आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशा भोसले वाढदिवस विशेष:लौकिक वयाचा पराभव करून पुढे निघालेली चिरतरुण स्वराशा

सुरेश वाडकर (विख्यात गायक)2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आशाताई जशा उत्तम गातात, तशाच त्या अतिउत्तम सुगरणही आहेत

किशोरावस्थेपासून ज्यांना आपण सतत ऐकले, ज्यांचा आदर्श नजरेसमोर ठेवला, अशा व्यक्तीचे मातृप्रेम आपल्याला लाभावे, यापरता भाग्ययोग कुठला असेल.. मी असा भाग्यवान आहे कारण ज्यांना सारे जग आशा भोसले या नावाने ओळखते, त्या आशाताई माझ्या ‘मां’ आहेत. माझ्यावर त्यांनी पुत्रवत प्रेम केले आहे. अशी माझी मातृदेवता आज लौकिक अर्थाने ८८ व्या वर्षात पदार्पण करते आहे. वयाच्या या टप्प्यावर दमलेली, थकलेली, सुरकुतलेली, दुर्मुखलेली, थरथरत्या गात्रांची अनेक माणसे अापल्याला सभोवती दिसून येतात. पण आशाताई... वयावर स्वार होऊन त्यांनी जणू वार्धक्याला पराजित केलं आहे, असं वाटतं. कागदोपत्री त्यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला असेल, पण आपल्या नजरेसमोर असणाऱ्या आशाताई अद्यापही चिरतरुण आहेत..त्यांच्या तेजस्वी स्वरासह...

आशाताई जशा उत्तम गातात, तशाच त्या अतिउत्तम सुगरणही आहेत

अशा मातृरूप आशाताईंचा आणि माझा पहिला परिचय एका मराठी चित्रपटातील गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी झाला. साल असावे १९७८..चित्रपट होता धाकटी मेहुणी..त्यामध्ये आशाताईंसोबत मी प्रथमच युगुलगीत गायिलो होतो. या गोष्टीला आता ४२ वर्षे उलटली आहेत, पण आशाताई आजही तशाच उत्साही, चैतन्यमयी आहेत. आमची पहिली भेट झाली, ती थेट रेकॉर्डिंगच्या वेळी. माझे त्यांच्यासोबतचे पहिलेच गाणे. त्यामुळे मी प्रचंड दडपणाखाली. पण त्या अगदी सहजपणे माझ्याजवळ आल्या. गाण्याचा माझा कागद स्वतःच्या हातात घेतला आणि म्हणाल्या, हे गाणं सुधीर फडके यांच्या शैलीजवळचं आहे. हे असं आहे...असं म्हणत त्यांनी माझी कडवी मला चक्क गाऊन दाखवली. मी एकदम रिलॅक्स झालो. नंतर आम्ही खूप वर्षं एकत्र काम केलं. खूप गाणी केली. त्यांनी पंचमदा आणि इतर संगीतकारांशी माझा परिचय करून दिला. माझं कौतुक केलं. माझ्या आयुष्यातला गायक म्हणून पहिला परदेश प्रवासही आशाताईंसोबत झाला. अमेरिकेची टूर मी त्यांच्यासोबत केली. तेव्हा प्रवासातल्या खेळकर आशाताई अनुभवल्या. आपल्यासोबतच्या प्रत्येकाची त्या काळजी घेत होत्या. नव्या कलाकारांना धीर देत होत्या. प्रत्यक्ष स्टेजवर आपल्या कलाकाराला सन्मान कसा द्यायचा, हे त्यांच्याकडून शिकावे. माझा परिचय तर त्यांनी स्वतःच तिथल्या रसिकांना करून दिला. शेवटी, ‘ये मेरा बेटा है और बहुत अच्छा गाता है’..असं म्हणून त्यांनी मला स्टेजवर बोलावलं..मी भरून पावलो तेव्हा. मी नवीन होतो तेव्हा, पण त्यांच्या प्रत्येक कृतीतून त्यांनी मला सहकारी असल्याच्या भावनेने वागवलं. त्या उडत्या चालीची, ठेक्याची गाणी म्हणायच्या, तेव्हा तर आम्ही एकत्र डान्स करायचो स्टेजवर, दृष्ट लागावी असा त्यांचा परफॉर्मन्स असायचा...त्यांच्या गाण्याइतकंच त्यांचं असं वागणंही कायम मनात घर करून राहतं. आशाताई जशा उत्तम गातात, तशाच त्या अतिउत्तम सुगरण आहेत. जगातल्या विविध प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण डिशेस, त्या स्वतः झटपट बनवतात. मी कित्येक वेळा त्यांचा हा सुगरणपणा अनुभवला आहे. आज जगभरात त्यांच्या नावाची रेस्टॉरंट चेन आहे. गाणं आणि खाणं, हे त्यांना परमप्रिय आहे.

माझ्या स्टुडिओत त्या आजही रेकॉर्डिंगला आल्या, की माझ्या घरी आवर्जून येतात किंवा मला बोलवतात. घरातल्यांची बारकाईनं चौकशी करतात. त्यांची स्मरणशक्ती अफाट असल्याने त्यांना सगळ्यांचे सगळे तपशील माहिती असतात. त्यांचे संदर्भ देत त्यांची चौकशी चालते. मी लहानपणापासून त्यांची गाणी ऐकत मोठा झालो. त्यांचा आदर्श ठेवला. त्यांच्यासोबत मला गाता येईल, वावरता येईल, प्रवास करता येईल आणि विलक्षण जिव्हाळ्यांचं नातं निर्माण होईल, याची मी कल्पनाही केली नव्हती. पण हे सारं घडलं आणि मला भाग्यवान करून गेलं. आशाताई व्यक्ती म्हणून फार विलक्षण आहेत. अतिशय मनमोकळा स्वभाव आहे त्यांचा. मनात धरून काही ठेवत नाहीत. जे मनात असेल, ते लगेच बोलणार आणि करणार. लपवाछपवी नाही. रागवणार तर चटकन आणि राग विसरणारही पटकन..आकाश निरभ्र असतं त्यांचं. अतिशय खेळकर, खट्याळपणा करण्यात पटाईत आहेत त्या. नकलाही अप्रतिम करतात. अडचणीत धावून येतात.

आशाताईंचा मला आवडणारा एक विशेष गुण म्हणजे त्या अतिशय कालसुसंगत आहेत. बदलत्या काळाशी, बदलणाऱ्या अभिरुचीशी आणि श्रोत्यांशी त्यांनी स्वतःला सातत्याने जोडून घेतलं आहे. त्यामुळे आजच्या तरुणाईलाही त्या आवडतात. आज लॉकडाऊनच्या काळातही त्या यू ट्यूबवरून नव्या मुलांसाठी व्यासपीठ मिळवून देत आहेत. दौरे नाहीत, प्रवास नाही, संगीतकार, वादकांच्या भेटी नाहीत. तरीही त्या नव्या तंत्रज्ञानाला मित्र करून, सतत संपर्कात असतात. जागतिक महामारीच्या संकटात सावधगिरी कशी बाळगावी, हे कळकळीने सांगतात. अशा या माझ्या मातृदेवतेला ईश्वरानं उदंड निरामय दीर्घायुष्य प्रदान करावं आणि त्यांचे मातृप्रेम अखंड मला लाभावं, हीच प्रार्थना.

आणि दीदींचा गैरसमज दूर झाला...

मध्यंतरी काही व्यक्तींनी माझ्यामध्ये आणि लतादीदींमध्ये गैरसमज पसरवला होता. त्यामुळे लतादीदी आणि माझ्यात तणाव होता. मला तर नेमके कारणच माहिती नव्हते. आशाताईंना ही गोष्ट उशिरा कळली. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, तुझे आणि दीदींचे काही भांडण झाले आहे का..मी गप्प राहिलो. त्यांनी तत्क्षणी मला त्यांच्या गाडीत घालून दीदींकडे पाठवले आणि या क्षणी तिच्यासमोर उभा राहून हे सगळं मिटवून टाक, असे फर्मावले. त्यानंतर दीदी शांत झाल्या. गैरसमज संपले. आकाश निरभ्र झालं, ते केवळ आशाताईमुळे.

एका गाण्याची आठवण :

संगीतकार सुधीर फडके यांचे एक गाणे आशाताईंसोबत गाणार होतो. गीताची रचना लांबलचक होती. त्यातून फडकेसाहेबांनी चालीत अशी किमया केली होती, की श्वास कुठे घ्यायचा, असा प्रश्न ताईंनीही पडला होता. पण त्यांनी पहिल्याच टेकमध्ये एका श्वासात ती अनवट चाल गायली, आजही ते मराठीतलं अजरामर गीत आहे. (तुज्या माज्या संसाराला आनि काय हवं.) ओष्ठ्य वर्ण माइकसमोर उच्चारताना, ते ब्लास्ट होतात, त्यामुळे त्या उच्चारावेळी ‘ऑफ द माइक’ कसे जायचे, हे त्यांनीच मला शिकवले.

बातम्या आणखी आहेत...