आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Divya Bharti Death Anniversary: 19 Year Old Divya, Who Got Married By Changing Religion, Was Given A Final Farewell By Being Decorated Like A Bride, Death Remained A Mystery

दिव्या भारतीची शोकांतिका:वयाच्या 18 व्या वर्षी धर्म बदलून साजिद नाडियादवालाशी थाटले लग्न, 11 महिन्यांतच गुढ मृत्यूनंतर अनेकांच्या स्वप्नात यायची

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नववीत असताना ऑफर झाला होता चित्रपट

विश्वात्मा, डर, दिवाना, शोला और शबनम यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या दिव्या भारतीची आज 29 वी पुण्यतिथी आहे. दिव्याने वयाच्या 16 व्या वर्षी तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. खरं तर 1988 मध्येच दिव्याचे बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले असते, परंतु तिला लागोपाठ तीन चित्रपटांमधून वगळण्यात आले. अखेरीस दिव्याने 1990 मध्ये आलेल्या 'बोबली राजा' या तेलुगू चित्रपटातून दक्षिणेत पदार्पण केले. साऊथनंतर 'विश्वात्मा' या चित्रपटाद्वारे तिची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली होती. पहिल्याच चित्रपटातून दिव्याला एका रात्रीतून प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातील सात समुंदर हे गाणे खूप गाजले.

पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊया, दिव्याचा यशस्वी प्रवास कसा सुरू झाला आणि एका अपघातामुळे या प्रवासाचा वेदनादायक शेवट कसा झाला-

दिव्या भारतीचा जन्म 25 फेब्रुवारी 1974 रोजी झाला होता. लहानपणापासूनच बबली व्यक्तिमत्त्व असलेली दिव्या बाहुलीसारखी दिसायची. तिला अभ्यासात अजिबात रस नव्हता. शेजारी राहणारे निर्माते जेव्हा दिव्याकडे चित्रपटाची ऑफर घेऊन यायचे, तेव्हा चित्रपट केल्याने तिची अभ्यासापासून सुट्टी होईल का? असे ती तिच्या आईला विचारत असे. दिव्याने नववीत शिकत सोडले होते.

नववीत असताना ऑफर झाला होता चित्रपट

1988 मध्ये जेव्हा दिव्या अवघी 14 वर्षांची होती, तेव्हा चित्रपट निर्माते नंदू तोलानी यांनी तिला त्यांच्या 'गुनाहों के देवता' या चित्रपटाची ऑफर दिली होता. हा दिव्याचा पहिला चित्रपट ठरला असता, पण नंतर तिच्याऐवजी संगीता बिजलानीला चित्रपटात कास्ट करण्यात आले.

व्हिडिओ लायब्ररी पाहताना अभिनेता गोविंदाचा भाऊ कीर्ती कुमार यांची नजर दिव्यावर पडली. त्यांनी राधा का संगम या चित्रपटात गोविंदाच्या अपोझिट दिव्याला कास्ट करण्याचे ठरवले. दिव्याला लाँच करण्यासाठी कीर्ती खूप उत्साहित होते. या चित्रपटासाठी दिव्याने अनेक महिने नृत्य आणि अभिनयाचे धडेही गिरवले, पण शेवटच्या क्षणी तिच्या जागी जुही चावलाला साईन करण्यात आले. कीर्ती दिव्या आणि तिच्या बालपणाबद्दल खूप पझेसिव्ह होते, त्यामुळे टीमने दिव्याला चित्रपटातून वगळले.

साऊथ चित्रपटातून अभिनय करिअरला सुरुवात

1990 मध्ये दिव्याने डी रामनायडू यांच्या बोबली राजा या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा एक हिट चित्रपट होता जो अजूनही तेलुगुतील आयकॉनिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. यानंतर दिव्या निला पन्नेंमध्ये झळकली. अवघ्या दोन चित्रपटांनंतर दिव्याची तुलना विजयशांती जिला लेडी ऑफ सुपरस्टार आणि लेडी अमिताभ म्हटले जायचे, त्यांच्याशी होऊ लागली. पुढे दिव्या राउडी अल्लुडू, धर्मक्षेत्र या चित्रपटांत दिसली.

बॉलिवूडमधील प्रत्येक चित्रपट निर्मात्याला दिव्यासोबत काम करायचे होते

साऊथचे काही चित्रपट हिट झाल्यानंतरच प्रत्येक बॉलिवूड चित्रपट निर्मात्याला दिव्याला आपल्या चित्रपटात घ्यायचे होते. राजीव राय यांच्या 1992 मध्ये आलेल्या विश्वात्मा चित्रपटातून दिव्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा हिट झाला नाही, पण दिव्याला प्रसिद्धी मिळाली. भारतीचा दुसरा चित्रपट 'दिल का क्या कसूर' एका आठवड्यानंतर प्रदर्शित झाला. तो देखील फ्लॉप ठरला. दिव्या म्हणाली होती, मला स्वतःला सिद्ध करायचे होते. मला पुन्हा वर चढावे लागेल. पण मला एक दिवस यश नक्की मिळेल याबद्दल मी सकारात्मक आहे.

त्याच वर्षी, दिव्या डेविड धवन यांच्या शोला और शबनम या चित्रपटात गोविंदाबरोबर झळकली. दिव्याचा हा पहिलाच हिट चित्रपट होता. 1992 मध्ये तिने दीवाना, जान से प्यारा, दिल आशना है, बलवान, दिल ही तो है, दुश्मन जमाना, गीत या चित्रपटांमध्ये दिसली.

वयाच्या 18 व्या वर्षी लग्न करून धर्म बदलला

दिव्या भारती वयाच्या 16 वर्षी साजिद नाडियाडवालासोबत पहिल्यांदा भेटली होती. 1990 साली जेव्हा दिव्या गोविंदासोबत फिल्मसिटीत 'शोला और शबनम' या चित्रपटाचे शूटिंग करत होती, तेव्हा साजिद त्यांच्या एका मित्रासोबत गोविंदाला भेटायला सेटवर आले होते. हळूहळू दररोज साजिद यांचे सेटवर येणे-जाणे सुरु झाले. एका मुलाखतीत साजिद यांनी सांगितले होते, "15 जानेवारी, 1992 रोजी दिव्याने त्यांना लग्नाची मागणी घातली. को-स्टारसोबतच्या सततच्या लिंकअपच्या बातम्यांमुळे दिव्या त्रासली होती. या अफवांना पूर्णविराम लावण्यासाठी दिव्याला लवकरात लवकर लग्न करायचे होते."

20 मे 1992 रोजी हेअर ड्रेसर संध्या आणि तिच्या पतीच्या उपस्थितीत दिव्या आणि साजिद यांचे लग्न झाले होते. साजिद यांच्या वर्सोवास्थित तुलसी अपार्टमेंटमध्ये काजीने त्यांचा निकाह लावला होता. लग्नापूर्वी दिव्याने इस्लाम धर्माचा स्वीकार करुन स्वतःचे नाव सना असे ठेवले होते. मुलाखतीत साजिद म्हणाले होते, "आम्ही लग्नाची गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. कारण दिव्याचे करिअर यशोशिखरावर होते. लग्नाची बातमी समोर आली असती, तर निर्माते घाबरले असते. त्यामुळे मी लग्नाची बातमी जगजाहीर करु दिली नव्हती. दिव्याला मात्र लग्न झाल्याचे सगळ्यांना सांगायचे होते. पण मी तिला असे करु दिले नाही. कदाचित मला त्यावेळी असे करायला नको होते."

बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यू
लग्नाच्या 11 महिन्यांनंतर दिव्याचे 5 एप्रिल 1993 रोजी निधन झाले. मृत्यूसमयी दिव्या फक्त 19 वर्षांची होती. पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडल्याने दिव्याचे निधन झाले, असे सांगितले जाते परंतु तिचा मृत्यू आजही रहस्यच आहे. नेमके कारण कुणालाही ठाऊक नाही. दिव्या चेन्नईहून शूटिंग करुन 5 एप्रिल 1992 रोजी मुंबईत घरी परतली होती. दुस-या दिवशी सकाळी तिला दुस-या शेड्युलसाठी निघायला होते. पण तिला ते शेड्युल 7 एप्रिलचे करायचे होते. दरम्यान तिला डिझायनर नीता लुल्ला यांचा फोन आला की, आंदोलन या चित्रपटासाठी त्यांना तिचा ड्रेस फायनल करायचा आहे. आंदोलन हा चित्रपट दिव्याचे पती साजिद प्रोड्युर करणार होते.

मृत्यूसमयी दिव्या नशेत होती

नीता त्यांचे पती श्याम लुल्लासोबत दिव्याच्या घरी पोहोचले, तेव्हा तिघांनी मिळून दारू प्यायली. दिव्याची मोलकरीण अमृताही घरात होती जी लहानपणापासून दिव्यासोबत होती. दिव्या दारुच्या नशेत होती. ड्रॉईंगरुममध्ये बसलेल्या पाहुण्यांशी बोलत असताना दिव्या अपार्टमेंटच्या 12 इंच रुंद खिडकीच्या रेलिंगवर जाऊन बसली. बोलत असताना दिव्याचा तोल गेला आणि ती पाचव्या मजल्यावरून खाली पडली. दिव्या पाठीवर पडली होती, रुग्णवाहिका येईपर्यंत ती जिवंत होती. शेजाऱ्यांच्या मदतीने दिव्याला कूपर रुग्णालयात नेण्यात आले, पण तिथे पोहोचल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले.

दिव्या भारतीच्या आकस्मिक निधनामुळे अनेकांनी तिच्या निधनावर संशय व्यक्त केला होता. अनेकांनी याला हत्या म्हटले होते. पण पोस्टमार्टम अहवालात दिव्याचा मृत्यू बाल्कनीतून पडल्यानंतर डोक्याला दुखापत आणि अंतर्गत रक्तस्रावामुळे झाल्याचे सिद्ध झाले. 7 एप्रिल 1993 रोजी दिव्यावर विलेपार्ले येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत्यूपूर्वी स्वत:ला दुखापत करुन घ्यायची दिव्या
दिव्याची आई मीता यांनी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, दिव्या रागाच्या भरात स्वत:ला दुखावत करत असे. मृत्यूपूर्वी दिव्याने सिगारेटने स्वत:ला चटके दिले होते.

दिव्याने 10 चित्रपट अपूर्ण सोडले

मृत्यूपूर्वी दिव्याकडे जवळपास 10 चित्रपट होते, जे तिच्या मृत्यूनंतर दुसर्‍या अभिनेत्रीसोबत पूर्ण झाले. यामध्ये लाडला, मोहरा, दिलवाले, विजयपथ, आंदोलन, चिंतामणी (तेलुगु), कर्तव्य, दो कदम, हलचल, बॉडीगार्ड यांचा समावेश आहे.

दिव्या लोकांच्या स्वप्नात येत असे
दिव्याच्या मृत्यूनंतर तिच्या आईने एका मुलाखतीत सांगितले होते की, दिव्या रोज त्यांच्या स्वप्नात यायची. दिव्याच्या आईव्यतिरिक्त तिची कव्हर स्टोरी करणाऱ्या पत्रकार वर्धा खानलाही अनेक महिने दिव्याची स्वप्ने पडायची. कव्हर स्टोरीच्या निमित्ताने वर्धा अनेकदा साजिदला भेटली आणि नंतर 2000 मध्ये दोघांनी लग्न केले.

बातम्या आणखी आहेत...