आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतोय 'पुष्पा' स्टार अल्लू अर्जुन:'कबीर सिंग'च्या दिग्दर्शकासोबत करणार काम, भूषण कुमार निर्माता

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटामुळे यशोशिखरावर पोहोचलेल्या अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अल्लू अर्जुन लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतोय. ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘कबीर सिंग’ या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी चित्रपटात अल्लू अर्जुन मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती टी सीरिजचे मालक भूषण कुमार करणार आहेत.

सोशल मीडियावर करण्यात आली घोषणा
अद्याप या चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात आहे. लवकरच चित्रपटाचे नाव जाहीर केले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. चित्रपटाबाबत चर्चा करण्यासाठी अल्लू अर्जुन, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा, भूषण कुमार यांनी भेट घेतली होती. त्यानंतर या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या भेटीदरम्यानचे फोटो टी सीरिजच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आले आहेत. ट्वीटमध्ये म्हटले आहे, "भारतातील तीन पॉवरहाऊस - निर्माता भूषण कुमार, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि भारतीय सुपरस्टार अल्लू अर्जुन एका मोठ्या सहयोगासाठी एकत्र आले आहेत. या असोसिएशन अंतर्गत टी-सीरीज फिल्म्स प्रोडक्शन आणि भद्रकाली पिक्चर्सद्वारे चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे."

हा चित्रपट 'पुष्पा'प्रमाणे पॅन इंडिया असू शकतो. भूषण कुमार यांनी याआधीही बऱ्याचशा पॅन इंडिया चित्रपटांची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा हे रणबीर कपूरसह ‘अ‍ॅनिमल’ आणि 'स्पिरिट' या चित्रपटांमध्ये व्यस्त आहेत. हे चित्रपट पूर्ण झाल्यानंतर या चित्रपटाच्या निर्मितीवर काम सुरु केले जाणार आहे.

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' ठरला ब्लॉकबस्टर​​​​​​​

अल्लू अर्जुन दक्षिणेतील सुपरस्टार आहे. त्याच्या 'पुष्पा द राइज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक विक्रम मोडित काढले. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात त्याच्यासह रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने जगभरात जवळपास 300 कोटी रुपयांची कमाई केली तर भारतात चित्रपटाने 200 कोटींची कमाई केली आहे. ‘पुष्पा’ हा चित्रपट 17 डिसेंबर 2021 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रुथ प्रभूने आयटम सॉंग देखील केले आहे.

आता अल्लू चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजेच ‘पुष्पा द रुल’च्या चित्रीकरणात बिझी आहे. चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात पुन्हा एकदा अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना ही जोडी एकत्र दिसणार आहे. वृत्तानुसार, हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...