आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन महिन्याभरापूर्वी हैदराबाद येथे त्यांच्या आगामी 'प्रोजेक्ट के' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाले होते. या अपघातानंतर डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा आणि शूटिंग व इतर कामांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान त्यांच्या एका जवळच्या मित्राने त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती दिली आहे. या मित्राने सांगितल्यानुसार, डॉक्टरांनी परवानगी दिली नसतानाही अमिताभ बच्चन यांनी काही आठवड्यांपूर्वी एका जुन्या कमिटमेंटमुळे फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला होता.
अमिताभ यांच्या तब्येतीत सुधारणा व्हायला वेळ लागतोय - क्लोज फ्रेंड
अमिताभ बच्चन यांच्या फॅमिली फ्रेंडने ईटाइम्सला त्यांच्या तब्येतीबद्दलची आणि ते पुन्हा शूटिंग कधी सुरु करणार याबद्दलची माहिती दिली आहे. त्यांच्या निकटवर्तीयाने सांगितल्यानुसार, 'बच्चन साहेबांना लवकरच शूटिंगवर परतायचे आहे. पण त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हायला वेळ लागत आहे. तब्येत हळूहळू सुधारत आहे. या वयात धोका पत्करणे योग्य नाही,' असे ते म्हणाले.
मार्च 2023 च्या पहिल्या आठवड्यात अमिताभ 'प्रोजेक्ट के'चे शूटिंग करत असताना एका सीन दरम्यान त्यांच्या बरगड्यांना दुखापत झाली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती करण्यास सांगितले होते. डॉक्टरांनी परवानगी दिल्यावरच मी कामावर येईन असे बिग बींनी सांगितले होते.
ब्लॉगद्वारे दिली होती अपघाताची माहिती
महिन्याभरापूर्वी अमिताभ यांनी त्यांना झालेल्या अपघाताची माहिती ब्लॉगद्वारे दिली होती. त्यांनी लिहिले होते की, 'हैदराबादमध्ये 'प्रोजेक्ट के'च्या शूटिंगदरम्यान ॲक्शन सीन शूट करताना मी जखमी झालो. बरगड्यांच्या मांसपेशींना दुखापत झाली. त्यामुळे शूटिंग रद्द करण्यात आले आहे. हैदराबादमधील AIG रुग्णालयामध्ये डॉक्टरांचा सल्ला घेतला असून सीटी स्कॅनही केले. आता घरी परतलो आहे. मलमपट्टी करण्यात आली असून सध्या मला आराम करण्याचा सल्ला दिला आहे,' असे त्यांनी सांगितले होते.
श्वास घेण्यासही होतोय त्रास - अमिताभ
बच्चन यांनी पुढे लिहिले होते की, 'हे वेदनादायक आहे. हालचाल करण्यासाठी आणि श्वास घ्यायला त्रास होतोय. या अपघातातून ठीक होण्यासाठी काही आठवडे जातील असं डॉक्टरांकडून सांगण्यात आले. वेदनांसाठी काही औषधेही देण्यात आली आहेत. जोपर्यंत यातून बरे वाटत नाही तोपर्यंत सर्व कामं पुढे ढकलण्यात आली आहेत किंवा रद्द करण्यात आली आहेत. मी सध्या जलसामध्ये आराम करतो आहे. आवश्यक गोष्टींसाठीच थोडीफार हालचाल करेन. अधिकतर वेळ मी आरामच करत आहे. संध्याकाळी जलसाच्या गेटवर माझ्या हितचिंतकांना भेटणे आज मला शक्य होणार नाही. त्यामुळे कृपया येऊ नका. त्यामुळे जे येण्याचा विचार करत आहेत, त्यांनाही कळवा. बाकी सर्व गोष्टी ठीक आहेत,' असे त्यांनी लिहिले होते.
अमिताभ बच्चन यांचे चित्रपट
विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनी दुखापत होण्यापूर्वी रिभू दासगुप्ता यांचा 'सेक्शन 84' हा चित्रपट साइन केला होता, मात्र अद्याप त्यांनी या चित्रपटासाठी त्यांच्या तारखा सांगितल्या नाहीत. तसेच 'प्रोजेक्ट के' व्यतिरिक्त ते आगामी 'गणपत', 'घूमर', 'द उमेश क्रॉनिकल्स' आणि 'बटरफ्लाय' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.