आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे सुपरस्टार आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्या चित्रपटाने बिग बी सुपरस्टार झाले, तो चित्रपट आता चाहत्यांना ओटीटीवर बघता येणार आहे. 11 मे 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या ‘जंजीर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आज 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात त्यांनी पोलिस इन्स्पेक्टर ‘विजय’ हे पात्र साकारले होते, यानंतर चित्रपटसृष्टीत अमिताभ यांना ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले. आता प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवरसुद्धा या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.
अमिताभ बच्चन यांचे सर्व चाहते 'झी- 5' (ZEE5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात. IMDb वर या चित्रपटाला 7.5 रेटिंग देण्यात आले आहे. ५० वर्षे पूर्ण झाल्यावर आजही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. आता चित्रपट ओटीटीवर येत असल्याने अमिताभ यांच्या चाहते आणि प्रेक्षकांसाठी चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.
अमिताभ बच्चन यांना सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला. एकाच वेळी 12 चित्रपट फ्लॉप झाल्यावर त्यांच्यासोबत काम करण्यासाठी कोणीही उत्सुक नव्हते. परंतु जेव्हा त्यांना ‘जंजीर’ चित्रपटासाठी कास्ट केले तेव्हा त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. अमिताभ यांचा हा चित्रपट कसा मिळाला वाचा -
असा मिळाला होता अमिताभ बच्चन यांना 'जंजीर' हा चित्रपट
त्या काळातील स्टार असलेल्या धर्मेंद्र यांनी सलीम-जावेद या लेखक जोडीकडून 'जंजीर' चित्रपटाची स्क्रिप्ट विकत घेतली होती. प्रकाश मेहरा त्यावेळी 'समाधी' चित्रपटावर काम करत होते. धर्मेंद्र यांना 'समाधी'ची स्क्रिप्ट इतकी आवडली की त्यांनी प्रकाश मेहरांकडून 'समाधी'ची स्क्रिप्ट घेतली आणि त्यांना 'जंजीर'ची स्क्रिप्ट दिली. आता प्रकाश मेहरा हिरोच्या शोधात होते. त्यांची पहिली पसंती धर्मेंद्र यांना होती, पण ते आधीच व्यस्त होते. देव आनंद यांनी गाणी कमी असल्याचे सांगत चित्रपट नाकारला. तसेच राजकुमारने इतर चित्रपटांसोबत साऊथमध्ये शूटिंग करण्याच्या अटीवर होकार दिला, पण चित्रपटाची कथा मुंबईची असल्याने प्रकाश यांनी साऊथमध्ये चित्रीकरणास नकार दिला.
प्राण यांनी प्रकाश मेहरांना बघायला सांगितला 'बॉम्बे टू गोवा' चित्रपट
एके दिवशी प्राण यांनी प्रकाश मेहरांना सांगितले की, त्यांनी अमिताभला चित्रपटात साईन करावे, त्याला पाहून भविष्यात तो स्टार होईल असे वाटते. अमिताभ यांचे 12 चित्रपट फ्लॉप ठरले होते, त्यामुळे प्रकाश मेहरा त्यांना कास्ट करण्याबाबत द्विधा मनःस्थितीत होते. पण त्यांनी प्राण यांच्या सांगण्यावरून अमिताभ यांचा 'बॉम्बे टू गोवा' हा चित्रपट पाहिला. चित्रपटात अमिताभ यांना पाहून प्रकाश मेहरा मोठ्याने ओरडले… 'जंजीर'ला हिरो मिळाला...
अमिताभ यांची निवड केल्याने प्रकाश मेहरांवर झाली होती टीका
अमिताभ यांना कास्ट केल्यामुळे प्रकाश मेहरा यांच्यावर जोरदार टीका झाली होती. हा चित्रपट नक्कीच फ्लॉप ठरेल असे लोकांनी सांगितले. सततच्या अपयशामुळे खुद्द अमिताभही निराश झाले होते. त्यांनी प्रकाश मेहरा यांना सांगितले की, हा चित्रपट जर चालला नाही तर ते मुंबई सोडून अलाहाबाद (आता प्रयागराज) येथील आपल्या घरी निघून जातील. या चित्रपटात मुमताज यांना नायिका म्हणून घेण्यात आले होते. पण त्याचकाळात मुमताज यांनी लग्न केले आणि चित्रपट सोडला. अमिताभसोबत काम करायला दुसरी कोणतीही नायिका तयार नव्हती. एके दिवशी अमिताभ यांनी जयाला सांगितले की, त्यांच्यासोबत काम करण्यास कोणतीही हिरोईन तयार नाही. प्रकाश मेहरा यांनी विचारल्यास ती 'जंजीर' चित्रपट करेल, असे जया म्हणाली. प्रकाश यांना विचारल्यावर जया यांनी लगेच होकार दिला. वितरकांनी अमिताभची खिल्ली उडवली की हा उंच मूर्ख हिरो कोण आहे? हे ऐकून ते खूप रडले.
अमिताभ यांना आला होता 104 डिग्री ताप
अखेर 11 मे 1973 रोजी 'जंजीर' हा चित्रपट प्रदर्शित झाला. कोलकात्यात या चित्रपटाने चांगली कमाई केली, पण मुंबईत सुरुवातीचे दिवस चित्रपटाने चांगली कामगिरी केली नाही. अमिताभ एवढे खचले की त्यांना ताप आला. चार दिवसांनंतर, प्रकाश मेहरा, मुंबईतील गेटी गॅलेक्सी सिनेमाच्या बाहेरून जात असताना त्यांना थिएटरच्या खिडकीवर गर्दी दिसली. लोक 5 रुपयांचे तिकीट 100 रुपयांना खरेदी करत होते. त्यांनी गेटी गॅलेक्सीमध्ये एवढी गर्दी कधीच पाहिली नव्हती. अमिताभ यांना ही बातमी समजताच त्यांचा ताप 104 डिग्रीवर गेला. त्यांचा विश्वास बसत नव्हता. एका आठवड्यानंतर, अमिताभ बच्चन स्टार बनले होते आणि ते इंडस्ट्रीचे अँग्री यंग मॅन बनले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.