आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘झुंड’ चित्रपटातील अभिनेत्याला अटक:प्रियांशू क्षत्रियवर 5 लाखांचे दागिने लंपास केल्याचा आरोप, 25 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

एका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटातील अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. प्रियांशू क्षत्रिय असे या अभिनेत्याचे नाव असून तो 18 वर्षांचा आहे. नागपूर शहर पोलिसांनी प्रियांशूला अटक केली आहे. ‘झुंड’ या चित्रपटात त्याने बाबू ही भूमिका व्यक्तिरेखा साकारली होती. 'अरे क्या फुर्र फुर्र कर रहा है? इधर क्या खजाना वजाना गाडा है क्या?', हा त्याचा चित्रपटातील संवाद गाजला होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नागपूरमधील मनकापूर भागातील रहिवासी असलेल्या 64 वर्षीय प्रदीप मोंडावे यांच्या घरातून पाच लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. याप्रकरणी मोंडावे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नागपूर पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी केल्यानंतर या गुन्ह्यात प्रियांशू क्षत्रियचा सहभाग असल्याचा दावा त्याने केला.

नागपुरातील गड्डीगोदाम परिसरात एका कबुतराच्या पेटीतून चोरीच्या वस्तू जप्त करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड सिनेमामध्ये हा परिसर दिसला आहे.

यानंतर नागपूर शहर पोलिसांनी मंगळवारी प्रियांशू क्षत्रियला अटक केली. प्रियांशू क्षत्रियला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 25 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रियांशू क्षत्रिय याला यापूर्वी रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

प्रियांशु हा एक चांगला फुटबॉलपटू देखील आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या संघाने फुटबॉलचा सामनाही जिंकला होता. फुटबॉल खेळल्यामुळे त्याची या चित्रपटासाठी निवड झाली होती. चुकीच्या संगतीत पडून त्याला अंमली पदार्थांचे व्यसन लागले. त्यासाठी त्याने चोरीही सुरू केली. प्रियांशूचे वडील रोजंदारी मजूर आहेत. त्याला तीन मोठ्या बहिणीही आहेत.

अशी झाली होती प्रियांशूची झुंड चित्रपटासाठी निवड

नागपुरात रेल्वेच्या ट्रॅक जवळच प्रियांशू राहायचा. त्याचे लहानपण तिथेच गेले आहे. 'मी ट्रेनमधून कोळसा पाडायचो आणि आम्ही तो गोळा करून विकायचो. एक दिवस ट्रेनमधून कोळसा पाडत असतानाच नागराज दादाची कारमधून एन्ट्री झाली. मी म्हटले, चला पळा, पोलिस आलेत, ते कारमधून उतरले, त्यांच्याकडचा कॅमेरा वगैरे हे पोलिसवाले नाहीत तर न्यूजवाले आहेत, असे मला वाटले. त्यांनी कॅमेरा काढला अन् वस्तीत फिरवला. त्यांचा कॅमेरा आमच्यावर रोखला गेला. हे सगळे काय आहे, असे मी त्यांना विचारलं, तर आमचा प्रोजेक्ट सुरु असल्याचे त्यांनी सांगितलं. मग त्यांनी चित्रपटासाठी विचारणा केली,' असा किस्सा प्रियांशूने झुंड चित्रपटाच्या रिलीजवेळी सांगितला होता.

झुंड या चित्रपटाला समीक्षकांनी पसंतीची पावती दिली होती. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन, किशोर कदम, छाया कदम, रिंकु राजगुरू, आकाश ठोसर, सोमनाथ अवघडे, अंकुश गेदाम, प्रियांशु क्षत्रिय, रजिया काजी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...