आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिग्दर्शक केदार शिंदे यांचा आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. शाहीर साबळे यांचा जीवनपट या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना बघता येणार आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरीने शाहीर साबळेंची भूमिका साकारली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.
अभिनेता अंकुश चौधरीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. तसेच एव्हरेस्ट मराठी या युट्यूब चॅनलवरदेखील हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. "अभिमानाने, आदराने आणि प्रेमाने सादर करत आहोत.... बहुचर्चित, बहुप्रतिक्षीत महाराष्ट्राचा महासिनेमा ‘महाराष्ट्र शाहीर’ चा महाट्रेलर.!! जना-मनातला आवाज अर्थात शाहीर साबळे यांची भव्य जीवनगाथा 28 एप्रिलपासून महाराष्ट्राच्या प्रत्येक चित्रपटगृहात.." असे अंकुशने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
या चित्रपटाला अजय अतुल यांनी संगीत दिले आहे. यातील गाणी चाहत्यांच्या पसंतीस पडली आहे. ट्रेलरमध्येदेखील लक्षवेधून घेणारे संवाद आहेत. 'आम्ही कलाकार आहोत कुणाचे मिंधे नाहीत..' यासह अनेक संवाद लक्षात राहणारे आहेत.
ट्रेलरमधून शाहीर साबळे यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. अगदी लहानपणापासून ते महाराष्ट्र शाहीर बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. ट्रेलरमध्ये अंकुश चौधरी शाहीर साबळे यांच्या भूमिकेत अगदी उठून दिसत आहेत. याबरोबरच शाहीर यांचं राजकीय क्षेत्रातील योगदान, सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य, त्यांच्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्याचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील महत्त्व, त्यांच्या खासगी आयुष्यातील चढ-उतार यासह अनेक गोष्टींचा उलगडा या चित्रपटात होणार आहे.
या चित्रपटातून केदार शिंदे यांची लेक सना शिंदे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. अंकुश आणि सना यांच्यासह अश्विनी महांगडे, मृण्मयी देशपांडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. येत्या 28 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
केदार शिंदेच्या मुलीचे सिनेसृष्टीत पदार्पण:'महाराष्ट्र शाहीर'मध्ये साकारतेय खास भूमिका, वडील केदार म्हणाले...
शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राला दिलेली 'महाराष्ट्राची लोकधारा' आजही अनेकांच्या स्मरणात आहे. शाहीर साबळे यांचे नातू आणि प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे शाहीर साबळे यांच्या जीवनावर चित्रपट करत आहेत. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसणार आहे. तर या चित्रपटातील एका महत्वाच्या भूमिकेविषयी आज केदार शिंदे यांनी पोस्ट केली आहे. वाचा सविस्तर...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.