आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईचा रेड लाईट एरिया असेलल्या कामाठीपुरातील गंगूबाई यांच्यावर आधारित गंगूबाई काठियावाडी हा केवळ एक चित्रपट नसून एका महिलेची संवेदनशील कथा आहे. गंगा (आलिया भट्ट) देहविक्रीच्या दुनियेचा एक भाग कशी बनते आणि इथली राणी बनून ती इथल्या मुली आणि महिलांच्या हृदयावर कशी राज्य करते, हे यात दाखवले गेले आहे. सुरुवातीचे एक-दोन दिवस कदाचित महिला प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यास टाळाटाळ करतील, परंतु चित्रपटाबद्दलचे अहवाल येताच जास्तीत जास्त महिला हा चित्रपट बघतील आणि याला अनेक कारणे आहेत.
एक तर हा चित्रपट स्त्रीची वेदनादायी कथा आहे आणि त्यात फारसे अश्लील दृश्य आणि शरीर प्रदर्शन नाही. दुसरे म्हणजे महिलांच्या हक्कांसाठी हा आधुनिक वैचारिक चित्रपट आहे. तिसरे म्हणजे, अजय देवगणचे पात्र महिलांचा खूप आदर करणारे आहे, जे महिला प्रेक्षकांचे मन जिंकेल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आलिया भट्टचा अभिनय! अनेकांना शंका होती की, लहान वयाची अभिनेत्री या भूमिकेत बसेल का? हा चित्रपट बघता आलिया भट्टच्या अभिनयाला पुरस्कार मिळू शकतात. आलियाने गंगूबाईची भूमिका इतकी छान साकारली आहे की तिची स्तुती करावी तितकी कमी आहे.
कथा: चित्रपटाची कथा हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे. संजय लीला भन्साळी आणि उत्कर्षिणी वशिष्ठ यांनी पटकथा इतकी छान लिहिली आहे की चित्रपटाचा अवधी लांब असूनही प्रेक्षकांना कुठेही कंटाळा येऊ देत नाही. काही असे सीन्स आहेत जे अनेक दिवस-महिने तुमच्या लक्षात राहतील; गंगा प्रियकर तिला कोठ्यावर सोडून पळून जातो तेव्हा एक ग्राहक गंगा उर्फ गंगूबाईला बेदम मारहाण करतो आणि ती किंचाळते.
जेव्हा गंगूबाई ट्रंक कॉल बुक करुन 10 वर्षांनी तिच्या आईशी फोनवर बोलते, तेव्हा रहिम लाला (अजय देवगण) त्याच ग्राहकाला तितक्याच क्रूरपणे मारतो. गंगुबाई आणि रझियाबाई (विजय राज) यांच्यात संघर्ष होतो. गंगूबाई तिच्या आयुष्यात पहिल्यांदा भाषण करते (चित्रपटातील हा सर्वोत्कृष्ट लिहिला गेलेला सीन आहे, पण त्याचे संवाद देखील तितकेच उत्कृष्ट आहेत). उत्कर्षिणी वशिष्ठ आणि प्रकाश कपाडिया यांचे डायलॉग्स थेट हृदयाला भिडतात म्हणून त्याला दाद द्यायला हवी.
अभिनय: आधी सांगितल्याप्रमाणे, आलिया भट्टने चित्रपटाचा संपूर्ण भार स्वतःच्या खांद्यावर घेतला आहे. तिने गंगूबाईची भूमिका उत्तम प्रकारे साकारली आहे, ज्यासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार मिळू शकतात. ती खूप सुंदर दिसत आहे आणि तिचे कपडे (डिझायनर शीतल इक्बाल शर्मा) चर्चेत राहतील. अजय देवगणचा गेस्ट अपिअरन्स लक्षात राहतो.
शीला मासीच्या भूमिकेत सीमा पाहवा झळकत आहे. विजय राज नव्या अंदाजात विलक्षण आहे. जिम सर्भ पत्रकार फैझीच्या भूमिकेत आहे. अफशानच्या भूमिकेत शंतनू माहेश्वरी, कमलीच्या भूमिकेत इंदिरा तिवारी, बिरजूच्या भूमिकेत अनमोल कजानी आणि एका डान्स नंबरमध्ये हुमा कुरैशीने चांगली साथ दिली आहे.
दिग्दर्शन आणि संगीत : संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक करावे लागेल. पण यावेळी त्याचे संगीत अपेक्षेपेक्षा कमी आहे. ढोलिडा हे गाणे छान जमले आहे आणि बोल (कुमारचे) ही छान आहेत. झूम रे गोरी हेही चांगले गाणे आहे पण बाकीची गाणी गुणगुणण्यासारखी नाहीत. क्रिती महेशचा डान्स उत्कृष्ट आहे.
संचित बल्हारा आणि अंकित बल्हारा यांचे पार्श्वसंगीत उत्कृष्ट आहे. सुदीप चॅटर्जींच्या कॅमेरा वर्कला पूर्ण गुण देईल. त्यांनी एक अप्रतिम चित्रपट बनवून आलियाला खूप ग्लॅमरस दाखवले आहे. शाम कौशलचे अॅक्शन सीन्स वास्तववादी वाटतात. संजय लीला भन्साळी यांचे संकलन सुपर शार्प आहे.
निष्कर्ष: एकंदरीत गंगुबाई काठियावाडी हा एक यशस्वी चित्रपट आहे जो काही सर्किट्समध्येही हिट ठरू शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.