच सोहळ्याला रवीना टंडन आणि अक्षय कुमारदेखील पोहोचले होते. यावेळी दोघेही मंचावर एकत्र दिसले. इतकेच नाही तर त्यांनी एकमेकांना मिठी मारून भेट घेतली व ते गप्पा मारतानाही दिसले. यावेळी रवीनाच्या हस्ते अक्षयला पुरस्कार देण्यात आला. या सोहळ्यात अक्षय कुमारला ‘मोस्ट स्टायलिश मॅन 2023’ चा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि हा पुरस्कार देण्यासाठी रवीना मंचावर आली होती. अक्षय पुरस्कार घेण्यासाठी मंचावर आला, त्यावेळी त्याने रवीनाला मिठी मारली आणि दोघांमध्ये हास्याचे कारंजे उडाले.
सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत दोघांचे फोटो
अक्षय कुमार आणि रवीना टंडनचे या अवॉर्ड सोहळ्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दोघे एकत्र गप्पा मारताना दिसत आहेत.
साखरपुड्यानंतर रवीनाने केले होते अक्षयसोबत ब्रेकअप...
रवीना आणि अक्षयची लव्ह स्टोरी 'मोहरा' (1994) या सिनेमाच्या सेटवर सुरु झाली होती. दोघे पंजाबी होते आणि त्यांची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. अनेक ठिकाणी हे दोघे एकत्र दिसायचे. त्याकाळात हे दोघे त्यांच्या लग्नाची घोषणा करतील, असे बॉलिवूडमध्ये सर्वांना वाटत होते. 1999 साली स्टारडस्ट या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत अक्षयने लग्नाची मागणी घातल्याचे रवीनाने स्वीकारले होते. एका मंदिरात अक्षयसोबत साखरपुडासुद्धा केल्याचा खुलासा अक्षयने याच मुलाखतीत केला होता.
रवीनाने सांगितल्यानुसार, अक्षयने मात्र हे नाते कधीही उघडपणे स्वीकारले नव्हते. कारण फिमेल फॅन्सला गमावण्याची त्याला भीती वाटत होती.
अभिनेत्री रेखामुळे तुटले अक्षय-रवीनाचे नाते...
1996 साली अक्षय, रवीना आणि रेखा स्टारर फिल्म 'खिलाडियों का खिलाडी' हा चित्रपट रिलीज झाला होता. याच काळात अक्षय आणि रेखा यांची लव्ह स्टोरी चर्चेत आली होती. रवीना अक्षयच्या मनमौजी स्वभावाला कंटाळली होती, त्यातच त्याचे नाव रेखासोबत जुळल्याने रवीना खूप दुखावली गेली आणि तिने अक्षयसोबत आपले नाते तोडण्याचा निर्णय घेतला होता, असे म्हटले जाते.
रवीना 'KGF 2'मध्ये झळकली
रवीना टंडनच्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर तिने 'अंदाज अपना अपना', 'अंखियों से गोली मारे', 'दिलवाले', 'लाडला' आणि गेल्या वर्षीचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'KGF 2' मध्ये काम केले आहे.
अक्षयचे आगामी चित्रपट
अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर तो अलीकडेच 'सेल्फी' या चित्रपटात दिसला. या चित्रपटात त्याच्यासोबत इमरान हाश्मी झळकला. अलीकडच्या काळात अक्षयचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकलेले नाहीत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेले त्याचे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले. आता अक्षय टायगर श्रॉफसोबत 'बडे मिया छोडे मियां 2' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच तो 'वेडात वीर मराठे दौडले सात' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.