आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'टार्जन: द वंडर कार' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आयशा टाकिया हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 37 वर्षे पूर्ण केली आहेत. आयशाने वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. टीव्ही जाहिरात आणि मॉडेलिंग करिअर केल्यानंतर आयशा चित्रपटांमध्ये आली आणि पहिल्याच चित्रपटासाठी तिला बेस्ट फिमेल डेब्यूचा पुरस्कार मिळाला. 21 चित्रपटांमध्ये झळकलेली आयशा तिच्या अभिनयापेक्षा अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि वादांमुळे चर्चेत असते.
आज आयशाच्या वाढदिवसानिमित्त वाचा तिच्याबद्दलच्या खास गोष्टी -
बालकलाकार म्हणून झळकली आयशा टाकिया
10 एप्रिल 1986 रोजी मुंबईत जन्मलेल्या आयशा टाकियाचे वडील निशित टाकिया हे गुजराती तर आई फरीदा मुस्लिम आहे. आयशाने चेंबूरच्या सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्याचबरोबर बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. पहिल्यांदा आयशा बालकलाकार म्हणून शाहिद कपूरसोबत कॉम्प्लॅनच्या जाहिरातीत दिसली होती. आयशाने डिस्ने चॅनलसाठी देखील काम केले आहे. यासाठी तिला दर महिन्याला 8 हजार रुपये मिळत होते.
फाल्गुनी पाठकच्या म्युझिक व्हिडिओद्वारे मिळाली ओळख
2000 मध्ये आयशा टाकिया गायिका फाल्गुनी पाठकच्या 'मेरी चुनर उड उड जाये' या म्युझिक व्हिडिओत झळकली होती. या गाण्यानंतर आयशाला देशभरात ओळख मिळाली. त्यानंतर ती 'शेक इट डॅडी', 'नहीं नहीं अभी नही' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली. या हिट म्युझिक व्हिडिओजनंतर आयशाला बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या.
वयाच्या 18 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण
आयशाने 2004 मध्ये अब्बास-मस्तान यांचा सुपरनॅचरल अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'टार्जन: द वंडर कार'द्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता, पण अभिनय आणि ग्लॅमरस अंदाजाने आयशा प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. या चित्रपटासाठी आयशाला फिल्मफेअर अवॉर्ड आणि बेस्ट फिमेल डेब्यूसाठी आयफा अवॉर्ड मिळाला होता.
करिअरच्या सुरुवातीला 6 फ्लॉप चित्रपट दिले
आयशाने पुढे 'दिल मांगे मोर', 'सोचा ना था', 'शादी नंबर 1', 'होम डिलिव्हरी' यांसारख्या चित्रपटात काम केले. आयशाचे सुरुवातीचे 7 चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप ठरले. 2006 मध्ये आयशा पहिल्यांदा 'डोर' या चित्रपटात नॉन ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. आयशाने साकारलेल्या राजस्थानी विधवेच्या भूमिकेचे समीक्षकांनी खूप कौतुक केले आणि हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील पहिला हिट ठरला. 2007 मध्ये आयशाचे 6 चित्रपट प्रदर्शित झाले होते. यात 'सलाम-ए-इश्क', 'कॅश' आणि 'फुल अँड फायनल' या चित्रपटांचा समावेश आहे.
2009 मध्ये आयशाने सलमान खानसोबत 'वाँटेड' या चित्रपटात काम केले. हा चित्रपट आधी अमृता रावला ऑफर करण्यात आला होता, पण तिने तो नाकारल्यानंतर आयशा या चित्रपटाची नायिका बनली. आयशाच्या करिअरमधील हा सर्वात मोठा हिट चित्रपट आहे. 2 वर्षानंतर आयशाने 2011 मध्ये आलेल्या 'मोड' चित्रपटानंतर अचानक इंडस्ट्री सोडली.
लग्न करून इंडस्ट्रीला ठोकला रामराम
आयशा टाकियाने वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी रेस्तराँचा मालक असलेल्या फरहान आझमीशी लग्न केले. फरहान हा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चार वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आयशाने इस्लाम धर्म स्वीकारला आणि फरहानशी लग्न केले. दोघांनीही बरेच दिवस आपले नाते लपवून ठेवले होते, पण 2005 मध्ये त्यांचे नाते अधिकृत झाले. ते अनेकदा एकत्र दिसायचे, सुट्टीवरही ते एकत्र जायचे. फरहानशी लग्न करण्यापूर्वी आयशाचे नाव सिद्धार्थ कोईराला (मनीषा कोईरालाचा भाऊ) आणि अश्मित पटेल (अमिषा पटेलचा भाऊ) यांच्याशी जोडले गेले होते.
वादग्रस्त वक्तव्यावरून आयशा सासरच्या विरोधात उभी राहिली
2014 मध्ये आयशा टाकियाचे सासरे आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी म्हणाले होते की, बलात्कार पीडितांनाही शिक्षा झाली पाहिजे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर देशभरातून निषेध झाला होता. अबू आझमी यांच्या या वक्तव्यामुळे लोकांनी आयशावर चांगलीच टीका केली होती. तिला यासाठी जाहीरपणे माफीदेखील मागावी लागली होती. माझ्या सासऱ्यांनी केलेले हे वक्तव्य जर खरे असेल तर मी आणि फरहान आम्हाला फारच लज्जास्पद वाटत आहे. आम्ही अशा मानसिकेतचा विरोधच करतो. एक महिला म्हणून याकडे पाहताना मला फार लाजिरवाणं वाटतं आहे," असे आयशा म्हणाली होती.
सर्जरी बिघडल्याने झाली होती ट्रोल
2009 मध्ये आयशा टाकियाने ब्रेस्ट इम्प्लांटेशन सर्जरी केली होती. याशिवाय तिने चेहऱ्याचीही सर्जरी केली होती. मात्र आयशाच्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो समोर येताच लोकांनी तिची खूप खिल्ली उडवली होती.
व्हेगन रेस्तराँची मालकीण आहे आयशा
मुस्लिम कुटुंबात लग्न झाल्यानंतरही आयशा शाकाहारीच नाही तर व्हेगनदेखील आहे. तिने मुंबईत बॅसिलिको नावाचे व्हेगन रेस्तराँ सुरु केले आहे. सिनेसृष्टीपासून दूर 37 वर्षीय आयशा वैवाहिक जीवनात रमली आहे. आयशाचे इन्स्टाग्रामवर 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.