आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बलात्कारप्रकरणी पोलिस चौकशीच्या दुसर्याच दिवशी अॅड. प्रियांका खिमानी यांनी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या वतीने निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये अनुरागवरील सर्व आरोप खोटे व निराधार असल्याचे म्हटले आहे. ऑगस्ट 2013 मध्ये जेव्हा ही कथित घटना घडली असे सांगितले जात आहे, तेव्हा अनुराग भारतत नव्हे तर श्रीलंकेत चित्रपटाचे शूटिंग करत होता, असे या निवेदनात म्हटले गेले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अनुराग कश्यपने आपल्या दाव्याशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे तपास अधिका-यांना सादर केली आहेत. यापूर्वी गुरुवारी अनुरागची मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये सुमारे 8 तास चौकशी करण्यात आली. सकाळी दहा वाजता त्याने पोलिस ठाणे गाठले आणि संध्याकाळी 6 नंतर तेथून तो बाहेर पडला.
अनुराग ऑगस्ट 2013 मध्ये श्रीलंकेत होता
अॅड. प्रियांका खिमानीने अनुरागच्या वतीने जे निवेदन जारी केले आहे त्यात म्हटले आहे की, "वर्सोवा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अभिनेत्रीने असा आरोप केला आहे की, माझा क्लायंट अनुराग कश्यपने तिला ऑगस्ट 2013 मध्ये आपल्या घरी बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अनुरागने या प्रकरणातील पुरावे म्हणून सर्व आवश्यक कागदपत्रे सोपविली आहेत, ज्यावरून ऑगस्ट 2013 मध्ये तो आपल्या चित्रपटाच्या शूटिंगच्या संदर्भात संपूर्ण महिनाभर श्रीलंकेत होता, हे स्पष्ट होते.'
खिमानी म्हणाल्या, "अशा कोणत्याही प्रकारची घटना कधीच घडली नव्हती, हे अनुरागने यापूर्वीच फेटाळून लावले आहे. आपल्यावर लावलेले सर्व आरोपांचेही त्याने खंडन केले आहे."
गुरुवारी आठ तास झाली चौकशी
अनुराग कश्यपची गुरुवारी मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये आठ तास चौकशी झाली. पोलिस सूत्रांनी सांगितले की, अनुरागने अभिनेत्री पायल घोषचे लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळून लावले आहेत. अनुरागने सांगितले की, त्याने पायलला वर्सोवा येथील आपल्या घरी कधीच बोलावले नाही. पायलला प्रोफेशनली ओळखतो, परंतु बर्याच दिवसांपासून तिला भेटलो किंवा तिच्याशी बोललो नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. चौकशीदरम्यान अनुरागने सांगितले की, जेव्हा पायलने केलेले आरोप कळले तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. पायलचे सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. त्यात कोणतेही सत्य नाही. हा माझ्याविरूद्ध कट आहे, असे अनुरागने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी त्याच्याविरोधात कोण आणि का कट रचणार असे विचारले असता याचे तो कोणतेही स्पष्ट उत्तर देऊ शकला नाही.
पायलला भेटण्याची कहाणी अनुरागने पोलिसांना सांगितली
अनुरागने पायलला केलेले काही ईमेलही पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत. यात एका प्रोजेक्टबद्दल दोघांमध्ये चर्चा झाली होती. याशिवाय अनुरागने पायलला पाठिंबा दर्शवलेले काही ट्विटही पोलिसांना दिले आहेत. पायलबरोबरच्या पहिल्या भेटीची सविस्तर माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. अनुरागच्या चौकशीदरम्यान पायलला मेडिकलसाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते.
मुंबई पोलिसांनी जारी केले होते समन्स
मंगळवारी मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यपला समन्स बजावले होते.पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबई बाहेर जाता येणार नाही, असेही त्याला सांगण्यात आले आहे. 22 सप्टेंबर रोजी पायल घोष हिने मुंबईतील वर्सोवा पोलिस ठाण्यात अनुराग कश्यपविरोधात एफआयआर दाखल केला आहे. बलात्कार, गैरवर्तन आणि चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी कलम 376, 354, 341 आणि 342 अंतर्गत कश्यपविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.