आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बच्चन कुटुंबातून आनंदाची बातमी:ऐश्वर्या-आराध्या कोरोनामुक्त, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; 14 दिवसांनंतर बिग बींचा 'जलसा'सुद्धा कंटेन्मेंट झोनमधून बाहेर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऐश्वर्या-आराध्याचा 12 जुलै रोजी रिपोर्ट आला होता पॉझिटिव्ह

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांचा मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या अमिताभ आणि अभिषेक हे दोघेही नानावटी रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर ऐश्वर्या आणि आराध्या या दोघींना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 17 जुलै रोजी ताप असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल दहा दिवस त्यांच्यावर नानावटी रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरु होते.

  • अभिषेकने ट्विट करुन दिली माहिती

ऐश्वर्या आणि आराध्या यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचे अभिषेकने ट्विट करुन सांगितले आहे. अभिषेकने ट्विट केले की, तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आभारी आहे. सुदैवाने ऐश्वर्या आणि आराध्या यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्या आता घरी आहेत. सध्या मी आणि माझे वडील रुग्णालयातच असल्याचेही त्याने आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे.

  • 12 जुलै रोजी रिपोर्ट आला होता पॉझिटिव्ह

11 जुलै रोजी अमिताभ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर त्याच्या दुस-या दिवशी म्हणजे 12 जुलै रोजी ऐश्वर्या आणि आराध्या यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. पण त्यांना होम क्वारंटाइन ठेवण्यात आले होते. पाच दिवसांनी म्हणजे 17 जुलै रोजी त्यांना ताप आल्याने तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले होते. पण आता त्या घरी पोहोचल्या आहेत. बिग बी आणि अभिषेक यांना मात्र कधीपर्यंत रुग्णालयातून सोडण्यात येईल, याची माहिती मिळू शकलेली नाही.

अमिताभ, अभिषेक ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता तर जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, तिचा मुलगा अगस्त्या आणि मुलगी नव्या यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले.

  • जलसा झाला कंटेन्मेंट झोनमधून बाहेर

बच्चन कुटुंबातील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या जलसा बंगल्याला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. रविवारी (26 जुलै) मुंबई महापालिकेने जलसावरील कंटेन्मेंट झोनचा बोर्ड काढला आहे.