आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्य घटनेवर आधारित '200 - हल्ला हो':दीर्घ काळानंतर चित्रपटात दिसणार अमोल पालेकर, रिंकू राजगुरुचीही महत्त्वाची भूमिका; भूमिकेविषयी पालेकर म्हणाले - माझ्या पात्राला अनेक कंगोरे आहेत

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • '200- हल्ला हो' हा चित्रपट येत्या 20 ऑगस्ट रोजी मराठी आणि हिंदीमध्ये zee5 वर रिलीज होणार आहे.

ZEE5 ने अलीकडेच आगामी चित्रपट ‘200 - हल्ला हो’चा ट्रेलर रिलीज केला. '200 हल्ला हो’ हा एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे, ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, अभिनेता बरुण सोबती आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू, उपेंद्र लिमये, साहिल खत्तर, सलोनी बत्रा आणि इंद्रनील सेनगुप्ता या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

'200- हल्ला हो' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची उत्कंठा फारच वाढली आहे. कारणही तसेच आहे, ते म्हणजे अमोल पालेकर यांचे बऱ्याच काळानंतर पडद्यावर झालेले पुनरागमन, सत्यघटनेवर प्रेरित दमदार कथानक.

सार्थकी दासगुप्ता दिग्दर्शित, '200-हल्ला हो' ही गोष्ट आहे, 200 दलित स्त्रियांची ज्यांनी एकत्र येऊन गुंडगिरी करणाऱ्या टोळी, लुटेरे आणि बलात्काऱ्यांविरुद्ध कोर्टामध्येच कायदा आणि न्याय स्वतःच्या हातात घेतला. ट्रेलरमध्ये कलाकारांनी साकारलेल्या दमदार भूमिकेची झलक दिसते. सत्य घटनेवर आधारित या कथेमध्ये स्त्रियांना न्याय मिळवण्यासाठी, कोणत्या परिस्थितीमध्ये हा लढा लढण्याची ताकद मिळाली आणि निर्णय घेतला याचे अतिशय सुरेख चित्रण केले आहे.

चित्रपटाविषयी अमोल पालेकर म्हणतात, "मला कथेमधील जाती व्यवस्थेवर भाष्य करणारा धागा आवडला जो भारतीय चित्रपटांमध्ये आधी फार दिसायचा नाही. तसेच, जातीची दडपशाहीला बळी पडलेल्या स्त्रियांनी न डगमगता केलेला संघर्ष, हे तथ्य फार आवडले. जातीयवाद आणि पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध अॅस्ट्रोसिटीसाठी आवाज उठवणाऱ्या या स्त्रियांना हे एक अभिवादन आहे. चित्रपट सत्यघटनेवर आधारित असल्यामुळे मला काम करायला अधिक छान वाटले. माझे रिटायर्ड दलित न्यायाधीशाचे पात्र आम्ही सखोल चर्चा करून रंगवल्यामुळे त्याला अनेक कंगोरे आहेत.'

रिंकू राजगुरू म्हणते, " ही कथा सत्यघटनेवर आधारित असल्यामुळे मला माझे पात्र हे स्त्रियांनी मिळवलेल्या न्यायाबद्दल जागरूकता पसरवण्याची संधी आहे असे वाटले. स्वतःसाठी आणि इतरांसाठी बोलणे किती महत्त्वाचे आहे हे देखील या कथेतून आपल्याला कळते. सार्थक सरांनी (चित्रपटाचे दिग्दर्शक) जेव्हा पहिल्यांदा मला ही कथा ऐकवली तेव्हाच मला कथेतील वास्तवाने हलवून टाकले. दलित स्त्रिया कशा रोज भरडल्या जात होत्या, पण त्याविरुद्ध कोणीही आवाज उठवत नाही याचे मला फार वाईट वाटले. माझं रक्त अक्षरशः खवळले होते! म्हणूनच मी हे पात्र साकारणार आहे, जे स्वतःसाठी आणि इतरांसाठी आवाज उठवते."

सार्थक दासगुप्ता लिखित आणि दिग्दर्शित, योडली फिल्म्स द्वारे निर्मित, सारेगामा द्वारे प्रदर्शित चित्रपट '200- हल्ला हो' हा चित्रपट येत्या 20 ऑगस्ट रोजी मराठी आणि हिंदीमध्ये zee5 वर रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...