आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरणाचा किस्सा:बोस्टनमध्ये सहा मुलांच्या टोळीने केले होते अमिताभ यांचे अपहरण, पैसे आणि पासपोर्ट हिसकावून घेतला होता

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमिताभ बच्चन यांचे एकदा अपहरण झाले होते. असे जर आम्ही तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का. पण होय हे खरे आहे. एकदा अमिताभ काही कामानिमित्ताने बोस्टनला गेले होते. तिथे सहा मुलांच्या टोळीने त्यांचे अपहरण करुन त्यांचा पासपोर्ट, कागदपत्रे आणि जवळील पैसे हिसकावून घेतले होते. त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी तिथे कुणीही नव्हते, असा खुलासा एका मुलाखतीत अमिताभ यांनी केला होता.

सहा मुलांच्या टोळीने मदतीच्या बहाण्याने पासपोर्ट आणि पैसे हिसकावले
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी 2001 मध्ये एक मुलाखत दिली होती, जी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मुलाखतीत अमिताभ यांनी सांगितल्यानुसार, एकदा ते बोस्टनला गेले होते. तिथे एके दिवशी हॉटेलच्या लॉबीबाहेर 6 मुलांच्या टोळीने आधी त्यांच्या नकळत त्यांच्यावर पेंट फेकला. यानंतर त्या मुलांनी त्यांना मदत करण्याचे नाटक केले आणि त्यांचे जॅकेट स्वच्छ करण्याच्या बहाण्याने त्यांचे अपहरण केले. नंतर त्यांची ब्रीफकेस हिसकावून पळ काढला. त्यांच्या ब्रीफकेसमध्ये काही कागदपत्रे, पासपोर्ट आणि पैसे होते.

त्याक्षणी मला असहाय्य वाटले होते, कारण मदतीसाठी कुणीही नव्हते, असे अमिताभ यांनी या मुलाखतीत सांगितले होते. ही घटना घडली तेव्हा बिग बी भारतात सुपरस्टार म्हणून ओळखले जात होते. केवळ भारतातच नव्हे तर जगात त्यांची प्रचंड लोकप्रियता होती.

मुलगा अभिषेकसोबत बिग बी.
मुलगा अभिषेकसोबत बिग बी.

एबीसीएल या प्रोडक्शन हाऊसच्या फ्लॉप चित्रपटांमुळे दिवाळखोर झाले होते बिग बी
या मुलाखतीत बिग बींनी पुढे सांगितले होते की, त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन त्यावेळी बोस्टन कॉलेजमध्ये शिकण्यासाठी गेला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने एबीसीएल प्रोडक्शन हाऊसच्या कामात मदत करावी, अशी अमिताभ बच्चन यांची इच्छा होती. पण त्याचकाळात त्यांचे कुटुंब आर्थिक अडचणीत होते. त्याचे कारण म्हणजे एबीसीएलमध्ये बनलेले चित्रपट फ्लॉप होत होते, त्यामुळे बिग बी 90 कोटींच्या कर्जात बुडाले होते. कर्ज फेडण्यासाठी त्यांनी त्यांचा प्रतीक्षा बंगलाही गहाण ठेवला होता. लोक त्यांच्या घराबाहेर कर्ज मागायला यायचे, त्याला धमक्या द्यायचे.

यश चोप्रांनी 'मोहब्बतें' या चित्रपटात काम देऊन केली होती मदत
या वाईट परिस्थितीवर मात करण्यासाठी बिग बींना यश चोप्रांची मदत मिळाली. काम मागण्यासाठी बिग बी यश चोप्रांकडे गेले होते. त्यावेळी ते मोहब्बतें या चित्रपटावर काम करत होते. त्यांनी या चित्रपटात अमिताभ यांना संधी दिली. या चित्रपटातून अमिताभ यांनी त्यांच्या करिअरची सेंकड इनिंग सुरू केली. हा चित्रपट खूप गाजला. त्यासोबतच अमिताभ यांनी केबीसीद्वारे छोट्या पडद्यावर पाऊल ठेवले. या शोच्या 85 भागांसाठी त्यांना 15 कोटी रुपये मिळाले होते.

'मोहब्बतें' या चित्रपटातील एक दृश्य. या चित्रपटात बिग बींनी शाहरुख खानसोबत काम केले होते. या चित्रपटाद्वारे बिग बींनी आपल्या करिअरच्या सेकंड इनिंगला सुरुवात केली होती.
'मोहब्बतें' या चित्रपटातील एक दृश्य. या चित्रपटात बिग बींनी शाहरुख खानसोबत काम केले होते. या चित्रपटाद्वारे बिग बींनी आपल्या करिअरच्या सेकंड इनिंगला सुरुवात केली होती.

12 फ्लॉपनंतर जया यांनी दिली होती अमिताभ यांना साथ
अमिताभ बच्चन यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला होता. जया यांनी 1973 मध्ये आलेल्या 'अनामिका' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले होते. यानंतर दोघेही 'जंजीर' चित्रपटात दिसले. असे म्हटले जात होते की, 'जंजीर'पूर्वी बिग बींचे 12 चित्रपट फ्लॉप झाले होते, त्यानंतर कोणतीही अभिनेत्री त्यांच्यासोबत काम करण्यास तयार नव्हती. त्यानंतर जया यांनी त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. यावर अमिताभ बच्चन यांनी त्यांना म्हटले होते की, जर हा चित्रपट हिट झाला तर आपण एकत्र लंडन टूरला जाऊ.

'जंजीर' चित्रपटातील हा एक सीन आहे, या चित्रपटात बिग बींनी जया बच्चनसोबत पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली होती.
'जंजीर' चित्रपटातील हा एक सीन आहे, या चित्रपटात बिग बींनी जया बच्चनसोबत पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली होती.

'सेक्शन 84' आणि 'प्रोजेक्ट के' चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत बिग बी
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ऊंचाई' या चित्रपटात अमिताभ बच्चन झळकले होते. सध्या बिग बी 'सेक्शन 84' आणि 'प्रोजेक्ट के' या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. अमिताभ यांनी अलीकडेच आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून 'सेक्शन 84' या चित्रपटातील भूमिका आव्हानात्मक असल्याचे सांगितले होते.