आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताप:व्हेकेशनचे फोटो शेअर करणा-या सेलिब्रिटींवर संतापले अन्नू कपूर, म्हणाले - 'हे म्हणजे उपाशी लोकांसमोर बसून पक्वान्नांनी भरलेली थाळी खाल्यासारखे आहे'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकी, श्रुती हसन यांनीही व्यक्त केली होती नाराजी

कोरोनाच्या दुस-या लाटेने देशभरात आक्राळविक्राळ रुप धारण केले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. सर्वत्र औषधे, बेड्स, ऑक्सिजनचा अभाव बघायला मिळतोय. ऑक्सिजन मिळत नसल्याने कोरोना रुग्णांचा तडफडून मृत्यू होतोय. अशी बिकट परिस्थिती असताना अनेक कलाकार मात्र परदेशी जाऊन सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. आणि त्यांच्या सुट्टीचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशा कलाकारांवर अभिनेते अन्नू कपूर यांनी निशाणा साधत त्यांना खडे बोल सुनावले आहेत. कलाकारांनी संवेदनशील असायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे.

अलीकडेच अन्नू कपूर यांनी एका न्यूज वेबसाइटला मुलाखत दिली. यात त्यांनी सेलिब्रिटींवर रोष व्यक्त केला आहे. अन्नू कपूर म्हणाले, 'तुम्ही सुट्टी घ्या आणि त्याचा आनंददेखील लुटा. यामुळे मला काहीच अडचण नाही. पण संपूर्ण देश कोरोना सारख्या जीवघेण्या विषाणूशी लढत असताना आणि दिवसाला हजारो लोक मरत असताना सेलिब्रिटींचे अशाप्रकारे सोशल मीडियावर व्हेकेशनचे फोटो शेअर करणे मला अजिबात आवडलेले नाही. असे करणे म्हणजे एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीच्या समोर बसून पक्वान्नांनी भरलेली थाळी खाल्यासारखे आहे,' असे ते म्हणाले.

पुढे अन्नू कपूर म्हणतात, 'तुमच्याकडे पैसा आहे आणि हे तुम्हाला परवडण्यासारखे आहे, हे मला माहित आहे. पण अशा कठीण परिस्थितीत हे असे वागणे आपल्याला शोभत नाही. यातून तुम्ही काय दाखवू इच्छिता? सेलिब्रिटींनी संवेदनशील असायला हवे आणि लोकांना सहानुभूती दाखवायला हवी,' असे मत अन्नू कपूर यांनी व्यक्त केले आहे.

एप्रिल महिन्यातही अन्नू कपूर यांनी या संदर्भात एक सोशल मीडिया पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी सेलिब्रिटींच्या व्हेकेशन ट्रीपवर टीका केली होती. त्यांनी लिहिले होते, 'श्रीमंत, सेलिब्रिटी आणि मीडिया यांना मी आवाहन करतो की, परदेशात जाऊन व्हेकेशन एन्जॉय करत असतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करू नका. कारण जगातील सर्वाधिक लोक या भयंकर रोगाचा सामना करत आहेत.'

नवाजुद्दीन सिद्दीकी, श्रुती हसन यांनीही व्यक्त केली होती नाराजी
अन्नू कपूर यांच्यापूर्वी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्री श्रुती हासन, लेखिका शोभा डे यांनीही कोरोना काळात सेलिब्रिटींचे परदेशात जाऊन सुट्टी एन्जॉय करणे आणि तेथील फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. श्रुती हसनने वाढत्या कोरोना संक्रमणावर चिंता व्यक्त करत अशा वेळी सुट्टीवर जाणाऱ्या सेलिब्रिटींवर नाराजी व्यक्त केली होती. सेलिब्रिटींचे वर्तन असंवेदनशील असल्याचे ती क्विंटला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली होती.

श्रुती म्हणाली होती, “मला आनंद आहे की त्यांना एक चांगली सुट्टी मिळाली. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र वैयक्तिक मला या काळात मास्क न घालता पूलमध्ये मज्जा करणे योग्य वाटत नाही. प्रत्येकासाठी ही कठीण वेळ आहे आणि काहींसाठी तर खूपच खडतर. मला वाटतं तुमच्याकडे ज्या सुखसोयी आहेत त्यासाठी तुम्ही आभारी आणि कृतज्ञ असायला हवे. तुमच्याकडील सुखसोयींचा लोकांसमोर दिखावा करण्याची ही गरज नाही,' असे म्हणत सोशल मीडियावर सुट्टीचे फोटो पोस्ट करणाऱ्यांवर तिने निशाणा साधला होता.

तर नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला होता, 'या लोकांनी तर मालदीवला तमाशा बनवून ठेवले आहे. त्यांच्या पर्यटन उद्योगाची काय व्यवस्था आहे, हे मला माहित नाही. पण माणुसकीच्या नात्याने तरी तुमचे फोटो सोशल मीडियावर शेअर करू नका. तुमचे फोटो तुमच्याकडेच ठेवा. येथे प्रत्येकजण मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जे लोक वाईट परिस्थितीचा सामना करत आहेत त्यांना असे फोटो दाखवून त्यांचे मन आणखी दुखावू नका. येथे लोकांना खायला अन्न मिळत नाहीये आणि यांना पैसे उडवायचे आहेत,' असे नवाज म्हणाला होता.

बातम्या आणखी आहेत...