आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरु आहेत. अमिताभ आणि अभिषेक यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
रुग्णालयातदेखील बिग बींनी आपले दैनंदिन काम चालू ठेवले आहे. ते आपले चाहते, कलीग्स, आणि मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असून आपला ब्लॉगही अपडेट करत आहेत. त्यांच्या रविवारी झालेल्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट आज येणार आहे.
रविवारी रात्री बिग बींनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले, "वाढदिवस- मनोजकुमार ओझा, तरण घंटासला. सोमवार, 13 जुलै. या दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही कायम आनंदी राहा."
बिग बींनी त्यांच्यासाठी प्रार्थना करणा-या चाहत्यांचेदेखील आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले, "माझ्या प्रियजनांनो, अभिषेक, ऐश्वर्या, आराध्या आणि तुमच्याबद्दलची माझी चिंता, प्रार्थना आणि त्वरित बरे व्हावे, यासाठी दिलेल्या शुभेच्छांनी मी कृतज्ञ आहे. आपणा सर्वांचे आभार." रविवारी रात्री त्यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही चाहत्यांचे आभार मानले.
“अमिताभ बच्चन यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्या सौम्य लक्षणे आढळली आहेत. सध्या त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे”, असे नानावटी रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
अमिताभ यांना नेमके किती दिवस रुग्णालयामध्ये ठेवणार? याविषयीची माहिती अभिषेकने टि्वट करुन दिली आहे. “मी आणि माझे वडील किती दिवस रुग्णालयात राहणार ते सर्व डॉक्टरांवर अवलंबून आहे. प्रत्येकाने सावधगिरी बाळगून काळजी घ्यावी, कृपाकरुन नियमांचे पालन करा” असे अभिषेकने त्याच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
My father and I remain in hospital till the doctors decide otherwise. Everyone please remain cautious and safe. Please follow all rules!
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) July 12, 2020
अमिताभ आणि अभिषेकसह ऐश्वर्या आणि आराध्या यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मात्र दोघींना रुग्णालयात दाखल करण्यात येणार नाही. त्या घरीच होम क्वारंटाइनमध्ये राहणार आहेत. मुंबई महापालिकेने सध्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली असून ते आवश्यक ती सर्व पावले उचलत आहेत, असे अभिषेकने त्याच्या टि्वटमध्ये सांगितले होते.
मुंबई महापालिकेने अमिताभ बच्चन यांचा बंगला ‘जलसा’ कन्टेन्मेंट झोन म्हणून रविवारी जाहीर केला. तसा अधिकृत बॅनरच पालिका कर्मचाऱ्यांनी या बंगल्याबाहेर लावला. त्यामुळे या भागात आता कोणालाही प्रवेश करता येणार नाही. अमिताभ यांच्या जलसा आणि जनक या बंगल्यात राहणाऱ्या सगळ्यांची कोविड चाचणी होणार आहे. मुंबई महापालिकेने बच्चन यांच्या बंगल्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार केली आहे. बच्चन कुटुंबाच्या वेगवेगळया बंगल्यांमध्ये मिळून एकूण 45 जण काम करतात. यातील 28 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले.
अमिताभ बच्चन यांनी शनिवारी रात्री स्वत: टि्वट करुन कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी रुग्णालयात दाखल झालो आहे. काही चाचण्या आणखीही केल्या जाणार आहेत. मागील दहा दिवसात जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनीही चाचणी करावी असे आवाहन मी करतो आहे.” या आशयाचं ट्विट त्यांनी केले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.