आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बी.आर चोप्रांच्या महाभारतातील 'इंद्र' काळाच्या पडद्याआड:अभिनेते सतीश कौल यांचे कोरोनामुळे निधन, हलाखीच्या परिस्थितीत घालवले अखरेचे दिवस; स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न राहिले अधुरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सतीश कौल यांना कोरोनाची लागण झाली होती.

बी.आर चोप्रा यांच्या गाजलेल्या 'महाभारत'मध्ये इंद्रदेवाची भूमिका साकारणारे अभिनेते सतीश कौल यांचे निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. अभिनेते गजेंद्र चौहान यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.

कोरोनाची चाचणी करुन घेण्यास सतीश कौल यांनी दिला होता नकार

सतीश कौल यांची बहीण सुषमा कौल यांनी दिव्य मराठीला सांगितले, 'सतीश कौल लुधियानात राहात होते. पाच दिवसांपूर्वी त्यांना तापाने ग्रासले होते. मात्र कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह येईल या भीतीने त्यांनी चाचणी करुन घेण्यास नकार दिला होता. मात्र तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांच्या केअर टेकरने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, तिथे त्यांची कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली. पण रुग्णालयात त्यांची प्रकृती स्थिर होती. आज सकाळी माझे त्यांच्याशी बोलणे झाले, त्यावेळी मी बरा आहे, असे त्यांनी मला सांगितले. मात्र काही तासांतच त्यांच्या निधनाची बातमी मला मिळाली,' असे सुषमा कौल यांनी सांगितले.

अखेरचे दिवस हलाखीच्या परिस्थितीत घालवले

सतीश कौल गेली काही वर्षे हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतित करत होते. निधनाच्या काही महिन्यांपूर्वी एका बातचीतमध्ये त्यांनी आपली व्यथा मांडली होती. 300 हून अधिक पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. लॉकडाऊनमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचे त्यांनी सांगितले होते.

सतीश लुधियानामध्ये भाड्याच्या घरात राहात होते
सतीश म्हणाले होते, “मी लुधियानात एका छोट्या भाड्याच्या घरात राहत आहे. मी आधी वृद्धाश्रमात राहत होतो. पण सत्या देवी यांच्यामुळे सध्या भाड्याच्या घरात जागा मिळाली आहे. माझी प्रकृती चांगली आहे. पण लॉकडाउनमुळे परिस्थिती बिघडू लागली आहे,” असे त्यांनी सांगितले होते.

सतीश म्हणाले होते, 'मला माणूस म्हणून मदतीची गरज आहे'
सतीश म्हणाले होते, “औषधं, भाजी आणि काही मुलभूत गोष्टींसाठी मी झगडत आहे. मला मदत करा असे मी चित्रपटसृष्टीला आवाहन करतोय. अभिनेता असताना माझ्यावर इतक्या जणांनी प्रेम केले. पण आता मला एक माणूस म्हणून मदतीची गरज आहे.”

जवळपास अडीच वर्षे हॉस्पिटलच्या पलंगावर राहिले
74 वर्षीय सतीश कौल यांनी महाभारताव्यतिरिक्त 'विक्रम और बेताल' या कार्यक्रमातही काम केले होते. तसेच 'प्यार तो होना था था' आणि 'आंटी नंबर 1' सारख्या चित्रपटांमध्ये ते झळकले होते. सतीश कौल 2011 मध्ये मुंबईहून पंजाबमध्ये गेले आणि त्यानंतर तेथे अभिनय शाळा सुरु केली होती. 2015 मध्ये त्यांच्या पाठीचे हाड मोडल्यानंतर जे काम सुरु होते ते त्यांना थांबवावे लागले होते. दोन वर्ष ते रुग्णालयात होते. नंतर त्यांना वृद्धाश्रमात जावे लागले. तिथे त्यांनी दोन वर्षे घालवली होती.

'मला कशाचीही खंत नाही'
सतीश कौल म्हणाले होते, “जर लोक मला विसरले असतील तर ठीक आहे. मला खूप प्रेम मिळाले असून त्यासाठी मी आभारी आहे. मी नेहमीच प्रेक्षकांचा ऋणी राहील."

स्वतःसाठी घर खरेदी करण्याची होती इच्छा
सतीश कौल यांनी स्वतःसाठी घर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, 'मी राहू शकेन असं व्यवस्थित घर विकत घेण्यासाठी मी सक्षम व्हावं एवढीच माझी अपेक्षा आहे. सगळं काही संपलेले नाही. मला कोणीतरी काम घावे ही अपेक्षा आहे. मी कोणतीही भूमिका करू शकतो. मला पुन्हा अभिनय करायचा आहे,' अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.

बातम्या आणखी आहेत...