आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे आयशा झुल्का. आमिर खान स्टारर जो जीता वही सिकंदर या चित्रपटातून आयशा प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर तिने सलमान खआन आणि अक्षय कुमारसोबत अनेक चित्रपट केले. सध्या आयशा ही 'हश हश' या वेब सिरीजमुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीमध्ये आयशाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितले.
खरं तर करिअर यशोशिखरावर असताना आयशाने लग्न केले आणि सिनेसृष्टीला रामराम ठोकला. 2003 मध्ये तिने उद्योगपती समीश वाशी यांच्याशी लग्न थाटले. त्यांच्या लग्नाला 19 वर्षांचा काळ लोटला आहे, आणि आजही त्यांना मुलबाळ नाही. यामागील कारण स्वतः आयशाने सांगितले आहे.
आयशाला कधीही लग्न करायचे नव्हते
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये आयशाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले. ती म्हणाली, 'मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. कारण मला वाटत होते की, मी लग्न केले नाही तर मी काहीही करू शकते. माझ्या या निर्णयाला माझ्या कुटुंबीयांनीही पाठिंबा दिला होता. पण एके दिवशी मेडिटेशन क्लासमध्ये माझ्या आई आणि बहिणीची ओळख समीर यांच्याशी झाली. त्या दोघींनाही समीर माझ्यासाठी योग्य असल्याचे वाटले. त्यांनी माझी ओळख समीरशी करुन दिली. आम्ही एकमेकांना भेटलो आणि पसंत पडलो. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.'
नव-यानेही दिला आई न होण्याच्या निर्णयाला पाठिंबा
मुलं न होऊ देण्याच्या निर्णयाबाबत आयशा म्हणाली, "मी माझ्या आयुष्यात भावनिकदृष्ट्या अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यानंतर मी आई न होण्याचा निर्णय घेतला आणि या विचारात माझ्या पतीने मला पूर्ण साथ दिली. त्यांना माझे विचार पटले."
समीर आणि आयशा यांनी 160 मुलांना घेतले दत्तक
आयशाने सांगितले की, "समीर आणि मी गुजरातमधील दोन गावे दत्तक घेतली असून तेथील 160 मुलांच्या शिक्षणाची आणि जेवणाची पूर्ण काळजी घेतो आणि त्यातच मला तो आनंद मिळतो. मी त्या मुलांना मुंबईत आणून त्यांचे संगोपन करु शकत नाही. त्यामुळे मी तिथे गावात जाऊन त्यांच्यासोबत वेळ घालवते," असे अभिनेत्रीने सांगितले.
'खिलाडी', 'जो जीता वही सिकंदर', 'बलमा', 'रंग', 'मेहेरबान', 'दलाल', 'बलमा', 'रंग', 'मासूम', 'संग्राम', 'जय किशन', 'वक्त हमारा है' यांसारख्या सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये आयशनाने काम केले आहे. 29 जुलै 1972 रोजी श्रीनगरमध्ये तिचा जन्म झाला. तिचे वडील इंदर कुमार जुल्का हे इंडियन एअर फोर्स ऑफिसर होते. 1983मध्ये आयशाने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. आता आयशाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.