आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बच्चन कुटुंबीयांचे लसीकरण:अभिषेक बच्चन वगळता कुटुंबातील सर्वांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस, बिग बी म्हणाले - सर्व काही ठीक आहे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिग बींनी आपल्या कुटुंबासमवेत लस घेतली.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी कोरोनाचा लसीचा पहिला डोस घेतला आहे. 78 वर्षीय बिग बींनी गुरुवारी रात्री उशिरा सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. बिग बींनी आपल्या कुटुंबासमवेत लस घेतली. त्यांनी सोशल मीडियावर याबद्दल सांगताना लिहिले, "आज दुपारी कोविड व्हॅक्सिनेशन झाले. सर्व काही ठीक आहे."

इतकेच नाही तर बिग बींनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातूनही याविषयी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, मुलगा अभिषेक वळगता कुटुंबातील सर्वांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. त्यांनी लिहिले, 'लसीकरण झाले.. सर्व काही ठीक आहे.. काल कुटुंब आणि सगळ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली होती.. त्याचा निकाल आज आला.. सर्व ठीक आहेत, सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. त्यामुळे लसीकरण झाले आहे. अभिषेक वगळता कुटुंबातील सर्व सदस्यांना लस दिली गेली आहे.’

अमिताभ बच्चन यांनीही त्यांचा लसीचा डोस घेतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये रुग्णालयातील कर्मचारी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लस देताना दिसत आहेत. यावेळी बिग बींनी पांढरा कुर्ता पायजमा, हेड गियर आणि मोठा चष्मा परिधान केलेला दिसतो आहे.

अभिषेक बच्चन सध्या उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे आपल्या आगामी ‘दहावी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तुषार जलोटा दिग्दर्शित या चित्रपटाचे वेळापत्रक दोन दिवस आधीच पूर्ण झाले आहे. अभिषेक मुंबईबाहेर असल्याने त्याला आपल्या कुटुंबासह लस घेता आली नाही.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत बच्चन कुटुंब झाली होती कोरोनाची लागण

गेल्या वर्षी अमिताभ यांच्या पत्नी, अभिनेत्री आणि राजकारणी जया बच्चन यांना वगळता संपूर्ण बच्चन कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. 11 जुलै 2020 रोजी अमिताभ आणि अभिषेक यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 22 दिवस आयसोलेशन वॉर्डमध्ये राहिल्यानंतर 2 ऑगस्ट 2020 रोजी अमिताभ यांना डिस्चार्ज देण्यात आला. पण अभिषेकला 28 दिवस रुग्णालयात राहावे लागले होते. .

अमिताभ यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि नात आराध्याचा 12 जुलै 2020 रोजी कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. परंतु लक्षणे दिसत नसल्याने दोघीही होम क्वारंटाइन होत्या. मात्र, 17 जुलै 2020 रोजी आई-मुलीची प्रकृती खालावली आणि दोघींनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात 10 दिवस राहिल्यानंतर 11 व्या दिवशी दोघींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...