आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बलात्काराचा आरोप असलेल्या दिग्दर्शक अनुराग कश्यपची गुरुवारी मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये आठ तास चौकशी झाली. सकाळी 10.05 वाजता त्याने पोलिस स्टेशन गाठले आणि संध्याकाळी 6 नंतर तो तेथून बाहेर पडला. पोलिस सूत्रांनी सांगितले की, अनुरागने अभिनेत्री पायल घोषचे लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळून लावले आहेत. अनुरागने सांगितले की, त्याने पायलला वर्सोवा येथील आपल्या घरी कधीच बोलावले नाही. पायलला प्रोफेशनली ओळखतो, परंतु बर्याच दिवसांपासून तिला भेटलो किंवा तिच्याशी बोललो नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
चौकशीदरम्यान अनुरागने सांगितले की, जेव्हा पायलने केलेले आरोप कळले तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. पायलचे सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. त्यात कोणतेही सत्य नाही. हा माझ्याविरूद्ध कट आहे, असे अनुरागने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी त्याच्याविरोधात कोण आणि का कट रचणार असे विचारले असता याचे तो कोणतेही स्पष्ट उत्तर देऊ शकला नाही.
पायलला भेटण्याची कहाणी अनुरागने पोलिसांना सांगितली
अनुरागने पायलला केलेले काही ईमेलही पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत. यात एका प्रोजेक्टबद्दल दोघांमध्ये चर्चा झाली होती. याशिवाय अनुरागने पायलला पाठिंबा दर्शवलेले काही ट्विटही पोलिसांना दिले आहेत. पायलबरोबरच्या पहिल्या भेटीची सविस्तर माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. अनुरागच्या चौकशीदरम्यान पायलला मेडिकलसाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते.
अटक होण्याची शक्यता..
अनुरागविरोधात 4 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 376 (I) म्हणजे बलात्काराचा आरोप, 354 म्हणजेच एखाद्या स्त्रीचा विनयभंग करण्यासाठी तिला मारहाण करणे, 341 म्हणजे एखाद्या स्त्रीला चुकीच्या मार्गाने रोखणे आणि 34२ म्हणजे एखाद्याला ओलिस ठेवणे. यापैकी 376 ही अजामीनपात्र कलम आहे, त्यामुळे चौकशीत आरोप खरे असल्यास अनुरागला अटक केली जाऊ शकते.
पायलने ट्विट करुन म्हटले की, आशा करते मला न्याय मिळेल
मुंबई पोलिसांनी समन्स पाठवल्यानंतर पायल घोषने ट्विट केले की, अनुराग कश्यपला समन्स पाठवून त्याला वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलावण्याबद्दल धन्यवाद. आशा करते की मला न्याय मिळेल.
Thank you @MumbaiPolice ... @anuragkashyap72 has been called tomorrow at versova police station for summoning and questioning. Let's hope justice prevails....!!
— Payal Ghosh (@iampayalghosh) September 30, 2020
पायल घोषचा आरोप काय?
“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचे खरे रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असे ट्विट काही दिवसांपूर्वी पायलने केले.
अनुरागने फेटाळले आरोप
“क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतके खोटे बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतले. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असे ट्विट करत अनुराग कश्यपने पायलला उत्तर दिले होते.
मंगळवारी अभिनेत्रीने राज्यपालांची भेट घेतली
दरम्यान, अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करणाऱ्या पायल घोष हिने ‘वाय श्रेणी’तील सुरक्षेची मागणी केली आहे. अनुराग विरोधात पोलिस तक्रार केल्यामुळे तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या धमक्यांमुळे तिच्या जीवाला धोका आहे. परिणामी सरकारने पायलला ‘वाय श्रेणी’तील सुरक्षा द्यावी, अशी मागणी तिचे वकील नितिन सातपुते यांनी केली आहे. ही सुरक्षा मिळवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना एक विनंती अर्ज देखील लिहिला आहे.
मंगळवारी पायलने यासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. तिच्यासह आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले आणि त्यांच्या पक्षाचे काही कार्यकर्ते राजभवनात उपस्थित होते. अनुराग कश्यपला लवकरात लवकर अटक न केल्यास उपोषणावर बसणार असल्याचे तिने म्हटले आहे.
22 सप्टेंबर रोजी अनुरागविरोधात वर्सोवा पोलिस स्थानकात एफआयआर दाखल
22 सप्टेंबर रोजी अभिनेत्रीने मुंबईतील वर्सोवा पोलिस ठाण्यात अनुराग कश्यपविरोधात एफआयआर दाखल केला आहे. बलात्कार, गैरवर्तन आणि चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी कलम 376, 354, 341 आणि 342 अंतर्गत कश्यपविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे,
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.