आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादाक्षिणात्य सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे वादात सापडली आहे. तिने ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात दाखवलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या दृश्याची मॉब लिंचिंगशी तुलना केल्याने नवा वाद पेटला आहे. आता साई पल्लवीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बजरंग दल आक्रमक
एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावर बजरंग दलाच्या नेत्यांनी हैद्राबादच्या सुलतान बाजार पोलिस ठाण्यात साई विरोधात तक्रार दाखल केली आहे. पल्लवीने काश्मीर फाइल्स चित्रपटावर भाष्य करताना गौ राक्षकांबद्दल देखील वक्तव्य केले होते. तिच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, ते व्हिडीओ पाहतील आणि कायदेशीर अभिप्रायानंतर पुढील कारवाई करतील. विराट पर्वम या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने काश्मीरी पंडीतांवर झालेल्या अत्याचारांची तुलना गायीची तस्करी आणि लिंचिंगशी केली होती.
बजरंगदल भाग्यनगर नावाच्या ट्विटर हँडलवर एफआयआरची एक प्रत शेअर करण्यात आली आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल करणाऱ्यांची नावेही लिहिली आहेत.
काय म्हणाली होती साई पल्लवी?
ग्रेट आंध्र न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत साई म्हणाली होती, ''माझ्या मते हिंसा हा संवादाचा चुकीचा मार्ग आहे. माझे कुटुंब हे एक तटस्थ भूमिका घेणारे कुटुंब आहे. त्यांनी मला फक्त चांगला माणूस बनण्यास शिकवले आहे. 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटामध्ये काश्मिरी पंडितांचा हत्याकांड, त्यांचा नरसंहार दाखवला गेला आहे. तर हिंसा आणि धर्माचे मापदंड केले गेले, तर काही दिवसांपूर्वी एका गायीने भरलेला ट्र्क घेऊन जाणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला मारहाण करत त्याला जय श्री राम म्हणण्यास सांगण्यात आले. ही सुद्धा धर्माच्या नावावर झालेली हत्या आहे. काश्मीरमध्ये जे घडले त्यात आणि मॉब लिचिंगच्या घटनांमध्ये काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत,' असे साई म्हणाली.
या वक्तव्यामुळे सोशल मीडियात पडले दोन गट
साईच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडिया दोन भागात विभागला गेला. काहींनी तिच्या बेधडक वक्तव्यासाठी तिला पाठिंबा दर्शवला आहेत, तर काही तिच्यावर भडकले आहेत. साईने केलेले वक्तव्य काश्मिरी पंडितांच्या शोकांतिकेचे चुकीचे चित्रण करत असल्याचे अनेकांना वाटत आहे. साई पल्लवी एक हुशार मुलगी आहे, असे मी समजत होते, पण तिने मला निराश केले आहे, अशी प्रतिक्रिया एका नेटक-याने दिली आहे. तर मला साई पल्लवीची स्टाइल आवडली, दक्षिण भारतीय कलाकार कधीही सत्य बोलण्यास मागेपुढे पाहात नाहीत, अशी कमेंट करत एका नेटक-याने तिला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
नक्षलवादी चळवळीवर आधारित आहे आगामी चित्रपट
साईचा आगामी चित्रपट 'विराट पर्वम'मध्ये राणा दग्गुबती मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 1990 च्या सत्य घटनेवर आधारित आहे. त्याची पार्श्वभूमी तेलंगणा भागातील नक्षलवादी चळवळ आणि एक प्रेमकथा आहे. या चित्रपटात साई वेनेलाची भूमिका साकारत आहे, जी रवन्ना या नक्षलवादी नेत्याच्या प्रेमात पडते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.