आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. या नवीन वर्षात ऑटो इंडस्ट्रीत अनेक बदल बघायला मिळणार आहेत. अनेक वाहन कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कंपन्या गेल्या महिन्यातील विक्रीचे आकडेदेखील जाहीर करतील. या सर्वांचा थेट परिणाम सामान्यांवर होईल. आजपासून होत असलेल्या या सर्व बदलांविषयी जाणून घेऊयात.
वाहन कंपन्या विक्रीचे आकडे जाहीर करतील
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला कंपन्या त्यांच्या विक्रीचे आकडे जाहीर करतात. अशा परिस्थितीत ही आकडेवारी आज जाहीर केली जाईल. दरम्यान, निर्मल बँग इन्स्टिट्युशनल इक्विटीज रिसर्च कंपनीच्या म्हणण्यानुसार मार्च 2021 मध्ये वाहन कंपन्यांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली बघायला मिळणार आहे. मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प, टीव्हीएस मोटर कंपनीसह जवळपास सर्वच कंपन्यांच्या विक्रीत वाढ दिसून येईल.
मारुती आणि निसानच्या कार महाग होणार
आजपासून मारुतीही आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ करणार आहे. कंपनीशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार किंमतीत 3% ते 5% पर्यंत वाढ करण्यात येणार आहे. म्हणजेच कारच्या किंमती जास्तीत जास्त 47,000 रुपयांपर्यंत महाग होऊ शकतात. कंपनी ब्रिझा, सियाझ, एक्सएल 6 यासारख्या लक्झरी कारच्या किंमती वाढ करु शकते. त्याचबरोबर निसान इंडियानेही 1 एप्रिलपासून आपल्या कारची किंमत वाढवण्याची घोषणा केली.
एस्कॉर्ट्सचे ट्रॅक्टरही महाग होतील
एस्कॉर्ट्स लिमिटेड या फॉर्म उपकरण बनवणा-या कंपनीचे ट्रॅक्टर आणि अॅग्री मशिनरी आजपासून महागणार आहेत. वस्तूंच्या किंमतीत सातत्याने वाढ केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे होते. कंपनी कोणत्या मॉडेलवर कितीची वाढ करणार आहे, याची यादी जाहीर करेल. मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार दर बदलू शकतात. बहुतांश कंपन्यांनी किंमती वाढवण्याचे सर्वात मोठे कारण स्टीलच्या किंमतीतील वाढ असल्याचे सांगितले आहे.
हिरो मोटोकॉर्पच्या बाईकही महाग होणार
आजपासून हीरो मोटोकॉर्प आपल्या बाईकच्या किंमती वाढवणार आहे. हीरो मोटोकॉर्पने सांगितल्यानुसार, त्यांच्या दुचाकीच्या किंमतीत 2500 रुपयांपर्यंत वाढ होईल. बाईक व स्कूटरच्या कोणत्या मॉडेलवर किती पैसे वाढविण्यात येतील हे बाजारपेठेनुसार ठरवले जाईल. कच्च्या मालाच्या किंमती सातत्याने वाढत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. विशेषत: वर्षभरात स्टीलच्या किंमतीत 50% वाढ झाली आहे.
सुरक्षेसाठी फ्रंट एअरबॅग अनिवार्य
आजपासून विक्री होणा-या प्रत्येक कारमध्ये जास्त सेफ्टी उपलब्ध असेल. कारमध्ये आता ड्रायव्हरसह फ्रंट पॅसेंजरसाठी एअरबॅग ठेवणे अनिवार्य झाले आहे. कायदा मंत्रालयाने हा प्रस्ताव रस्ते आणि परिवहन मंत्रालयाकडे पाठविला होता, जो मान्य करण्यात आला. आजपासून, सुरक्षिततेशी संबंधित नियम लागू होतोय. आजपासून विक्री होणा-या प्रत्येक कारमध्ये दोन सेफ्टी एअरबॅग उपलब्ध असतील. म्हणजेच कारच्या बेस व्हेरियंटमध्ये दोन एअरबॅग्ज असतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.